*ओंजळ* 🤲
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली.
'महाराज, करतल भिक्षा घेत असत'
'करतल ' म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..
मला हा शब्द खूपच आवडला..
म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे 'करतल' असावे असे मनात आले.
करतल म्हणजे ओंजळभर !
आता हेच पहा ना..
खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.
इतकाच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.
आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..
खुप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा....
आणि कधी एखादा सलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करू शकतो.....
बाप रे... केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे....
म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.
तसेच दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची. समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि 'पसायदान' मागितले...l
खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात. म्हणुनच म्हटले जाते *तेथे कर माझे जुळती* 🙏🏼
No comments:
Post a Comment