Saturday, 25 September 2021

 बार्टी कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

बार्टीचे विद्यार्थी यावर्षी यूपीएससी. परीक्षेत  यशस्वी

               मुंबई, दि. 25 : लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्याअनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. दिल्ली येथील नामांकित संस्था, यशदा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना पूर्व तथा मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीकरीता व व्यक्तिमत्व परीक्षेच्या तयारीकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. कोरोना महामारीच्या संकटात सुद्धा महासंचालक श्री. गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीने व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच महासंचालक श्री. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले होते. बार्टी संस्था युट्यूबद्वारे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देत आहे. तसेच यूपीएससी मुलाखतीचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देणारी बार्टी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. 

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील यशस्वी विद्यार्थी

            यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

            बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बार्टीच्यावतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  मंत्री श्री. मुंडेमहासंचालक श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत कार्य उत्तीर्ण अधिकाऱ्याने करावे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी आपण कार्य करावे आपण यशस्वी झालात बार्टी संस्थेला आपला अभिमान वाटत आहे, अशा शुभेच्छा महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिल्या. बार्टी संस्थेच्यावतीने येरवडा संकुल येथे अद्ययावत यूपीएससी स्पर्धा परीक्षेचे निवासी केंद्र लवकरच सुरु करणार असल्याची माहिती महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिली. 

      यशस्वी विद्यार्थ्यांनी बार्टीने केलेल्या सहकार्यामुळे आज आम्ही यशस्वी झालो असल्याचे सांगून बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. गजभिये यांचे आभार व्यक्त केले आहे. रुपेश शेवाळे व मुकुल कुलकर्णी (आयआरएसयांनी आपला अमूल्य वेळ काढून बार्टीतील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रिया पवार यांनी ऑनलाइन मुलाखतीचे आयोजन व नियोजन  यशस्वीरीत्या केले त्यांचेही श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi