गेले ते दिन गेले
खरचं बालपण किती सुंदर शब्द आहे ना. नुसत आपल बालपण आठवल तरी मनाला किती आनंद वाटतो. एप्रिल मे महिन्याची शाळेला सुट्टी मिळाली की किती तो दंगा असायचा आमचा. सारे मित्र मैत्रिणी एकत्र येवून सुट्टीचा छान बेत आखायचो.
कुठे फिरायला जाणे, तर कधी कुणाच्या
घरी जावून खेळणे. तेव्हा मोबाईल, टिव्ही हे फारशा प्रमाणात नव्हतेच त्यामुळे वडिलधारी
माणस सुध्दा मुलांसोबत राहून गप्पा गोष्टी, खेळ वगैरे खेळत असत. ना तेव्हा कधी समर
कॅम्प होता ना कसला व्हॅकेशन क्लास. पण आताच्या मुलांच मात्र बालपण हरवलय जणू....
सुट्टीचा
आनंदही त्यांना उपभोगता येत नाही. वर्षभर अभ्यास करणारी मुल एप्रिल मे महिन्याच्या
सुट्टीतही समर कॅम्प, व्हॅकेशन क्लासच्या रुपाने अभ्यास करीत असतात. मग ते त्यांच्या
बालपणाचा आनंद घेणार कसे आणि कधी ? खर तर आपण पालकच त्यांच्यावर अभ्यासच ओझ टाकत असतो.
वर्षाचे १२ ही महिने त्यांना अभ्यास करायला सांगत बसतो. प्रत्येकाला एवढच वाटत की दुसयाच्या मुलापेक्षा
माझं मुल हुशार असावं. त्यासाठी आपण आपल्या मुलांचं बालपणच हिरवून घेत आहोत.

पुर्वी सुट्टीत
आंबे, फणस, जांभ, चिंच, जांभुळ, करवंद अशा अनेक रानमेव्याचा आस्वाद घ्यायला जंगलात,
वाड्यांमध्ये फिरायचो. दुपारच्या वेळेत मित्र मैत्रिणी घरातून वेगवेगळे जिन्नस आणून
दगडांची चुल मांडून भातुकलीचा खेळ खेळायचो. कैरीचे तिखट मिठ घालून करंबूस, करवंद झाडावर
बसनू पानांचे द्रोण बनवून एकमेकांना देवून आनंद मिळवायचो.
भरती ओहोटी पाहून समुद्रात पोहायला
जाणे तर कुठे ओढ्यावर, तलावात, पोखरणीमध्ये डुंबायला जायच. कधीही हात न धुता रानमेवा
न धुता कधीही आजारी पडलो नाही की साधी शिंक आली नाही. विटी दांडू, गोट्या, तळ्यात मळ्यात
असे ग्रामीण खेळ खेळायचो. बैलगाडीतून शेतात जायचो. रात्री गाण्याच्या भेंड्या, पत्ते,
सारीपाट, सागरगोटे असे खेळ खेळायचो. मे महिना आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, आत्या
मावशी अशा सर्वांसोबत मजेत जायचा. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदाची बट्टीच असायची.
पण आताची मुल मात्र मॅगी, कुरकुरे,
लेस आणि अशा अनेक प्रकारचे फास्ट फुड खाण्यातच दंग झालेली दिसतात. खरतर आपणच आपल्या
मुलांना रानमेव्याच महत्त्व पटवून दिल पाहिजे. त्यांना सुट्टीचा आनंद मनोसोक्त घेवून
दिला पाहिजे. ना कसला क्लास, ना कसला कॅम्प, ना मोबाईल फक्त गप्पा टप्पा, मस्ती आणि
दंगा. आपण आपल्या लहानपणी जे खेळ खेळलो ते आपल्या मुलांसोबत खेळायला पाहिजे. त्यांच्या
सोबत आपणही लहान होवून जगल पाहिजे. फक्त २ महिन्याच्या कालावधीत मुलांना आनंदाचे क्षण
दिले तर वर्षभर त्या आठवणीने आपली मुल खूप छान प्रकारे अभ्यास करतील.
मी तर हा
अनुभव माझ्या मुलीसोबत घेतलाय तुम्हीपण घेवून बघा.....
- गीता
Nice...Geeta
ReplyDeleteShanbhar balpanatach aathavale
ReplyDeleteKhup chhan ..
ReplyDeleteNice khupch sundar ������
ReplyDeleteKhupch chan
ReplyDelete