Friday, 29 October 2021

 जमीन जुमला 

तुमचा एखादा मोकळा प्लॉट आहे. 


एखाद्या दिवशी रात्रीत तिथे कुणीतरी कंपाउंड मारून बाहेर 'हि जमीन ---- च्या मालकीची आहे" असा बोर्ड लावतं. 


दुसऱ्या दिवशी तुमच्या ते लक्षात येतं. तुम्ही त्याला विरोध करायला जाता. 

तो स्थानिक गुंड असतो. एखाद्या आमदार खासदाराचा कार्यकर्ता असतो, किंवा थेट एखाद्या मोठ्या नेत्याचा जवळचा असतो. तो तुम्हाला धमक्या देऊन पिटाळून लावतो. सोबतच आम्ही हा प्लॉट काही वर्षांपूर्वी ईसार देऊन घेतला होता असा एखादा कागद सुद्धा दाखवतो. 


काही ठिकाणी अशा प्रकारे विरोध करणाऱ्या जमीन मालकाला हाकलवून न लावता थेट त्याचा मुडदा पडला जातो. मुंबईजवळ असे प्रकार नित्याचेच आहेत. पुण्यातही असे प्रकार आता वाढायला लागले आहेत. 


मुडदा पाडला तर प्रकरण इथेच संपेल पण आपण तो गुंड बिचारा सभ्य आहे असे समजूया... किंवा तो फक्त धमकावण्यापुरता किंवा मारहाण करण्यापुरताच डेरिंगबाज आहे असे समजूया. 


आता तुमच्याकडे पर्याय काय? 


तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाता. तक्रार करता. ते जुजबी तक्रार लिहून घेतात. संबंधिताला कॉल करतात. तो ती खोटी कागदपत्रे दाखवतो. मग पोलीस तुम्हाला सांगतात कि आम्ही तक्रार घेतो पण त्यांच्याकडेही कागदपत्रे आहेत. तुम्हाला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. 


मग तुम्ही कोर्टात जाता.  कोर्ट त्या जमिनीला स्टे देतं. आहे तशी परिस्थिती ठेवा सांगतं. पण आहे ताशा परिस्थितीत त्याचाच ताबा असतो. 


हा स्टे म्हणजे तुम्ही सुद्धा त्या जमिनीचा कोणताही व्यवहार निकाल लागेपर्यंत करू शकणार नाहीत.  जर समजा तुम्ही ती जमीन तुमच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी गुंतवणूक म्हणून घेतलेली असेल तरी तिला आता काही अर्थ राहिलेला नसेल. कोर्टात निकाल लागेपर्यंत तुमचा त्या जमिनीवर अधिकार काहीच नसेल. 


आता ती जमीन तुमची आहे हे  सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खटपटी कराव्या लागतात. तुम्ही कितीही खरे असलात तरी न्यायालयात तुम्ही खरे आहात हे सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पुरावे गोळा करावे लागतात. तुमच्या लक्षात येत नाही कि कालपर्यंत सगळं छान चाललं होत, आज अचानक काहीच हाती नसल्याची जाणीव होत आहे. तुम्हाला नैराश्य यायला लागतं. पण खटपट करण्याशिवाय पर्याय नसतो.  


हि खटपट किमान १०-१५ वर्षे चालणार असते. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय...  यात लाखोंचा खर्च होणार असतो. तरी तुम्ही दोन तीन वर्षे लढता, पण हळू हळू ताकद संपायला लागली कि थकायला लागता. 


मग समोरून तुम्हाला सेटलमेंटची ऑफर येते. मार्केट रेट पेक्षा २०-२५ टक्के घेऊन शांत बसायला सांगितलं जातं. तुम्ही झक मारत सेटलमेंट करता.  

प्रकरण इथे संपले, पण विषय नाही संपला... 


तो गुंड ज्याच्या पाठिंब्यावर तिथे पाय रोवून उभा असतो, पोलिसांना आपल्या ताटाखालचं मांजर बनतो तो पाठिंबा स्थानिक नेत्याचा असतो ज्याला आपणच पाचशे-हजार रुपये घेऊन निवडून दिलेलं असतं.   


तो पोलीस तुम्हाला कोलून त्या गुंडाची साथ निभावत असतो तो पोलीस खरं तर आपल्या संरक्षणासाठी आपल्याच हक्काच्या पैशातून दिल्या जाणाऱ्या पगारावर नियुक्त असतो, पण त्याला नियंत्रणात ठेवणारा नेताच फितूर असल्यामुळे पोलिसावर कोणतंच नैतिक दडपण राहिलेलं नसतं.  


तो गुंड जेव्हा तुमच्या जमिनीवर ताबा घेतो तेव्हा तो तुम्ही कोणत्या पक्षाचे, नेत्याचे समर्थक आहात हे बघत नाही, त्याच्या दृष्टीने तुम्ही एक सामान्य नागरिक असता, ज्याच्यावर दडपशाही करण्याचा अधिकार त्याला त्याच्या नेत्याने दिलेला आहे. 

जेव्हा तुम्ही त्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जात तेव्हा तो पोलीस तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात हे बघत नाही, तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक सामान्य नागरिक असता ज्याला लुबाडणे हे त्याचे कर्तव्य आहे. 


तुम्ही जेव्हा न्यायालयात दाद मागायला जात तेव्हा न्यायाधीश तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात हे पाहत नाहीत, ते सरसकट सगळ्यांनाच १०-१५ वर्षे न्यायालयात चकरा मारायला लावतात... 


तुम्ही त्या गुंडाच्या डोक्यावर हात असणाऱ्या नेत्याकडे जरी गेलात आणि तुम्ही त्याचे किती मोठे समर्थक आहात हे तुमच्या सोशल मीडियावरील पोस्ट वाचून दाखवुन त्याला पटवून दिलं तरी तो 'बघतो मी' एवढं बोलून तुम्हाला वाटं लावतो आणि नंतर त्या कार्यकर्त्याला प्रकरण लवकर संपवून माझा हिस्सा आणून दे असा मेसेज पाठवतो.  


सोशल मीडियावर एखाद्या पक्षाची बाजू घेताना तुम्ही एखाद्या लढाईच्या मैदानात असल्याचा फील येत असेल, मी बघा कशा मोदीला शिव्या घातल्या, कसा ठाकरेवर तुटून पडलो, असं वाटत असेल. पण तुम्ही त्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या खालच्या स्तरावरील सैनिक असता कि ज्याचे अस्तित्व त्या नेत्याच्या लेखी 'मरण्यासाठी ठेवलेली पहिल्या रांगेतली फौज' यापेक्षा जास्त नसते. तुमच्या असण्याने किंवा नसण्याने त्यांना घंटा काही फरक पडत नसतो. तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नसता. पण हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा अशा प्रकारे आपल्याला जाणीव करून दिली जाते कि तू कुणीही असला, तुझी जात धर्म पंथ प्रांत वर्ग काहीही असलं तरी आमच्यासाठी फक्त एक नागरिक आहेस ज्याला लुबाडणे हेच आमचे कर्तव्य आहे.


~ श्रीकांत आव्हाड

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi