महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव
नवी दिल्ली, 22 : राष्ट्रपती आणि तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ प्रदान करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार प्रदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.
परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक
महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप बापट यांना परम विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नेतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.
००००
युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
अभिषेकने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 22 :- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या युवकाने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.
*****
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. 22 : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.
पुढील आठवड्यात लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी सिंगापूर विमानसेवा सुरु होत आहे. यासाठीही मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे, असेही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले.
तसेच सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग तसेच पोलिसांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
००००
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू
मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
...
No comments:
Post a Comment