Continue .सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या साठ वर्षांत नाट्य-कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे कलाकार राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले आहेत. अशी ही महत्त्वाची स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. खरे तर कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे आपण एकप्रकारे कोंडून बसलो होतो. परंतु यंदा ही स्पर्धा होत आहे याचा आनंद आहे. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद नाट्यरसिक मनमुरादपणे घेतील असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, नाट्य कलेचा प्रसार व्हावा या हेतूने राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ झाला. गेल्या साठ वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून तो हेतू प्रभावीपणे साध्य झाला आहे. कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन निरनिराळे उपक्रम राबवत आहे. नाट्यप्रयोगांना अनुदान, नाट्य प्रशिक्षण शिबिर, वृद्ध कलावंतांना मानधन अशा विविध योजना सांस्कृतिक खात्यामार्फत राबविल्या जात आहेत. राज्य नाट्य स्पर्धा तर उदयोन्मुख कलाकारांसाठी मोठी संधी असते. या कलाकारांना नाट्यरसिकांनीही प्रोत्साहन द्यावे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. यड्रावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य त्यांनी केले तर सह संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ९५० संघ/संस्था भाग घेणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000
No comments:
Post a Comment