Thursday, 14 November 2024

देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

 देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

 

मुंबईदि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशीमुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभानेसहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंतअपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावतनागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते.

विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले. "मतदान हा आपला अधिकार आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन मतदान करून लोकशाहीला सुदृढ बनवण्यास हातभार लावावा," असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी प्रत्येक मतदाराने मतदारयादीत आपले नाव तपासून शंभर टक्के मतदान साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.

सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने यांनी मतदानाचे महत्त्व पटवून देत, "मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे," असे सांगितले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान होणार असूनत्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांसोबत प्रश्नावली आणि बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत यांनी केले  सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले आणि आभार अपने आप संस्थेच्या पूनम अवस्थी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi