Tuesday, 15 February 2022

Salutes

"एकतर्फी  प्रेमाची उत्कट व जिद्दीची कहाणी"


 स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाड्यातील एक गाव ,त्या गावातील एका गरीब ब्राह्मणाचे घर, भिक्षुकी करून कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या कुटुंबप्रमुखाची आपल्या मुलाकडून माफक अपेक्षा की शिकून-सवरून त्याने मोठं व्हावं नोकरी करावी आणि कुटुंबाचे पांग फेडावेत .पण तो मुलगा उनाड ,आई वडिलांच्या कष्टाची पर्वा न करणारा मॅट्रिकच्या परीक्षेत तीन वेळा नापास झाला. वडीलांनी  बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून लावले. कसा काय कोणास ठाऊक मजल दर मजल करत पंढरपूरला पोहोचला. उपाशीपोटी एका मठात शिरला ,संध्याकाळ उलटून गेलेली एक व्यक्ती विठ्ठल विठ्ठल चा गजर करीत वीणा हातात घेऊन फेऱ्या मारीत होती त्या व्यक्तीने  वीणा या मुलाच्या हाती दिली आणि सांगितले ही पवित्र वीणा कोणाच्या तरी  हातातच  द्यायची जमिनीवर ठेवायची नाही आणि ती व्यक्ती निघून गेली रात्रभर तो मुलगा विठ्ठल विठ्ठल  असा नाम जप करीत उपाशीपोटी वीणा हाती घेऊन फेऱ्या मारीत राहिला .पहाटे पहाटे कोणीतरी आलं, त्याच्या हाती वीणा देऊन तो बाहेर पडला 

अंतर्मुख झाला' दिव्यत्वाची प्रचिती' आली आणि घरी परतला .प्रामाणिकपणे अभ्यास केला उत्तम गुणांनी मॅट्रिक पास झाला व बनारस  हिंदू विश्व विद्यापीठात पुढचे शिक्षण घेण्याचा मनोदय त्याने वडिलांपाशी व्यक्त केला वडिलांची  ऐपत नव्हती पण त्यांनी कनवटीचे चार रुपये दिले. एक शर्ट एक धोतर पायात चप्पल नाही असा तो तरुण विद्यापीठात दाखल झाला.

 त्या काळात श्रीमंत सरदार उमरावांची मुले  बग्गीतून विद्यापीठात येत. , पण त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल कधीही न्यूनगंड निर्माण झाला नाही वार लावून जेवणे मन लावून अभ्यास करणे सुरू झाले. पहाटे गंगातीरी जाणे आपले कपडे तिथेच धूवून वाळवून तेच घालून येणे असा दिनक्रम सुरू झाला.

 इथेच त्याला त्याच्यासारखाच गरीब परिस्थिती असलेला मित्र भेटला. तो ही एकटाच एका गरीब वस्तीत खोली घेऊन राहत होता. त्याच्याजवळ सायकल होती ,हा कधी कधी त्याच्या सायकल वर डबल सीट बसून येत असे. एकदा त्याच्या खोलीजवळ आल्यावर हा म्हणाला "मला पाणी दे प्यायला" तो मुलगा कावराबावरा झाला, आणि रडू लागला "मी तुला पाणी देऊ शकत नाही मी हरिजन आहे "या मुलाने त्याला जवळ घेतले त्याचे डोळे पुसले; त्याच्या माठातील पाणी प्यायले ही मैत्री दोघांनी शेवटपर्यंत जपली. तो मुलगा होता "जगजीवन राम " जे भारताच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून गेले. भारताचे गृहमंत्री जगजीवन राम.

कॉलेजच्या बीए च्या शेवटच्या वर्षाला असताना कॉलेजमध्ये एक नाटक बसविण्यात आले या नाटकासाठी न्यायाधीश घालतात तसे दोन काळे डगले हवे होते जे प्राचार्यांकडे होते .ते त्यांच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी याच्यावर सोपविण्यात आली .

विद्यापीठाच्या आवारात प्राचार्यांचा आलिशान बंगला होता.' प्राचार्य पुणतांबेकर 'हे त्या काळातील शिक्षण क्षेत्रातील एक मोठे नाव, हा आवारात शिरला आणि त्याने दाराची कडी वाजवली .दार उघडले गेले एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी दारात उभी होती त्यानेच आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे "ती पाहताच बाला कलिजा खलास झाला " त्याच क्षणी मनात पक्के झाले की "लग्न करीन तर हिच्याशीच"

 विरलेला शर्ट जुनाट धोतर, ऐश्वर्याचं कोणतही चिन्ह चेहऱ्यावर नाही पण प्रचंड आत्मविश्वास ते डगले तो घेऊन आला पण रात्रभर जागाच राहिला मात्र त्याची मन:स्थिती अजिबात दोलायमान झाली नाही, काय करू काय नको असे त्याला अजिबात वाटले नाही .दुसऱ्या दिवशी प्राचार्यांच्या केबिन मध्ये जाऊन हजर झाला. सरांच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाला, "सर मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे "सर अवाक् झाले पण शांतपणे त्याच्याकडे पहात राहिले त्यांनी शिपाई बोलावून त्याला हाकलून लावले नाही, किंवा त्याच्या गरिबीचा उपहास केला नाही किंवा महाविद्यालयातून त्याला बेदखल केले नाही. त्याच्या भावनांचा आदर करून ते म्हणाले "माझे ठरलेले आहे की माझा जावई कलेक्टर असेल" हा म्हणाला "सर मला फक्त दोन वर्ष द्या" सर कबूल झाले .बीए उत्तम गुणांनी पास करून जिद्दीने अभ्यास करून हा तरुण आयसीएस झाला. हैदराबाद संस्थानात कलेक्टर म्हणून रुजू झाला. 

प्राचार्य पुणतांबेकर यांनी थाटात आपल्या लेकीचे याच्या बरोबर लग्न लावून दिले .हत्तीवरून वरात काढली .

हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध इतिहासकार लेखक समीक्षक 'कै. सेतुमाधवराव पगडी' होत. "जीवन सेतू "या त्यांच्या आत्मचरित्रात  अचंबित करणारी अलौकिक अशा एकतर्फी प्रेमाची अनुभूती देणारी सुंदर सत्यकथा आहे. 

  ©️ 

उर्मिला नाईकनिंबाळकर

14/02/2021

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi