सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी
समाज प्रबोधक श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे कार्य करून हे जग सुखी व्हावे व राष्ट्र पुढे जावे यासाठी कार्यरत आहे.
याच कार्याबरोबर जीवनविद्या मिशन ही शासनासोबत ग्राहक संरक्षण, अवयव दान, विविध व्यसनांच्या दुष्परिणाबाबत जागृतीसह गावांचा सर्वांगिण विकास करणे व सर्वच बाबतीत दत्तक घेतलेली गावे आदर्श गाव बनविणे या उद्देशाने ग्रामसमृद्धी अभियान तसेच शेतकरी आत्महत्या थांबविणे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मानसिक सबलीकरण असे अनेकविध अभियाने संयुक्त विद्यमाने राबवित आहे. त्याचबरोबर विविध कार्पोरेट व सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्येही अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी Enjoy Your Work, Stress Management या विषयाबाबतच्या कार्यशाळा आयोजित करून जीवनविद्या मिशन कार्य करीत आहे.
भारत देशाचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरु केले आहे. त्यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आले. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेवून त्या गावाचा सर्वांगीण विकास करणे व ते गाव सर्वच बाबतीत आदर्श गाव बनविणे याकरिता ग्रामसमृद्धी अभियान राबविणेबाबतचा प्रस्ताव जीवनविद्या मिशनने शासनास सादर केला आणि जीवनविद्या मिशनने केलेल्या कामांची दखल घेत त्यास मान्यता दिली.
याअन्वये आता प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी व समृद्ध करून प्रत्येक गाव सक्षम करत गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी संस्था, उद्योग समूहाचे आर्थिक सहकार्य मिळवून, गावातील भौतिक विकास कामे करण्याकरिता जीवनविद्या मिशन या संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे कार्य करणार आहेत.
No comments:
Post a Comment