शेतकर्यांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला!
डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
मुंबई, 27 जुलै
डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकर्यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादनं, त्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन आणि संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. संघर्ष करताना त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्यासारखी होती. एकदा एखादा विषय त्यांनी हाती घेतला की मग त्यातून ते माघार घेणार नाहीत, हे सर्वांना ठावूक असायचे. नागपूरकरांसाठी ते सोयामिल्कचे संशोधक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध होते. विविध फ्लेवरयुक्त सोयामिल्क पिण्याची सवय त्यांनी नागरिकांना लावली. हे दूध आरोग्यदायी आहे, असे ते तास न् तास समजावून सांगत असत. मोहफुलांच्या पावडरचा चहा त्यांनी शोधून काढला. शेतकर्यांच्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिकचा पैसा शेतकर्यांना मिळावा, हाच त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.
*********
No comments:
Post a Comment