Friday, 29 September 2023

माणसाला समज हवी"*

 " *माणसाला समज हवी"* 


 *मित्रांनो नमस्कार,* 


कोणताही माणूस मुळात तो वाईट नसतो. वाईट असतात ते त्याचे "विचार" आणि केवळ या विचारातूनच तो वाईट प्रवृत्तीचा बनतो. या वाईट प्रवृत्ती कशा हाताळायच्या याचेही एक शास्त्र असतं आणि ते शास्त्र म्हणजे माणसाला असणारी 'समज'. माणसाला योग्य वयात योग्य 'समज' यायला लागते म्हणतात, आणि ती समज एकदा का आली की माणसांमधील वाईट प्रवृत्ती नायनाट होण्यास मदत होते. परंतु सगळ्यांमध्येच असं होतं असेही नाही. मानव संसाधन विभागात असल्यामुळे मी आजवर अनेक लोकांना भेटलो व लोकांशी संबंध आला. परंतु सर्वांमध्ये हीच तफावत जाणून येते. वयानुसार याच्यामध्ये फरक पडतो आपण म्हणतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून वयानुसार व्यक्तीला समज येथे असे नाही. एखाद्या व्यक्तीला कमी वयामध्ये खूप चांगली समज येते. आणि एखाद्या व्यक्तीला वयोवृद्ध झाल्यानंतर ही समज येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बालपणापासून आपण स्वतःहून किती गोष्टी समजून व स्पष्ट करून घेतल्या. ही विचाराची स्पष्टता ज्यांना ज्या वयामध्ये झाली, अशा सर्व व्यक्तींना समज ही वेगवेगळ्या प्रसंगामधून व वेगवेगळ्या वयामध्ये आली असे दिसते. आपले विचार प्रगल्भ झाले की, आपल्यामध्ये "प्रगल्भता" येते. आपण ठरवलेल्या दिशांनी जात असताना अचानकपणे रस्ता चुकतो आणि रस्ता चुकलोय हे आपल्याला डोळ्यांनी दिसतो. म्हणून आपण लगेच जागृत अवस्थेत येतो आणि योग्य रस्ता धरतो. तसं विचाराच्या बाबतीत होत नाही. बोलत-बोलत व शब्दा- शब्दातून आपण कोणत्यातरी वेगळ्या दिशेला मार्गक्रमण करतो आणि त्याच्यातून निर्माण होतात ते गैरसमज आणि मतभेद. समज चांगली येण्यासाठी आपल्या मनामध्ये स्पष्ट विचार असायला हवेत. स्पष्ट विचार कोणताही गोंधळ व गैरसमज निर्माण होऊ देत नाहीत. 


खऱ्या अर्थाने ज्यावेळेस व्यक्ती ऐकून घेण्याचे, संयम बाळगण्याचे व समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तन-मन लावून असतो, तेव्हा त्याच्या मधून येणारा परिणाम हा, निश्चितच समजूतदारपणाचा असतो आणि हाच समजूतदारपणा आपल्याला 'समज' नावाची देणगी आयुष्यभरासाठी देऊन जातो. 


"समज" ही जीवनाचा पाया आहे आणि "समज" असणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. "समज" कमी असेल तर आयुष्य हे ताण-तणावाचे व गुंतागुंतीचे होऊन जाते. समोरच्याने हे मुद्दामून माझ्यासाठी केलेला आहे. माझ्यावर तू जळतो आहे. माझी प्रगती झालेली त्यांना आवडत नाही. मी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. अशा काही गोष्टींचा त्रास आपण स्वतःला करून घेतो आणि होतो सुद्धा. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यामध्ये असणारा "समजूतदारपणा" हा खूप कमी व नकारात्मक आहे. याचे परिणाम ही अत्यंत गंभीर स्वरूपाचे आपल्या जीवनावरती आघात करून जातात. म्हणून नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये "सकारात्मक समाज" निर्माण करणे, आपण केलेल्या विचारावरती परत विश्लेषणात्मक विचार करणे, जेणेकरून आपल्या मधल्या समजूतदारपणाचं "दर्शन" आपल्यालाही व समाजालाही होईल व त्याची किंमत कोणालाही चुकवावी लागणार नाही. 


आपल्यामध्ये "समज" असेल तर वादविवाद भांडण तंटे "गैरसमज" असे प्रकार आपल्या जीवनामध्ये होत नाहीत आणि आपण शांततेत संकटात ही मार्ग काढू शकतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi