Monday, 9 September 2024

नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव

 नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव

मागविण्याचे काम सुरू

 

मुंबई, दि.९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाखांपर्यंतची कामे विनानिवीदा बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना कामवाटप समितीमार्फत वाटप करण्यात येतात. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त कामे वाटप करण्याकरीता मुंबई शहर  जिल्हयामध्ये कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी तरी मुंबई शहर जिल्हयामध्ये संस्थांनी त्यांच्या संस्थेचा प्रस्ताव संस्थेच्या लेटरहेडवर संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्व सभासदांची अद्ययावत यादी, संस्थेचा सन-२०२१-२०२२ व २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रांसह दि.१८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयास सादर करावा असे, आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर सहायक आयुक्त  संदिप  गायकवाड  यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन,

 मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

     मुंबई, ‍‍दि. 9 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

योजनेचे लाभ स्वरूप

या योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30 हजार इतकी हा सदर खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

पात्रतेचे निकष

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. वय वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती योजनेचा लाभ घेवू शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.

कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि रूपये 2 लाख 50 हजार पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशेन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा.चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे, लाभार्थी प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

योजनेच्या अधिक माहितीसाठी  अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.

आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार -

 आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

-    आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

 

मुंबई, ‍‍दि. ९ :  आदिवासी विकास विभागातील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एसईबीसी संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती. आता विभागातील बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ६१६ पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गट - क संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली.

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल - मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक - सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधिक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कॅमेरामन - कम - प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक ही  गट - क संवर्गातील विविध पदे विभागात भरण्यात येणार आहेत.

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार

 नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार

-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा):  आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार सर्वश्री किशोर दराडे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नितीन पवार, राहुल ढिकले, हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल  श्री. राधाकृष्णन म्हणाले, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे.

राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.

 पालकमंत्री श्री. भुसे यांनी नार - पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, खासदार श्री. भगरे, आमदार श्री. दराडे, आमदार श्री. इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार श्री. खोसकर, आमदार श्री. पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली.

०००००

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये 19 टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये 19 टक्के वाढ

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई, दि. 9 : राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार आशिष देशमुख, उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महावितरण व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अन्बलगन, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री.फडणवीस यांनी जाहीर केले. कंत्राटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांचा अधिकार आहे. तथापि, खापरखेडा पॉवर  स्टेशनमध्ये झालेल्या आंदोलनात मारामारी, पॉवर स्टेशन बंद पाडणे आदी बाबी शासनास मान्य नाहीत. यामुळे ज्या कंत्राटी कामगारांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा कंत्राटी कामगारांबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य

तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 

मुंबई दि.९ : नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मृद व  जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, की मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मिहान प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्धता होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मिहान परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेले व्यापारी संकुले ही त्या ग्रामपंचायतींना हस्तांतरीत करावी, यामुळे संबधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तसेच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबधित यंत्रणांनी कमी करावेत,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, की मिहान परिसरात असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांना त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करुन देत त्यांचे स्थलांतर करावे. तसेच मिहान प्रकल्पबाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंड वाटप लवकरात लवकर करावे. मिहान परिसरातील ग्रामपंचायतींना करवसुलीचे अधिकार नसल्याने उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही, या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी एमआयडीसीकडून वापरण्यात येणारे सूत्र वापरण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!

 ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!



हिमालयाच्या पहिल्या चढावाच्या टप्प्यातील कांगडा जिल्ह्यांत बैजनाथ गावीं महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.!


१९०५ साली झालेल्या भूकंपात हे एकमेव मंदिर ह्या जिल्ह्यांत वाचलें, ही मोठी ईश्वराची कृपा होय.!


पूजारी सांगत होते की, १०-१५ मिनिटें शिखरापासून काठीसारखें दोन-चारदा देऊळ डोललें पण अखेरीस सरळ जसेच्या तसेंच उभे राहिलें.!


या देवळावर एक लेख असून ते दोन सावकारांनी कोंगडयाच्या एका कडोच राजाच्या कारकीर्दीत बांधलें, असें त्यांत म्हटलें आहे.!


मंदिराच्या बाहेरील भागाच्या दगडांवर शिखरापर्यंत देवतांच्या निरनिराळया मूर्ती अलंकारांसह व वाहनादि परिवारासह इतक्या सुन्दर कोरल्या आहेत की, त्या डोळ्यात साठवून ठेवाव्याशा वाटतात.!


मंदिराच्या आवारांत शिरतांना दरवाजांत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस मूर्ती आहेत एक

मारुतीरायाची व एक गणरायाची.!


दोन्ही मूर्तींचे स्वरूप अलिकडच्या मुर्तींपेक्षा भिन्न असून मननीय आहेत.!


यांत गणरायाची मुर्ती फारच मनोहर असून त्यास सहा हात आहेत.!


ते पाहतांच मला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी सहा हातांचा वर्णन केलेल्या गणरायाची मुर्ती कशी असेल, हे पुष्कळ दिवस न उलगडलेले कोडें मात्र येथे उलगडलें.!


ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच्या गणेशनमनाच्या ओव्यांत " षड्दर्शनें म्हणिपती । तेच भुजांची आकृति" इथपासून पहिल्या अध्यायातील १० ते १३ क्रमांकाच्या ओव्यांत जे वर्णन आहे ते  खालील प्रमाणे,


" देखा षड्दर्शने म्हणिपति। तेचि भुजांची आकृति

म्हणऊनि विसंवादें धरिती। आयुधे हातीं ॥१०॥

तरी तर्कु तोचि परशु । नितिभेदु अंकुश ॥

वेदान्त तो महारसु । मोदक मिरवे ॥११॥

एके होतीं दन्तु। जो स्वभावता खण्डितु ॥

तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥

मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरू वरदु॥

धर्मप्रतिष्ठा तो । अभयहस्तु॥ १३॥"


पहिल्या दोन्हीं बाजूंच्या दोन हातांत परशु व अंकुश हीं शस्त्रे वणिली आहेत व तीं तर्क व नीतिभेद हीं सांगितली आहेत.!


तिसऱ्या हातांत वेदांतरूपी मोदक आहे आणि चौथ्यांत खण्डित दन्त आहे. हाच वार्तिकांचा बौद्धमत संकेतु' आहे. चार हात झाले.!


पांचव्यात पद्म म्हणजे कमल आहे, तो सत्कारवाद आणि सहाव्यांत अभय असून तेंच धर्मप्रतिष्ठा असें म्हटलें आहे.!


या सहा हातांना प्रारंभींच्या ओवीत षड्दर्शनें म्हणून याच कारणाने विसंवादरूपी किंवा

विसंवादाने आयूधें हातांत घेतली आहेत, असें म्हटलें आहे.!


या सर्व वर्णनावरून हात सहा आणि दर्शनें सहा हे निश्चित होतें; पण तीं दर्शनें कोणती आणि आयुधे कोणती येथेच थोडासा घोटाळा होतो.!


पण आश्चर्याची गोष्ट की, या बैजनाथाच्या ११ व्या शतकातील मंदिरातील गणरायाची मुर्ती सहा हातांची असून त्यांत हींच आयुधे दिली आहेत.!


मागील बाजूच्या दोन हातांत खरी आयुधे म्हणजे परशु आणि अंकुश आहेत.! नंतर डावीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्यांत तुटलेला दन्त आणि मांडीवर ठेवलेल्या सोंडेच्या तोंडाजवळ नेलेल्या हातांत, जणू काय वेदान्त- मोदकाचा रस गजानन सोंडीने चाचपून पहात आहे.!


उजवीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्या हातांत कमळ आहे आणि मांडीवर उभा ठेवलेला हात अभयरूपी कल्याण दाखवीत आहे.!


तात्पर्य १३०० च्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींनी दक्षिणेंत वर्णिलेल्या षड्भुज गणपतीची मुर्ती १२ व्या शतकाच्या आरंभींच्या कांगडा दरींत असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी आपल्यास पहावयास मिळते.!

Featured post

Lakshvedhi