महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, भ्रूणहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.
लिंग समानता चळवळीच्या सावित्रीबाई आधारस्तंभ : डॉ. नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. लिंग समानतेच्या चळवळीचा सावित्रीबाई फुले आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून समाज एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श निर्माण केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पुतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील यासाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment