महाराष्ट्र चेंबरने राज्यातील शिक्षण संस्था व उद्योगजगताच्या विकासाकरीता समन्वय साधावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
--------------------------------
उद्योगांच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी वर्षभरात ३०००० विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार: ललित गांधी
---------------------------------
राज्यातील उद्योग, व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनाबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबरने राज्यातील शिक्षण संस्था व उद्योगजगताच्या विकासाकरीता समन्वय साधावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या व उद्योग, व्यापार क्षेत्रांकडून उपलब्ध करून देण्यात येणारे रोजगार तसेच शिक्षण संस्था आणि व्यापार, उद्योग यांचा योग्य तो समन्वय साधण्याचे कार्य महाराष्ट्र चेंबर करेल असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन उद्योगांला प्रशिक्षित मनुष्यबळ, कौशल्याधारित शिक्षण, सरकारने सुरु केलेल्या विविध योजना व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या याविषयावर चर्चा केली.
महाराष्ट्र राज्याला अग्रेसर राज्य बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या भरीव कार्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर राबवित असलेल्या बिझनेस सोल्युशन पॉलीक्लिनिक प्रोग्राम ( BSPP ) या उपक्रमाबद्दल माहिती दिली व उद्योगांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज तसेच विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाधारित कौशल्यावर चांगली नोकरी मिळण्याकरीता येणाऱ्या वर्षभरात ३०००० विध्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटर्नशिप उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाअंतर्गत विध्यार्थ्यांना उद्योगांशी जोडण्यासाठी उद्योगांची प्रक्रिया, उत्पादन, आव्हान क्षेत्र, उद्योगात येत असलेल्या विविध अडचणी यासारख्या आवश्यक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरने जाहीर केलेल्या महिला उद्योजकता धोरणाची थोडक्यात माहिती देऊन, महाराष्ट्र चेंबर महिलांकरीता राबवित असलेल्या कार्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
राज्यातील ६ विभागात महाराष्ट्र चेंबर उभारीत असलेल्या क्लस्टरची व त्यामधून सुक्ष्म, लघु उद्योगांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी दिली.
शिष्टमंडळात ट्रस्ट बोर्डचे आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, रवींद्र माणगवे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, सरकार्यवाह सागर नागरे होते.
No comments:
Post a Comment