Sunday, 2 March 2025

गेले ते din गेले

 मी साधारण 1963/64 ते आता 2024 पर्यंतचे अलिबाग अनुभवते आहे. खूप मोठ्या कालावधीची साक्षीदार बनले आपोआप. मुद्दाम कधी विचार केला जात नाही की काय आणि किती बदलले… सगळेच. आज मात्र सगळ्याचा लेखाजोखा मांडायला बसले आहे.


एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग.


नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची… म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी… असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब.


ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती. साठवणीच्या खोल्या वेगळ्या. त्यात वर्षभराची बेगमी धान्ये, लोणची, मसाले अशी महत्त्वाची साठवण असे. बाकी मग खोल्यातून एखादा पलंग, गाद्या, उशा, पांघरूणे यांची चळत, कपड्यांची कपाटे वगैरे.


मागची पडवी त्या जवळ मोरी, म्हणजेच बाथरूम. घरातील मंडळींसाठी बंदिस्त केलेली. त्या बाथरूमही वैशिष्टयपूर्ण असत. दगडी दोणी पाणी साठवण्यासाठी. एका बाजूला चूल किंवा जरा वरील स्तरातील घर असेल तर पाणी तापवण्यासाठी तांब्याचा बंब यासाठी राखीव जागा. लाकडांचा, धुराचा, साबणाचा, शिकेकाईचा एक मिश्र गंध कायम जाणवत असे.


एकेका समाजाची विशेष रचना. माळी, शेतकरी यांची वेगळी, ब्राह्मणांची वेगळी आणि कोळ्यांची आणखी वेगळी. घरांच्या रचना आणि जरूरीची अवजारे एवढाच फरक. कायस्थांची घरे ही खूप. समान धागा म्हणजे स्वच्छता. आगरी, माळी, कायस्थ, ब्राह्मण कोणीही असो कोकणवासी मंडळी घर आंगण लख्ख ठेवण्याबाबत जागरूक. घरासमोर धूळ केरकचरा अजिबात दिसणार नाही. अगदी साधे गरिबाचे घर असेल तरी अंगणाच्या कडेला दोनचार रोपे तरी खोचलेली नक्की दिसतील. तुळस, तगर, जास्वंदी असणारच. हिरवाईची आवड ही कोकणी माणसाच्या रक्तातच मुरलेली. ज्यांचे आवार मोठे ते आनंदाने शक्य ती लागवड करत. एखादा हापूस, पायरी आंबा, शेवगा, नारळ, सुपारी, कोकंब, रामफळ, सीताफळ, चाफा अशी झाडे दारोदारी दिसत. ज्यांच्या वाड्याच आहेत ते सुख काय वर्णावे? हजार-पाचशे नारळ सुपाऱ्या यांची झाडे. बाग शिंपण्याचे काम मोठे. मग काटेकोरपणे आळ्या पाडून पाणी वाहते ठेवण्याची सुरेख व्यवस्था. शिपणानंतर बाग अत्यंत प्रफुल्लित, प्रसन्न जाणवते. मी आमच्या लहानपणी ज्या मोठ्या वाड्या पाहिल्या त्यातील रहाटगाडगे हा आम्हा मुलांचा फार आकर्षणाचा विषय असे. एका बाजूला डोळ्यांना झापड लावलेला बैल गरगर फिरत राही आणि त्यामुळे विहिरीवर रहाटगाडगे फिरून मोठ्या दगडी डोणीत छोट्या घागरी रिकाम्या करत राही. त्याचवेळी वाडीचे शिंपण होत असे. ते बघत बसायला मजा येई. पण जसे मोठे झालो त्या बैलाची दया यायची. काही तास त्याचे ते गरगरणे मनाला अस्वस्थ करे. असो.

नुसते घर स्वच्छ नाही तर एकूणच कोकणातील माणूस शरीर स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक. शेतावरून, कामावरून आले की संध्याकाळची आंघोळ ठरलेली. डॉ. विठ्ठल प्रभू यांनी त्यांच्या अभ्यासात या विषयी नोंद करून ठेवली आहे. स्वच्छ सवयींमुळे होणारे स्त्रियांचे प्रश्न कोकणातील स्त्रियांना कमी भेडसावतात. हा एक महत्वाचा गुणच.


अलिबागमध्ये वीज 1961/1962 मध्ये आली. त्याआधी चिमण्या, कंदील यांची गरज मोठी. रस्त्यावरही थोड्या थोड्या अंतरावर खांबावर तेलाचे दिवे लावले जात. त्यासाठी नगरपालिका खास माणूस नेमत असे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस, घरोघरी दिवे ही चैनच होती. गॅस घ्या हो असे सांगायला कंपनीची मंडळी घरोघर जात असत आणि मिनतवारी करून विक्री करत. आता जराशा निमित्ताने होणारा झगमगाट पाहताना कधीतरी हे आठवले की कालचक्राची गंमत वाटते खरी.

शिक्षणाबाबत बोलायचे तर त्यावेळी अलिबागेत शाळा अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, जानकीबाई रघुनाथराव हळदवणेकर कन्या शाळा आणि मुलांसाठी इंडस्ट्रिअल हायस्कूल. तीनच शाळा. लोंढे गुरुजींनी एक खूप सुंदर प्राथमिक शाळा सुरू केली साधारण 67/68 साली. त्या शाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ती खूपच लवकर नावारूपाला आली. जनता शिक्षण मंडळ यांच्या तर्फे नलिनी कुवळेकर यांनी बालवाडी याच सुमारास सुरू केली. अगदी चार मुलांना घेऊन सुरुवात झालेली ती शाळा ‘कुवळेकर बाईंची शाळा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. हळूहळू प्रगती करत संपूर्ण प्रायमरीचे वर्ग तेथे सुरू झाले. मान्यता मिळाली, शिक्षकांना समाधानकारक वेतन मिळू लागले. कुवळेकरबाई मात्र तेव्हा निवृत्त झाल्या. त्यांनी एक मोठे योगदान दिले. अलिबागजवळील अष्टागरातील मुले हायस्कूलसाठी वर उल्लेखलेल्या दोन शाळांमध्ये येत. बहुतांशी चालतच यावे लागे. पावसाळ्यात त्यांचे फारच हाल होत. कोकणातला पाऊस. बरेचदा संततधार लागलेली असे. छत्री असली जरी तरी तिचा शून्य उपयोग. मुले संपूर्ण भिजून येत आणि ओले  कपडे अंगावरच वाळवत.


कॉलेजही तेव्हा एकच. J. S. M. College ची स्थापना 1961 मध्ये झाली. पेण, रोहा, रेवदंडा सगळीकडून विद्यार्थी येत. मला आठवतंय एक हजार विद्यार्थी संख्या झाली या विशेष आनंदात कॉलेजला सुट्टी दिली होती. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तीनही फॅकल्टीज उत्तम सुरू होत्या. खरोखर उत्तम प्रोफेसर वर्ग संस्थेने निवडला होता. त्यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आर. टी. कुलकर्णी. पुण्यात प्रोफेसर असणारे आणि समोर अत्युच्च संधी सहज मिळत असताना त्यावेळेच्या खेडेगावात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एक द्रष्टा माणूस संस्थेला लाभला. प्रिन्सिपॉल पदावर असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं असावं याचे ‘आरटीके’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही. हसतमुखाने अतिशय सौम्य शब्दात बोलणाऱ्या सरांचे विद्यार्थ्यांना प्रेम, आदर तर होताच पण जरबही होती. कितीही उनाड मुलगा असू दे या सरांसमोर कधीही उलट बोलण्याचे, वागण्याचे धाडस मुलांनी केले नाही. ते उत्तम शिक्षक होतेच तसेच त्यांनी विचारपूर्वक कॉलेजही घडवले. विद्यापीठातर्फे ज्या काही स्पर्धा घेतल्या जात त्या सगळ्यात मुलांनी भाग घ्यावा, तयारी करावी, हे विश्व अनुभवावे हा त्यांचा आग्रह असे. मैदानी खेळ असोत वा शैक्षणिक स्पर्धा. मुले तयार व्हावीत यासाठी तयारी करून घेतली जायची. उत्तम जिमखाना, लायब्ररी, प्रयोगशाळा या कॉलेजमध्ये घडल्या. टेनिस आणि बास्केटबॉल सारखी मैदाने घडली. स्थानिक मुले कबड्डी खेळात अग्रेसर होती. त्यांना विशेष कोचिंग मिळाले. ती टीम विद्यापीठात नाव, दबदबा कमावू लागली. क्रिकेट, बास्केटबॉल स्पर्धांना मुले वेगवेगळ्या ठिकाणी पोचू लागली. सरांनी अतिशय द्रष्टेपणा दाखवून धोरणे राबवली. मुख्य म्हणजे त्यांनी कॉलेज हे राजकारण्यांचा अड्डा कधीही बनू दिला नाही. राजकारण चार हात दूरच ठेवले आणि कॉलेज आवारात वातावरण निकोप ठेवले. आर.टी. कुलकर्णी सरांनी संस्था सर्व अर्थानी एका उंचीवर नेली हे नि:संशय.


अलिबागमधील खाद्य जीवनाबद्दल बोलायचे तर किती छोट्या सहज सोप्या आठवणी आहेत. एक निसर्गदत्त विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेले हे गाव. मत्स्यप्रेमींसाठी स्वर्ग. ताजी फडफडीत मासळी रोज मिळणारच. आगरी, माळी, मराठा लल(कुणबी) समाज मोठा. मासळीशिवाय एक दिवसही न राहू शकणारे अनेक अनेक लोक आहेत. म्हणजे उपास असला आणि नाईलाज असला तर चुलीत सुका बोंबील भाजत ठेवून त्या वासावर जेवणारी माणसे आजही मला माहिती आहेत.


पोह्याचे पापड, तांदळाचे पापड, ओल्या ताज्या फेण्या साईच्या दह्याबरोबर या येथील खास गोष्टी. या पट्ट्यात कडवे, गोडे वाल भरपूर पिकतात. सर्वच मंडळींना वाल अतिप्रिय. आमच्या बाप्पाला सुध्दा मोदकांबरोबर डाळींब्यांचा नैवैद्य लागतो. अळुवड्या, अळूची पातळ भाजी हवीच. ओल्या वालाचे दाणे, वांगी, शेवग्याची शेंग ही मिश्र भाजी प्रसिध्दच. अनेक समाजाच्या लोकांना लग्नाच्या जेवणातही लागतेच लागते. अलिबागचा गोड पांढरा कांदा हा आता सगळीकडेच मोठी मागणी मिळवतो आहे. शेतकरी ठराविक काळात याचे उत्पन्न घेतात. तो हा हा म्हणता संपूनही जातो. विशिष्ट पद्धतीने माळा बनवून तो विकतात. उन्हाळ्यात घरोघरी या माळा लटकलेल्या असतात.

खाद्य जीवनाच्या आठवणी काढतेच आहे तर आमच्या अलिबागचे भूषण म्हणावे अशा मयूर बेकरीचा उल्लेख अपरिहार्य आहे. कोळीवाडा किंवा अजून एखाद दोन ठिकाणी छोट्याशा बेकरी होत्या. पाव, बटर, खारी मिळत. पण सुखवस्तू, शिक्षित कुटुंबातील एका सुनेने वेगळा विचार केला. सुलभ सोपे आयुष्य होते, काही करावेच तर शिक्षिका होतीच ती मुलगी. इंग्लिश विषय हायस्कूलमध्ये शिकवत होती. पण बेकरी कोर्स करू असा विचार करून एक अवघड वाट तिने निवडली आणि यशस्वीपणे परत येऊन स्वतःची बेकरी सुरू केली. एक अत्यंत देखणी वास्तू उभारून प्रशस्त, मोठे दालन उघडले. आज बेकरीतील सर्व उत्तम पदार्थ अलिबागकरांना उत्तम दर्जा आणि रास्त दरात उपलब्ध आहेत. ते अलिबागमध्ये एक प्रेक्षणीय स्थळ यादीत येते आणि हे सुध्दा चाळीस पन्नास वर्षापूर्वी निर्माण झालेय.


हॉटेल व्यवसाय मात्र त्याकाळात अजिबात भरभराटीचा नव्हता. मोघे खानावळ, कुंटे खानावळ या दोन खानावळी लोकांना पोटभर अन्नदान करत. पाटील खानावळ सामिष जेवणासाठी पर्वणी. मात्र याशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नव्हते.

काळ हा हा म्हणता बदलत गेला. सारी दुनियाच बदलली. आमचे हे चिमुकले गावही कात टाकून नवेच झाले अगदी. किती किती काय काय बदलावे हो?


राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स ही फार मोठी कंपनी अलिबागेत थळ येथे आली. गाव बदलायला लागले. स्थानिक भरती झालेच पण विविध प्रांतीय लोकही आले, राहिले, रुजले. त्यांची त्यांची संस्कृती घेऊन तेथे नांदू लागले. ज्या एस टी स्टँडवर मराठी वर्तमानपत्रच दिसत तेथे आता कन्नड, तमिळ, बंगाली… असे सर्वभाषिक पेपर्स सर्रास मिळू लागले. एक काळ होता, की मुंबईत अलिबागला जाणाऱ्या बसमध्ये अर्ध्याहून अधिक माणसे ओळखीची असत. अलिबागचा एकही रस्ता असा नसे जेथे आपल्याला ओळखणारे कोणी नाही. आता मात्र अशी परिस्थिती आली. लोकसंख्या इतकी कशी बुवा वाढली ? कोठून आले इतके लोक? प्रश्न पडू लागले.

आता गावाचे शहरीकरण वेगाने होऊ लागले. छोटी टुमदार घरे नाहीशी झाली.  घरांची गरज वाढली त्यामुळे त्याजागी इमारती उभ्या राहू लागल्या. साधारण 1980 या दशकात पुनर्विकास सुरू झाली. वाड्या भुईसपाट झाल्या. हजार पाचशे नारळ सुपाऱ्या जावून तेथे सजावटीपुरती चारपाच झाडे उरली. हिरवेगार गाव आता सिमेंटचे जंगल झाले. अशी सगळी सुधारणा खरंच पाहता पाहता झाली. मुंबई-पुणे शहरे जवळ असल्याने सुधारणा वेगाने तेथे सरकू लागल्या. उद्योगधंदे वाढू लागले. बऱ्याच मोठ्या कंपन्या स्थिरावल्या. गावात खरोखर पैसा वाहू लागला. एक-दोन-चारचाकी जेथे होत्या तेथे घरोघरी मोटारी…किमानपक्षी दुचाकी तर खेटून उभ्या झाल्या.


वेशभूषा बदलल्या, बोलणे बदलले. मराठीच बोलीभाषा असणारे गाव हिंदी-इंग्लिश ऐकू लागले. रस्ते अरुंद वाटू लागले. गाड्यांची वर्दळ वाढली. सारे स्वरूप बदलले. आता शाळा नव्या नव्या उदयाला आल्या. इंग्रजी मिडीयम आले, स्टेट बोर्ड सोडून इतर अभ्यासक्रम मुलांसाठी उपलब्ध झाले. आजूबाजूच्या लहान लहान गावांतून जिल्हा परिषदेने शाळा उभारल्या. अर्थात गंमत आज अशी की गावात शाळा असून आजही अष्टागरातील मुले अलिबागमध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतात. त्यांना तीच प्रगती वाटते. एकूण शिक्षणाबाबत उत्क्रांती घडली.

पदवी कॉलेजही दुसरे आलेच. त्याशिवाय विविध अभ्यासक्रम आता तेथे शिकता येऊ लागले. मेडिकल, लॉ सगळे शिक्षण तेथेच मिळू लागले. होमिओपॅथी कॉलेजही सुरू झाले. तरीही शहरात शिकायला जाण्याची ओढ आणि सवय कायम राहिली. मुले मुली वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करू लागली.


     अलिबागमध्ये टुरिस्ट प्रचंड प्रमाणात वाढले. अलिबाग मिनी गोवा म्हणून ओळखले जाऊ लागले. (गोवा, महाबळेश्वर, माथेरान ही मध्यम वर्गासाठी जरा लांबची ठिकाणे आणि तेथला समुद्र देखणा,म्हणून). त्यासाठी आपोआप हॉटेल इंडस्ट्री जोमाने वाढली. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या छोट्या गावात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स उभी राहिली. अगदी राहत्या घरातही सुधारणा करून स्थानिकांनी होम स्टे व्यवसाय सुरू केला. समृद्धी चहुदिशांनी येऊ लागली. मुंबईहून समुद्र मार्गे सुलभ, सोपा आणि वेगाने प्रवास योजना आल्या. बोट सर्व्हिस आली. एवढेच नव्हेतर रो रो सारखी सुविधा आल्यामुळे प्रवासी खूपच खुश झाले. आता प्रवासाची दगदग कमी झाली. खर्च जरी वाढला तरी ती फिकीर आता कोणी करत नाही. हे वास्तव आहे. आपल्याकडे वेस्टर्न कंट्रीज् प्रमाणे वीकएंडला फिरायला जाण्याची आवड खूप वाढली आहे. अलिबाग हे सर्वात जवळचे डेस्टिनेशन आहे. त्यामुळे पसंती मिळालेले आवडते ठिकाण म्हणून अलिबागची प्रसिध्दी आहे. अलिबागमध्ये जवळपास बरेच समुद्र किनारे आहेत. अक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, सासवणे, मांडवा असे बरेच. टुरिझममुळे किनारे गजबजले, नवनवीन वॉटर गेम्स आले. घोडे आले, उंट आले. घाण वाढली, गर्दी बेसुमार झाली. सरत्या वर्षाला निरोप द्यायला अलिबागच्या लोकसंख्येच्या दुप्पट टुरिस्ट येतात. सगळी रिसॉर्ट्स भरून जातात. तरीही उरलेले लोक किचनमध्ये झोपायची सोय करा ना अशी विनवणी करताना दिसतात. ही प्रगती आहे की काय हे ज्याने त्यानेच ठरवावे. कारण या दिवसात दारूच्या दुकानांसमोर खूप मोठ्या रांगा लागतात. सगळे समुद्र किनारे गर्दीने भरतात. राहायला जागा न मिळालेले तेथेच पथारी पसरतात. अलिबागचे रहिवासी मात्र पुढचे काही दिवस किनाऱ्यावर पाय ठेवत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

एरवीही आता virgin beach मूळ रहिवासी शोधतात. वर्दळ, कलकलाट, स्टॉल्स, घोडे, मोटरसायकली यात वाळूवर फिरणे हरवले आहे. प्री वेडिंग शूटिंग ही सध्या लोकांची नवी आवड आहे. समुद्र त्यासाठी उत्तम ‘लोकेशन’ झालाय. आम्ही मात्र शांत जागा बसायला शोधत राहतो. आता किनाऱ्यांचे सुशोभीकरण झाले आहे. चौपाटी तयार झालीय. तरी मऊ मुलायम वाळू नाहीशी झालीच.


एक काळ होता जेव्हा मुख्य अलिबागचा किनारा मोकळा असे. संपूर्ण भरतीच्या वेळेलाही एका मर्यादेपर्यंत पाणी यायचे. पाण्याने त्याची मर्यादा ओलांडली नव्हती. आम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरामात चालत असू, पावले न भिजवता. आता निसर्गानेही रूप बदलले. मुंबईत समुद्र दाबला, रेक्लमेशन घडले. वसाहती उभ्या राहिल्या. ते पाणी कुठे जाणार? अलिबागला भरतीला पाणी आता फार पुढे येते आणि खूप खोल असते. त्यात बुडणारे लोक वाढले. निसर्ग त्याची ताकद दाखवत असतो. त्याला हरवणे शक्य नाहीच हे पुनःपुन्हा तो सिध्द करतो. डोळे उघडायला हवेत आपलेच. आपले नाव नकाशावर कोरून आजचे अलिबाग दिमाखात उभे आहे.

U tu be चे दही, प्रयोग तर करून पाहा,,pl share experiences s

 *हाबुराचे दही*

*अमृता खंडेराव.*

जेवणात दही कोणाला आवडत नाही? मधुर आणि ताजं दही म्हणजे जेवणातलं अमृत. आमच्या घरी दुधात दोन-चार चमचे ताक किंवा एक दोन चमचे दही टाकून विरजण लावायची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने विरजण लावून बरं चाललं होतं...


अशात एकदा युट्युब बघता-बघता मला दही विरजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसू लागल्या. उत्सुकता म्हणून मी त्या बघितल्या आणि मग माझे सत्याचे प्रयोग सुरू झाले. 


रात्री दुधात देठासकट हिरवी मिरची टाकून झाकून ठेवलं. आता व्हिडिओतल्यासारखं मस्त घट्ट दही तयार होणार असं स्वप्न बघत झोपी गेले. सकाळी उठून पाहिलं तर त्या विरजणाच्या दुधाला घाण खराब वास येत होता. मग ते कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.


त्यानंतर दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून विरजण लावून पाहिलं तर ते दही बेचव कडवट लागलं. मग कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. तुरटी फिरवून दही लावून पाहिलं. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.


त्यानंतर हस्त नक्षत्राच्या पावसाचं पाणी दुधात मिसळल्यावर फार सुंदर दही होतं असं वाचलं. मग एके दिवशी जोराचा पाऊस सुरू झाल्यानंतर मी स्टीलचं पातेलं घेऊन गच्चीत गेले. संपूर्ण भिजले पण पातेल्याच्या बुडाशी जमेल इतकं पाणी गोळा करूनच आणलं. मग हे बड्या मुश्किलीने पकडलेलं हस्तजल  दुधात घातलं. 


पण दूध खराब होण्यापलीकडे काहीच झालं नाही. कदाचित ते वेगळंच नक्षत्र असावं. एक तर हस्त नक्षत्र ओळखण्यात मी चुकले असेन किंवा हस्त नक्षत्राने मला हस्त हस्त फसवलं असेल. पण दही काही लागलं नाही. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातले. 


त्यानंतर कवडी दही बनविण्याची रेसिपी बघितली. संक्रांतीचं सुगड स्वच्छ धुवून दोन दिवस ते पाण्यात बुडवून ठेवलं. मग त्यात तापवून थंड केलेलं निर्जंतुक दूध आणि थोडं ताकाचं विरजण घातलं. सुगडाला "यशस्वी भव" असा आशीर्वाद देऊन झाकण लावून ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी दुधातलं पाणी झिरपून गेलं आणि उर्वरित घन पदार्थ गाडग्याला आतून चिकटून बसला. तो चमच्याने खरडून काढावा लागला. 


दह्याचं आणि माझं काय वाकडं आहे कोण जाणे.. चिनी मातीच्या सटात दही चांगलं होतं म्हणून ते करून पाहिलं तर सटानं पण माझी सटकवली.  एकदा एक मैत्रीण म्हणाली की काचेच्या बाटलीत दही खूप चांगलं विरजतं. 


मग एक लांब मानेची स्मार्ट बाटली हुडकून काढली आणि तिच्या पोटात दही लावून बाटली डायनिंग टेबलवर ठेवली. बाटलीचं प्रतिबिंब टेबलाच्या काचेत अतिशय सुंदर दिसत होतं. वेगवेगळ्या प्रकारे लाईट टाकून त्याचे दहा-बारा फोटो काढले. बाटली तर खूपच सुंदर दिसत होती.पण दही मात्र सामान्य दह्यासारखंच झालं. काचेच्या स्पर्शामुळे त्यात काहीही फरक पडला नाही. 


पण बाटली धुताना मात्र फार त्रास झाला. बाटलीच्या अप्सरेसारख्या निमुळत्या मानेला आतून चिकटलेलं दही निघता निघत नव्हतं. अखेर अंगणातलं गवत उपटून काटकीला बांधलं आणि बाटलीच्या तोंडातून गवताचा बोळा आत घालून बाटलीची मान घासू-घासू धुतली. नेहमीप्रमाणे ती दह्याची मुतवणी कढीपत्त्याला नेऊन घातली. 


एकदा मी डी मार्ट मधून योगर्ट आणून खाल्लं. ते कॅरमलाईज्ड योगर्ट होतं. मग तो सत्याचा प्रयोग करून झाला. यावेळी दह्याला तो विशिष्ट दुर्गंध येऊ नये म्हणून त्यात विलायचीचे दाणे पण टाकून पाहिले. पण घरचं योगर्ट काही केल्या डी मार्टसारखं लागत नव्हतं. मग अमुल दह्याचे बुडगे आणून पाहिले. 


अशी दहीशोधाची यात्रा सुरू असताना मागच्या आठवड्यात ॲमेझॉनवर नवीनच दहीपात्र सापडले. त्याला हाबूरपात्र असे म्हणतात. तर हाबूर हा दहा लाख वर्षांपूर्वी तयार झालेला ऐतिहासिक दगड आहे. त्या दगडाच्या भांड्यात लावलेले दही उत्तम होते असे ॲमेझॉनचे म्हणणे आहे. छोट्यात छोटे हाबूरपात्र कमीत कमी दीड हजाराचे आहे. 


हाबूर दगड हा फॉसिलचा एक प्रकार आहे. तो राजस्थानात सापडतो. मार्केटिंगवाल्या लोकांनी माझ्यासारखी दहीपात्रे शोधणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा दांडगा अभ्यास केलेला असतो. आमचा बावळटपणा म्हणजे त्यांची कमाई. 


तर भरपूर हाबूर संशोधन केल्यानंतर हाबूरपात्र आपल्या खिशाला परवडणार नाही हे माझ्या लक्षात आले. मग मी गुगलवरून त्याचे भरपूर फोटो शोधून काढले आणि जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन साधारणपणे हाबुराच्या रंगाशी मिळते जुळते दगड शोधायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या काळ्या दख्खनी मातीत तांबुस सोनेरी दगड कधी सापडावेत‌.....


पण आजकाल यवतमाळात राजस्थानची वाळू मागवतात. तिचा रंग गुगलवर दाखवलेल्या हाबूरपात्रासारखाच दिसतो. तर कपभर दुधात थोडीशी राजस्थानी वाळू टाकून का प्रयोग करू नये असे माझ्या मनाने घेतले. मनाने घेतले की हातानेही घेतले. माझे हात मनाची आज्ञा पाळण्यासाठी सदैव तत्पर असतात. मग मूठभर वाळू आणून दहा वेळा स्वच्छ पाण्याने धुतली. त्यातली चमचाभर वाळू कपभर दुधात घातली. आणि सकाळी कप उघडून पाहिला. तर दूध जसेच्या तसेच. थोडेसे बुडबुडे येण्यापलीकडे काहीच बदल झाला नव्हता. 


मग हे दूध कढीपत्त्याला नेऊन घातलं. मग मी जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन हाबुर दगडाचा एखादा मोठा तुकडा सापडतोय का हे पाहू लागले. दिसला गोल्डन ब्राऊन दगड की उचल... गोल्डन ब्राऊन दगड दिसला की उचल... असे करता करता पिशवीवर गोल्डन ब्राऊन दगड जमा झाले. अखेर त्या दगडी खजिन्यात मला दोन हाबूरला समानार्थी तांबडे तुकडे सापडले. पुन्हा एकदा कपभर दुधाचा प्रयोग केला. हाबुराच्या नादात पुन्हा एकदा हागुर दही तयार झाले.  पुन्हा एकदा ते कढीपत्त्याला नेऊन घातलं.  


लपलप हलणारे तारुण्याने मुसमुसलेले दही तयार करायच्या नादात कढीपत्ता मात्र चांगला पोसला गेला आहे आणि तेलाने माखलेल्या बाळाच्या जावळाप्रमाणे तुकतुकीत पानांनी डवरून लसलसत आहे. आता कढीपत्त्याचा दहीपत्ता झाला आहे‌. त्याचे पान चावून खाल्ले तरी आंबटसर लागत आहे. आता फक्त ही पाने दुधात टाकून दही विरजते काय ते पहायचे बाकी आहे....

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये

 प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये

महाराष्ट्र राज्य देशात अव्वल

- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

योजनेच्या माध्यमातून  २२६३ कोटीची राज्यात गुंतवणूक,

लाभार्थीना ३८९ कोटी अनुदानाचे वितरण

 

             मुंबईदि. 25 :  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये  महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात एकूण २२ हजार ०१०  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असून छत्रपती संभाजीनगरमध्ये १८९५ सर्वाधिक प्रकल्प  मंजूर आहेत. देशात २२००० टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.  शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषि व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली असून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत अशी माहिती कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली.

बिहार राज्याचे २१२४८ प्रकल्प मंजुर असुन ते देशात दुसऱ्या स्थानावर तर उत्तर प्रदेशचे १५४४९ प्रकल्प मंजूर असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांकावरअहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या माध्यमातून रु. २२६३ कोटीची गुंतवणूक राज्यात झाली आहे रु. ३८९ कोटीचे अनुदान लाभार्थींना देण्यात आले आहे.

            नव्याने


विविध विभागांकडील माहितीच्या प्रभावी, पारदर्शक वापरासाठी महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरण, प्राधिकरण स्थापन

 विविध विभागांकडील माहितीच्या प्रभावीपारदर्शक वापरासाठी महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणप्राधिकरण स्थापन

 

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (Data) धोरण आणि या धोरणाच्या मसुद्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासनाच्या विविध विभागांकडे एकत्र होणाऱ्या माहिती (आधारसामग्री - डेटा) चा गतीमान कामकाजासाठी तसेच योजनाप्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापर करून घेण्याच्या दृष्टीने हे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र इस्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेतंर्गत राज्य विदा प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे.

विविध विभागांमध्ये संगणकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात माहिती एकत्र केली जाते. ही माहिती – आधारसामग्री पूर्ण क्षमतेने कशी वापरता येईलयाचा या धोरणात विचार केला गेला आहे. विविध विभागशैक्षणिक संस्थासंशोधन संस्था तसेच उद्योगांकडील ही माहिती एकत्रित उपलब्ध झाल्यास कार्यक्षम आणि पारदर्शकपणे प्रशासकीय प्रक्रीया राबविता येणार आहे. या माहितीच्या वापराबाबत एकवाक्यता तसेच विविध विभांगामध्ये उपलब्ध या आधारसामग्रीचे सार्वजनिक वापराकरिता सुलभ अदान-प्रदान या धोरणात निश्चित केले गेले आहे.

धोरणाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाची सांख्यिकी माहिती बिनचूक असेल. तसेच ती सुसंगत असेल. त्याच प्रमाणे ग्रामीण भागात काम करणारे नागरी सुविधा कर्मचारी तसेच अंगणवाडी सेवक तसेच कृषि सहाय्यक यांना वेळोवेळी सांख्यिकी माहिती गोळा करावयाचा भार कमी होवून त्यांना त्यांच्या मूळ कामावर जास्त लक्ष देता येईल व सदर माहिती डिजिटली थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली व इतर शासकीय कार्यक्रमातून गोळा होणाऱ्या आधारलिंकद्वारे संकलित करुन करण्यात येईल. या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी महास्ट्राईड हा प्रकल्प काम करत असून. त्यास जागतिक बँकेने अर्थसहाय केले आहे.

पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम

 पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी

५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम

 

राज्यातील विविध जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या ३३२ गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या कामांसाठी ५९९ कोटी ७५ लाख रुपयांच्या तरतूदीस देखील मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन करताना भूसंपादन मोबदला देणेनवीन गावठाणातील भूखंड देणेपुनर्वसित गावठाणात नागरी सुविधा पुरविणे लाभक्षेत्रातील पर्यायी जमीन देणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पुनर्वसनासाठी प्रकल्प यंत्रणेच्या निधीतून खर्च केला जातो. पाटबंधारे प्रकल्पांच्या बाबतीत जलसंपदा प्रकल्प संस्था आहे. मात्र १९९८ मध्ये शासनाने विविध विभागात पाटबंधारे विकास महामंडळे स्थापन केली आहेत. त्यामुळे जुन्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी महामंडळाकडून निधी उपलब्ध होत नाही. म्हणून शासनाने जुन्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या गावांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या पुनर्वसन प्रभागांकडे निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार ३३२ गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी ४२४.६० कोटी रुपयांच्या निधी बाबतचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागामार्फत हाताळण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली. हा निधी आणि पुर्वीची १७५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी असे एकूण ५९९ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली. या नागरी सुविधांचे कामे पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.


ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता,pl share

 ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रममहामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळसार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

ठाणे जनता सहकारी बँक आर्थिक सक्षमता आणि नियमानुकूल व्यावसायिकतेचे निकष पूर्ण करत असल्याने तसेच रिझर्व बँकेने विहीत केलेली पात्रता व प्रक्रीया पर्ण करत असल्याने सहकारवस्त्रोद्योग व पणन विभागाने केलेल्या शिफारशीनुसार या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रममहामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरीता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

नागरी बँकांच्या लेखापरिक्षण अहवालात बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन अशा नागरी सहकारी बँकाची ही यादी दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सल्ल्याने सुधारित करण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली.

--0—

हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ

 हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी

30 दिवसांची मुदतवाढ

पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 25 : हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

 

दि. 24 फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi