Monday, 27 June 2022

 " आई- बाबा, माझा रिझल्ट आला.... मी फर्स्ट क्लासने पास झालो.. " वेद पेढ्यांचा बॉक्स घेऊनच आला होता.

    " देवाजवळ ठेव आधी पेढे.... आशिर्वाद घे.... शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केले. आम्हाला आधी नव्हता आवडला तुझा हा हॉटेल मॅनेजमेंटला अ‍ॅडमिशन घेण्याचा निर्णय! पण तू तुझ्या निर्णयावर अढळ राहिलास आणि ते चांगल्या मार्कांनी पूर्ण केलेस."

       " बाबा नमस्कार करतो... "

    " यशस्वी हो! आता पुढे काय ठरवलंय? "

  " बाबा, आपली थोडी जमीन आहे ना हायवे ला लागून..... मी आणि माझे दोन मित्र मिळून तिथे हॉटेल सुरू करणार आहोत.... आधी थोडेसेच, कामापुरते बांधकाम करून घेऊ..... नंतर जसा जम बसेल तसं हळू-हळू वाढवू हॉटेल..... "

     " वेद, अरे जमीन तर बँकेकडे गहाण आहे.... तिथे काही करू शकत नाही आपण...... तू एखाद्या मोठय़ा हॉटेलमध्ये नोकरी बघ ना आधी...... "

       " बाबा, जमीन गहाण आहे? मला का सांगितलं नाही तुम्ही? आणि गहाण कशाला टाकली जमीन? ....... तुम्हाला माहीत होतं ना मला हॉटेल टाकायचं होतं तिथे.....नोकरी तर मी कधीच करणार नाही.... मला बिजनेस करायचा आहे..... बरं, आपल्याकडे किती पैसे आहेत? भाड्याने घेऊ जागा...."

       " अरे बाळा, पैसे असते तर जमीन गहाणच का टाकली असती? तुझ्या कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च, घरखर्च.... माझ्या पेंशनमध्ये थोडाच भागणार होता? तू दुसरा काहीतरी मार्ग शोध. "

        वेदला बाबांचा फार राग आला. त्याच्या माहितीप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकी काही बिकट नव्हती की त्यांना जमीन गहाण टाकावी लागेल... आणि आता पैशांची मदतही करणार नाही असं म्हणताहेत...." कसे आई-वडील आहेत? मुलासाठी काहीच करू शकत नाही!"

      वेद त्या दिवशी जेवलाच नाही.... दुसर्‍या दिवसापासुन सकाळीच घराबाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा.... कुठे जातो... काय करतो... आई बाबांना माहीतही नसायचे...

आईने विचारल्यावर नीट उत्तरही देत नसे. 

त्याची आई, बाबांना म्हणाली एकदा," अहो, करा ना त्याला काही मदत.... वणवण भटकतोय पोर! एकुलत्या एक मुलासाठी करायचे नाही मग कोणासाठी करायचे?"

      " यशोदा, अगं, असते पैसे तर दिले असते ना! मी काही वैरी आहे का त्याचा?"

     "पण तो तर वैरी समजायला लागलाय ना तुम्हाला... मला बघवत नाही असा अबोला घरात..... "

वसंतराव यावर काहीच बोलले नाही.


    काही दिवसांनी वेद आईला म्हणाला," आम्ही तीन मित्र मिळून गाळा घेतोय भाड्याने.... छोटेसे स्नॅक्स आणि कॉफी हाऊस सुरू करतोय..... बघू कसे चालतंय ते..... आणि तुम्ही पैसे द्यायची गरज नाही..... गाळ्याचा मालक चांगला आहे डिपाॅझिट नाही घेणार... दोन महिन्यांचे भाडे फक्त आगावू घेणार आहे.. आणि बाकी सामानासाठी माझे काही जमवलेले पैसे आणि काही उधारी यावर भागेल आमचे सध्या..... सांग बाबांना.... मी करेल माझं काय ते! "

       यशोदाबाईंच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.... वसंतराव शांतच होते.

     वेद आता कामात पार बुडून गेला.... सकाळी लवकर बाहेर पडायचा.... रात्री तर बारा वाजायचे जेवायला... आईने दिलेला डबाही परत यायचा.... त्याचे खाण्या-पिण्यावर लक्षच नव्हते...

           पहिले दोन तीन महिने धंदा काही व्यवस्थित होत नव्हता.... सगळा खर्च जाऊन हातात काही शिल्लकच रहात नव्हते.... त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली... त्यात एक मित्र भांडून निघून गेला.. आता दोघांवरच सगळा भार आला. वेदने मग होम डिलीवरी सुरू केली, काही नव्या ऑफर चालू केलेल्या.... फ्री सँपलिंग , कॉलेजच्या समोर स्टॉल.... असे एक ना अनेक प्रयोग करू लागला .... मार्केट स्टडी करून कस्टमरला काय हवं असतं त्याचा अभ्यास केला...... पार्टी ऑर्डर सुरू केल्या....

        हळू हळू त्याचा जम बसू लागला.... ऑर्डर वाढल्या, कस्टमरची गर्दी होऊ लागली.... जागा कमी पडू लागली.... शेजारचा गाळाही भाड्याने घ्यावा लागला .... आता कुठे त्याला मनासारखा नफा होऊ लागला ... धंद्यातील बारकावे समजू लागले... आत्मविश्वास वाढला.... शहरात त्यांचे नाव होऊ लागले....

          एक वर्षात त्याने हॉटेल एकदम नावारूपाला आणले. आता फक्त नाश्ता न ठेवता जेवणाचा मेनू ही ठेवावा असं त्याला आणि मित्राला वाटू लागलं.... पण परत जागेचा प्रश्न! आता त्याने आजुबाजूला कुठे मोकळी जागा भाड्याने मिळते का त्याचा अभ्यास सुरू केला.... बँकेच्या कर्जाचीही चौकशी सुरू केली..... या सगळ्यापासून त्याने आईबाबांना हेतूपुरस्सर दुरच ठेवले होते.... त्याला त्यांची मदत आता अजिबात नको होती.... दुखावला गेला होता तो! स्वतःच्या हिमतीवर सगळं करणार होता.

             वेदचा वाढदिवस आला.... आईने त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ केले.. रात्र होऊन गेली तरी तो अजून आला नव्हता... ती बेचैन झाली....

  "काम असेल का फार त्याला? की मुद्दाम आला नाही लवकर .... आपल्याला त्रास द्यायला आवडतं हल्ली त्याला.. नीट बोलत नाही की काही सांगत नाही." 

     रात्री दहाला तो आला. आईने त्याला पटकन आवरून घ्यायला सांगितले..... बाबांनी टेबलवर केक आणून ठेवला... आईने औक्षणाचे ताट तयार करून आणले... 

       वेद आवरून आला... आईने त्याला ओवाळले... बाबांनी केक कापायला सांगितला. 

   " कशाला आणला केक... केक कापला मी मित्रांबरोबर .... तुम्ही कशाला त्रास घेता माझ्यासाठी?" 

  " अरे, असे काय बोलतोस वेद, बाबा आहेत ते तुझे.... " 

  " बाबा आहेत.. मग काय केलं माझ्यासाठी? गेले वर्षभर मी मर-मर मरतोय... इतके कष्ट घेतोय..... एकदा तरी त्यांनी विचारले का? काही मदत तर दूरच पण साधी माझ्या हॉटेलची चौकशीही केली नाही... "

     " वेद, ते सगळं विसर बाळा, आणि ही घे तुझ्या वाढदिवसाची भेट! " 

    " काय आहे ते? मला नको काही तुमच्याकडून... "

  " अरे बाबा एवढे म्हणतात तर बघ ना उघडून पाकीट. "

    वेदने पाकीट उघडले.... जमिनीचे कागद होते आणि त्यात हॉटेलचा प्लॅन होता...

  " हे काय बाबा? हॉटेलचा आर्किटेक्टचा प्लॅन? असे पण जमीन तर गहाण होती ना?" 

" नाही रे बाळा. मी तुझ्याशी खोटं बोललो... मला माफ कर! तू नुकताच कॉलेज सुटून आलेला... काही अनुभव हाताशी नाही..तुला जर लगेच जमीन देऊन हॉटेल सुरू करायला पैसे दिले असते, तर तुला या व्यवसायातील सगळे बारकावे कसे समजले असते.... सुरुवात नेहमी छोटया गोष्टींपासून करावी.... या एका वर्षातील अनुभवावरून तू खूप शिकला आहे. माणसांची पारख, मार्केटचा अभ्यास, पैशांचा हिशोब आणि व्यवहार... हलाखीच्या परिस्थीतीतही तग कसा धरून ठेवायचा हे तू शिकला.... तुझ्या त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजपेक्षा जास्त ज्ञान तुला या अनुभवाच्या शाळेतून मिळाले आहे... आता तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम बनला आहे.... तू आता मोठी झेप घेऊ शकतो... "

   " वेद बाळा, तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे बाबा तुझ्या बरोबर होते बरं! गाळ्याचे डिपॉझिट त्यांनीच भरले होते तुला न समजू देता... तुला उधारी देणार्‍यांना बाबांनीच हमी दिली होती.... तुझ्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती त्यांना.... तू तुझ्या पायावर उभा रहावा म्हणुन खोटं बोलले रे ते..... मनावर दगड ठेवून केलं आम्ही हे सर्व! "

       " आई बाबा, मी चुकलो. रागाच्या भरात तुम्हाला नाही-नाही ते बोललो. पण तुम्ही माझी साथ सोडली नाही.... माझ्या आधाराच्या कुबड्या काढून घेतल्या म्हणुन मी आज चालायला शिकलो.... तुम्ही माझी साथ कधी सोडली नाही..... 

*आणि आज मला जाणीव करून दिलीत आई बाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात!* !!! !!!!! ::::::::!!!! ::::::::::!! :::::::::::!!!!!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi