विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी
· राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.
मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ५२ कामगारांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, सर्व स्थानिक खासदार व आमदार, तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवार दि.१३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रदान करण्यात येणारे पुरस्कार सन २०२३ मधील असून छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना कामगार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच राज्यभरातील ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार्थींना प्रत्येकी रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते, अशी माहिती कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment