❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
*🔸दशावतार.🔸*
*------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*------------------------------------------*
*दुष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी परमेश्वर युगायुगांत निरनिराळे अवतार घेतो, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. हे दहा अवतार विष्णूचे आहेत. शिव, गणपती, देवी इ. देवतांनीही अवतार घेतले असल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, वामन व परशुराम या अवतारांची कथाबीजे वैदिक वाङ्मयात मिळतात. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात विष्णूचे चोवीस अवतारही सांगितले आहेत.*
*पुराणांत दशावतारांच्या जन्मतिथी सांगितल्या आहेत. त्या अशा (१) मत्स्य—चैत्र शुद्ध तृतीया, (२) कूर्म—वैशाख पौर्णिमा, (३) वराह—भाद्रपद शुद्ध तृतीया, (४) नरसिंह—वैशाख शुद्ध चतुर्दशी, (५) वामन—भाद्रपद शुद्ध द्वादशी, (६) परशुराम—वैशाख शुद्ध तृतीया, (७) राम—चैत्र शुद्ध नवमी, (८) कृष्ण—श्रावण वद्य अष्टमी, (९) बुद्ध—आश्विन शुद्ध दशमी, (१०) कल्की—श्रावण शुद्ध षष्ठी.*
*विष्णूने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणांत अनेक कथा आढळतात. मत्स्यावतार- शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनूचे रक्षण करण्यासाठी, कूर्मावतार- देव व दैत्य मंथन करीत असता मंदार पर्वताला आधार देण्यासाठी, वराहावतार- हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी, नरसिंहावतार- हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, वामनावतार- तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, परशुरामावतार- सहस्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, रामावतार- रावणादि राक्षसांचा नाश करण्यासाठी, कृष्णावतार–कंसादी दुष्टांचा वध करण्यासाठी, बुद्धावतार- यज्ञहिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसेचे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी व कल्कीचा अवतार- म्लेंच्छांदी दुष्टशक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी. हा शेवटचा कलियुगाच्या शेवटी होणार आहे, असे कल्कीपुराणात म्हटले आहे.*
*दशावतारांची ही कल्पना उत्क्रांतिवादावर आधारित आहे, असे एक मत आहे, तर ॲनी बेझंट यांनी आपल्या अवताराज (१९२५) या पुस्तकात अवतारानुसार वेगवेगळी युगे मानली आहेत. गीतगोविंदकार जयदेवाने श्रीकृष्ण हा श्रेष्ठ देव मानून त्याचे दहा अवतार सांगितले आहेत. कृष्णाऐवजी तो बलराम हा आठवा अवतार मानतो.*
*दशावतार नावाचे एक व्रतही सांगितले आहे. अवतार ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या अवताराची मूर्ती तयार करून तिची पूजा, तीस खाद्यपदार्थांचा नैवेद्य असा याचा विधी आहे. या पदार्थांपैकी दहा देवाला, दहा ब्राह्मणाला देऊन दहा स्वतःसाठी ठेवतात.....*
*स्त्रोत: मराठी विश्वकोश,जोशी, रंगनाथशास्त्री...*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
No comments:
Post a Comment