Friday, 30 December 2022

पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार

 पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार


- मंत्री उदय सामंत.

            नागपूर, दि. २९ : पिंपरी चिंचवड शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था, मैला शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, सीसीटीव्ही, बांधकाम परवानगी इत्यादी मुलभूत सुविधांबाबत महानगरपालिकेकडे मागणी होत आहे. त्याअनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधीसह नगरविकास विभागातील अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


            याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य महेश लांडे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात आयटी क्षेत्र तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये रहिवासी लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी इमारतीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तथापि, आंध्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी १०० दशलक्ष लिटर प्रतीदिन इतका साठा मंजूर असून निघोज बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली असून लवकरच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.


            ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (१०० किलो पेक्षा जास्त) गृहनिर्माण संस्थानी ओल्या कचऱ्यावर गृहनिर्माण संस्थेच्या आवारातच प्रक्रिया करणे आवश्यक आहे. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील नियम १३.४ नुसार चार हजार चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रासाठी OWC बंधनकारक असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, राहुल कुल यांनी सहभाग घेतला.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi