सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांची सहमती
सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत श्री. फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment