चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा
- चंद्रकांत पाटील
विद्यापीठ, महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा. नवीन शैक्षणिक धोरणातील बदलामुळे प्राध्यापकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सेवानिवृत्त कुलगुरू यांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून अभ्यासक्रम, कामाचा भार, पदसंख्या, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा करण्यात येईल. शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सुचविल्या जातील. तसेच लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असताना महाविद्यालय, विद्यापीठ यांनी आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी त्यामुळे मतदार नोंदणीबाबत जनजागृती होईल, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्राने पाऊले उचलली आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण असावे यावर लक्ष केंद्रित करून बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असे सांगून जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये ही विद्यापीठाने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
विद्यापीठात कौशल्य अभ्यासक्रम तयार करावेत – मंगल प्रभात लोढा
रोजगार निर्मितीसाठी संशोधन करून विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जपानसारख्या देशांनी स्वतः ची नॉलेज बँक तयार केली आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम, सेवा, रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करावे, यासाठी शासन वित्तीय सहकार्य करेल, असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीतील सहभाग यावर सादरीकरण केले. यावेळी मतदार नोंदणी प्रमाणाची माहिती दिली. मतदार नोंदणी 2023 अंतर्गत 18-19 या वयोगटातील 4 लाख 36 हजार 476 तर 20 ते 29 या वयोगटातील 1 कोटी 58 लाख 68 हजार 757 मतदारांची नोंदणी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी यासाठी निवडणूक शाखेने थिंक टँकची स्थापना केली आहे. शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीय सामाजिक योजना, विविध विद्यापीठे व महाविद्यालये यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले.
000
No comments:
Post a Comment