अड्याळ उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी
- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील अड्याळ उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी या कामांचा सुधारित प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठकीत ठेऊन याबाबत मंजुरीची कार्यवाही जलदपणे करण्याची ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मंत्रालयातील जलसंपदा मंत्री यांच्यादालनात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ उपसा सिंचन योजनेस गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग म्हणून प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत बैठक झाली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.देवगडे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील म्हणाले,बह्मपुरी व नागभीड तालुक्यातील 21 गावांना सिंचनाची शाश्वत सुविधा मिळाल्यास या भागातील 3500 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येवू शकते.त्यामुळे या भागातील शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी केली आहे.अड्याळ उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लवकरात लवकर या प्रस्तावाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री.जयंत पाटील यांनी दिले.
योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा होईल
- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्रात उजव्या मुख्य कालव्यावरून कायमस्वरूपी सिंचन सुविधा मिळावी, अशी या भागातील 24 गावांची,ब्रह्मपूरी व नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या24 गावातील परिसरात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नाही त्यामुळे या प्रकल्पापासून ही गावे सिंचनापासून वंचित आहे. या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता गावासाठी उपसा सिंचन योजना निर्माण करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार ही उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली असून योजनेच्या लाभक्षेत्रात अड्याळ तुकुम, अड्याळ गावगन्ना, गावगन्ना, चोरटी, वायगाव, भगवानपुर, साखरा साखराचक, रानपरसोडी, दुधवाही, चांदगाव, धमनगाव, हत्तीलेंढा, पार्डी, कोसंबीचक, नवेगावपांडव किरमीटी,वसाळामक्ता, भिकेश्वर, गोवारपेठ, तेलणडोंगरी ही गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या भागात कायमस्वरूपी सिंचन सुविधा मिळाल्यास या भागातील ३५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येवून येथील शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल. या प्रस्तावाबाबत योग्य त्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. अड्याळ उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रस्तावांना मे महिन्यापर्यंत मान्यता मिळेल ही योजना सोलरवर कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेचा विद्युत खर्च कमी व्हावा म्हणून सोलर सिस्टीम पंप बसविण्याचे प्रस्तावित आहे.या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीच्या प्रस्तावाबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
यासाठी निधी प्राप्त व्हावा, अशी मागणी बैठकीत श्री. वडेट्टीवार यांनी केली. ह्या योजनेस नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर योजनेस मे महिन्यापर्यंत मंजूरी प्राप्त होईल. ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याचेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
****
No comments:
Post a Comment