Tuesday, 10 September 2024

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत

 ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये

रूपांतरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत

 

मुंबईदि. १० :- ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे, अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

१५ सप्टेंबर नंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकामआय ॲण्ड सी सेंटरवाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे. अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे. व मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.


बोरा बाजार येथील रस्त्याचे "शांतीनाथ देरासर मार्ग" नामकरण करण्यात यावे

 बोरा बाजार येथील रस्त्याचे

"शांतीनाथ देरासर मार्ग" नामकरण करण्यात यावे

-विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

 

मुंबई, दि १० सप्टेंबर : मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार जवळील मार्गाचे नामकरण "शांतीनाथ देरासर मार्ग" असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.

कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रध्दाळू आणि भाविक मोठया संख्येने भेट देत असतात. फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण "शांतीनाथ देरासर मार्ग" असे करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. जैन बांधवांची ही मागणी लक्षात घेता तातडीने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 30 कोटी रुपये वितरित

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत

30 कोटी रुपये वितरित

 

मुंबई, दि. 10 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून 30 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.


वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्न राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

 वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्न

राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

 

मुंबई, दि. १० : वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सुषमा स्वराज भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्त मंत्री (विधानमंडळासह) आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

 

आरोग्य आणि टर्म इन्शुरन्स सेवांवरील जीएसटी, नुकसानभरपाई उपकर (कंपेंसेशन सेस), संशोधन आणि विकासासाठी अनुदानावरील जीएसटी इत्यादीसारख्या सामान्य जनतेच्या आणि समाजाच्या हिताशी संबंधित प्रमुख मुद्यांवर परिषदेत चर्चा करण्यात आली.

           

यामध्ये जीवन व आरोग्य विमा सेवांवरील कराचा दर व जीएसटी उपकर (कंम्पेनसेशन सेस) बाबतचे भविष्य यांचा अभ्यास करण्यासाठी मंत्री गट तयार करण्याची शिफारस करण्यात आली. तर सरकारी संस्था, विद्यापीठे, महाविद्यालय तसेच सरकारी किंवा खाजगी अनुदाना आधारे संशोधन व विकास काम करणाऱ्या संस्थांना मिळणाऱ्या अनुदानात कर मुक्ततेबाबत प्राधान्याने विचार करण्याची जीएसटी परिषदेने शिफारस केली. यासह ५३ व्या जीएसटी परिषदेत घेतलेले लोकाभिमुख निर्णय जसे की, व्याज व दंड माफीची योजना, व इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याबाबतच्या मर्यादा कालावधीत वाढ यासारखे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती या बैठकीत निश्चित करण्यात आली.


कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन सकारात्मक

 कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन सकारात्मक

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  मुंबई, दि. 09 : राज्यातील कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे.  तसेच  त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्नशील  आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भारतीय मजदूर संघाच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत सांगितले.

     राज्यामध्ये विविध उद्योगांमध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना निवृत्तीवेतन देण्यात येते. सध्या नोंदीत असलेल्या कामगारांना निवृत्तीवेतन देण्यात येते. यामध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत कामगार विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही  त्यांनी बैठकीत दिल्या.

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी  दुरदृश्य संवाद प्रणालीद्ववारे बैठकीत सहभाग घेतला. बैठकीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव  निवतकर आदी उपस्थित होते.

 विश्वकर्मा जयंती शासन स्तरावर साजरी करण्याबाबत निर्देश देत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अंमलबजावणीला विलंब झाल्यास कामगार विभागाने अधिनस्त कार्यालयांमध्ये 17 सप्टेंबर रोजी जयंती साजरी करावी. असंघटीत कामगारांसाठी आभासी मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये मंडळनिहाय योजना तयार करण्यात यावी. योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबत पडताळणी करावी. कामगारांच्या वेतनातून ईएसआय (कर्मचारी राज्य विमा योजना) मध्ये काही रकमेची कपात करण्यात येते. त्यामुळे कामगारांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा दिल्या पाहिजे. राज्यात नवीन 15 कामगार रूग्णालये मंजूर झाली आहे. या रूग्णालयांच्या उभारणीची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत कामगार कायद्यातंर्गत येणारे सर्व विषय कामगार विभागाकडे संपविणे, घरेलू कामगारांची नोंदणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवून त्यांना लाभ देणे, वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना सन्मान निधीचा लाभ देणे, विडी कामगारांना किमान वेतन देणे, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांतील रक्षकांचा गणवेश मान्य करणे, फेरीवाल्यांसाठी दंड कमी आकारण्याच्या मागणीचा विचार करणे, हंगामी फवारणी कामगारांना 6 वा वेतन आयोगाचा फरक देणे, माविम अंतर्गत कार्यरत लोकसंचलीत साधन केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांना लाभ देणे, संस्था नियुक्त सचिवांना किमान वेतन देणे आदी विषयांवरही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीला भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित 

अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी 1 लाख रूपये अर्थसहाय्य

 अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत

जागा खरेदीसाठी 1 लाख रूपये अर्थसहाय्य

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 09: बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत स्वत:ची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल  यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला.  बैठकीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, नगर रचनाकार प्रतिभा भदाणे आदी उपस्थित होते.

जिल्हा नियोजनच्या निधीतून अनुसूचित जाती व  जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच देण्याच्या सूचना देत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्हा नियोजनमधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते, नाले, प्रकाश व्यवस्था ही कामे करण्यात येतात. मात्र या कामांची आता पुर्नरावृत्ती होत आहे. त्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौरघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच दिल्यास वीज देयकातून या लाभार्थ्यांची कायमची सुटका होईल. तसेच अनुसूचित जाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी देण्यात यावी. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंपासह विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आदिवासी गावांना वन्य प्राण्यांपासून बचावासाठी कुंपण देण्यात यावे. यासाठी असलेली लोकसहभागाची अट रद्द करावी. पांदण रस्त्यांना गती देण्यासाठी सर्वंकष असा शासन निर्णय जारी करावा. मानव विकास निधीची कामे राज्यात 125 तालुक्यांमध्ये करण्यात येतात. या निधीतील कामांसाठी तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा नियोजन निधीतील कामांचे तांत्रिक मान्यता प्रस्ताव मंजूरीचे अधिकार जिल्हास्तरीय यंत्रणेकडे देण्यात यावे. सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांव्यतिरिक्त घरकुले असणाऱ्या अन्य लाभार्थ्यांना  जमिनींचे पट्टे नियमित करून देण्याची कार्यवाही करावी.

याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना, अर्ज स्वीकृती, बांधकाम कामगाराबाबत 90 दिवसांचे प्रमाणपत्राची कार्यवाही करावी. असे निर्देशही त्यांनी दिले. यासह बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांचे उद्दिष्ट देणे, मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती, कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूंचा समावेश करणे  अन्य विषयांवर चर्चाही करण्यात आली. 

बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Monday, 9 September 2024

दिलखुलास’ कार्यक्रमात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात ऑलिम्पिक कांस्यपदक


 विजेता स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत


 


मुंबई, दि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळालेल्या स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


            पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळे यांनी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला 'कांस्यपदक' प्राप्त करून दिले. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शासनस्तरावरही त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या एकंदरीत क्रीडाविश्वातील प्रवासाबद्दल श्री. कुसाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात माहिती दिली आहे.


'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, १० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय येथील माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Featured post

Lakshvedhi