पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा अहवाल सादर करावा
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, दि. 15 : पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सबंधित यंत्रणेला दिले
विधानभवनात लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व निगडी, पुणे येथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले, कामगार आयुक्त एच.तुम्मोड, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त वा.व.वाघ, पुण्याचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी चौकशी पथकाची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, पोलीस क्राईम विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त, अपर कामगार आयुक्त पुणे, सहकारी संस्थेचे उपनिबंधक, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश करावा. या पथकाने चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
00000
मोहिनी राणे/ससं/
वृत्त क्र. 2030
नागरिकांनी नागरी संरक्षण दलात
स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. 15 : राज्यात जास्तीत जास्त नागरीकांनी नागरी संरक्षण दलात "स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. पोलीस कुटुंबातील माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस बॉईज आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील इतर सदस्य, माजी सैनिक यांना जास्तीत जास्त प्रमाणात नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरी संरक्षण कायदा 1968 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेले, प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नागरिक नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. स्वयंसेवक पदासाठी भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. तसेच पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक असावा, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
आपआपल्या सोसायटी, विभागामध्ये आस्थापनेत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून प्रशिक्षण घेण्यात यावे. त्याचप्रमाणे आपापल्या सोसायटी विभागामध्ये, आस्थापना यामध्ये नागरी संरक्षण दलातील अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने मॉकड्रिलचे आयोजन करण्यात यावे. आपल्या विभागातील विविध अति महत्वाचे व्यक्ती असलेल्या डॉक्टर, इंजिनियर, वकील आदींची नागरी संरक्षण दलामध्ये नोंदणी करून त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच आपापल्या विभागातील कॉलेजमधील विद्यार्थी, सोसायटी सुरक्षा रक्षक दल, सामान्य नागरीक यांची जास्तीत जास्त संख्येने नागरी संरक्षण दलात मानद स्वरूपात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहनही नागरिक संरक्षण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.