Monday, 25 July 2022

 लातूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आता लोकचळवळ व्हावी.

                       - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

            मुंबई,दि.24, लातूर:- “वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे, याचा नागरिकांना प्रत्यय आलेला आहे, वृक्ष लागावडीसाठी नागरिकांचाही सहभाग मिळत आहे, लोकांनी या गोष्टीला स्वीकारले आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असणार आहे,” असे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.


            जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून औपचारिक उदघाटन करण्यात आले.


            जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे 0.6 टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत.


सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण


            11 वाजून 11 मिनिटांनी, 10 किलोमीटरची मानवी साखळी, 28 हजार वृक्षाची लागवड... या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. ते सेल्फी पॉईंट मध्ये स्वतः जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला... नंतर अनेक लोकांनी फोटो काढून घेऊन आपल्या डीपी ला लावला.


वृक्ष लागवड पुढीलप्रमाणे झाली


            लातूर तालुक्यातील भातखेडा येथे 2 हजार रोपे, सोनवती येथे 2 हजार रोपे, धनेगाव येथे 4 हजार रोपे, शिवणी खुर्द येथे 550 रोपे, भातांगळी येथे 3 हजार 500, भाडगाव येथे 1 हजार, रमजानपूर येथे 1 हजार 500, उमरगा येथे 2 हजार, बोकनगाव येथे 2 हजार 300, सलगरा बु. 4 हजार 100, बिंदगिहाळ 500, औसा तालुक्यातील शिवणी बु. 3 हजार, तोंडवळी येथे 2 हजार, होळी येथे 2 हजार असे गावनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली.


00000


 


                                                                               


 


 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi