Friday, 18 February 2022

 सिट्रस इस्टेट’ योजनेसाठी १३ कोटीच्या खर्चास मान्यता

- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

· पैठण तालुका फळरोपवाटिका प्रक्षेत्रावर कार्यक्रम अंमलबजावणी

            मुंबई, दि.१७ : पैठण तालुका फळरोपवाटिका येथील प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या कार्यक्रम अंमलबजावणीकरिता सन २०२१-२०२२ साठी रुपये १३ कोटी ०५ लाख इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या सन २०२१-२०२२ मधील मूळ तरतूदीच्या ५०% च्या मर्यादित रुपये ९ कोटी ९३ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती रोहयो, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

            फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे म्हणाले, राज्यात लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्र्यापाठोपाठ मोसंबी फळपिकाचे उत्पादन घेतले जाते. मोसंबी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. मराठवाड्यात मोसंबी पिकांसाठी अनुकूल हवामान, पीक पद्धतीचा विचार करता मोसंबी हे फळपिक शेतकऱ्यांना अधिक लाभदायक ठरते. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी उत्पादन घेतले जाते. त्यापैकी औरंगाबाद जिल्हा – २१ हजार ५२५ हेक्टर व जालना जिल्हा – १४ हजार ३२५ हेक्टर हे प्रमुख मोसंबी उत्पादक जिल्हे आहेत.

            श्री भुमरे म्हणाले,मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोसंबी फळपिकाचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठीचे क्लस्टर निर्माण करण्याची गरज विचारात घेऊन तालुका फळरोपवाटिका, पैठण, जि. औरंगाबाद येथील प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी "सिट्रस इस्टेट" स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

            या योजनेच्या सन २०२१-२०२२ मधील मूळ तरतूदीच्या ५०% च्या मर्यादित रुपये ९ कोटी ९३ लाख रुपये इतका निधी आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, पुणे यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi