एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना
३० व ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई, दि.29:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करावा लागणार असून त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षेसाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हेही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरिता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
0000
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूर
मुंबई, दि. २९ : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील दहावी पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली ही रक्कम महाडीबिटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यास सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाते.शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये मंजूर झाल्याने विद्यार्थी स्तरातून श्री. वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
0000
No comments:
Post a Comment