Monday, 2 September 2024

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन

 ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन

 

ठाणे, दि. २ (जिमाका) :  एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपूजन समारंभात केले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या  विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन झाले.

याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिषा सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कऱण्यात आले.

मुंबई-ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे. पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला तीन हजार फूटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर दोन समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे, ही सर्व समाजांची जबाबदारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर अतिशय प्रेम होते. त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्याचबरोबर "मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे" या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे. त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे.वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे. गायमुख ते फाऊंटन भुयारी मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर - गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. याचा फायदा ठाणेकरांना होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तब्बल 12 समाजांना सामावून घेणारे समाज भवन ही अनोखी गोष्ट आहे. ही वचनपूर्ती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

तसेच गायमुख येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुख - टप्पा 2 चे लोकार्पण केले. डॉ.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचे प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प यांचे ऑनलाईन भूमीपूजन संपन्न झाले.

या सोहळ्यात जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

००००

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

 मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना

 

 

नवी दिल्ली, 2: मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या  प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये 18 हजार 036 कोटी असून, तो सन 2028-29 पर्यंत पूर्ण होईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला आज मंजुरी दिली. ह्या प्रकल्पाव्दारे मनमाड-इंदूर च्या प्रस्तावित नवीन व लहान रेल्वेमार्गाने दोन्ही राज्यांमध्ये व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील. तसेच याव्दारे प्रधानमंत्री श्री. मोदी यांची नव भारत ची संकल्पना  पूर्ण होण्यास मदत होईल  आणि रोजगार/स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

हा प्रकल्प मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची फलश्रृती असून, जे एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाले आहे तसेच या प्रकल्पाव्दारे नागरिकांना, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील या प्रकल्पाअंतर्गत सहा जिल्ह्यांचा समावेश असेल आणि भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे 309 किलोमीटरची भरही पडेल. या प्रकल्पामुळे 30 नवीन स्थानके बांधली जातील. नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे सुमारे 1,000 गावे आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडली जाऊ शकतील.

या प्रकल्पामुळे देशाच्या पश्चिम/नैऋत्य भागाला मध्य भारताशी जोडणारा एक लहान मार्ग उपलब्ध करून देऊन या प्रदेशातील पर्यटनालाही चालना मिळेल. या नव्या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील पर्यटक विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना सहजरित्या भेट देऊ शकतील.

या प्रकल्पामुळे पीथमपूर ऑटो क्लस्टरला (90 मोठे कारखाने आणि 700 लघु आणि मध्यम उद्योग) जेएनपीएच्या गेटवे बंदराला आणि इतर राज्य बंदरांना थेट जोडणी होऊ शकेल. मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट संपर्क उपलब्ध होईल. तसेच  देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात त्याचे वितरण सुलभ होईल.

कृषी उत्पादने, खते, कंटेनर, लोह खनिज, पोलाद, सिमेंट, पीओएल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक आवश्यक मार्ग आहे. क्षमता वाढीच्या कामामुळे सुमारे 26 एमटीपीए (वार्षिक दशलक्ष टन) अतिरिक्त मालवाहतूक होईल रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन आहे, जे हवामान उद्दिष्टे साध्य करण्यात आणि देशातील लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात, तेलाची आयात (18 कोटी लिटर) कमी करण्यात आणि कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन (138 कोटी किलोग्रॅम) कमी करण्यात मदत करेल, जे 5.5 कोटी झाडे लावण्याइतकेच असेल,  असे  केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सांगितले.

फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तत्काळ लाभ घ्यावा

 फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना

 तत्काळ लाभ घ्यावा

-कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

मुंबई दि. २ : फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे ३ हजार ६०० प्रलंबित लाभार्थींना  योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

फलटण जिल्हा सातारा येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते नियमितपणे मिळण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, फलटण कृषी विभागीय अधिकारी  आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी श्री.मुंडे म्हणाले, फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुमारे ३ हजार ६०० लाभार्थींना भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाती आधार संलग्न व इतर अनुषंगिक बाबींमुळे लाभ मिळण्यास अडचणी येतात. या अडचणी विभागाने तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा.तसेच यासाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून घ्यावेत असे ही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य वाटप कृषी

 कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य वाटप कृषी

 - मंत्री धनंजय मुंडे

 

मुंबई दि. 2 : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणी बाबत आढावा बैठक कृषी मंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2  हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य  देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे.

श्री.धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती; त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.

00000

शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीतील विसंगती दूर करणार

 शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत

 कर आकारणीतील विसंगती दूर करणार

-पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई, दि.०२ : कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

कुक्कुट पालकांच्या विविध मागण्याबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपसचिव श्री.मराळे यासह कुक्कुटपालन शेतकरी प्रतिनिधी, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, कुक्कुटपालन व्यवसायासाठी स्वतःच्या शेतात उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेडसाठी विविध ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळी कर आकारणी होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी प्रोत्साहित करणे व शेतीपूरक व्यवसाय असल्याने कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यात येईल.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, कुक्कुटपालन व्यवसायातील मोठे उद्योग हे सुसज्ज  व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याशी शेतकरी करत असलेल्या पोल्ट्री व्यवसायाची तुलना करता येत नाही. शेतकऱ्यांनी उभारलेल्या पोल्ट्री शेडसाठी मालमत्ता कराची आकारणी माफक पद्धतीने करण्याबाबत  विचार करून राज्यातील सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने कर आकारणी व्हावी. यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव श्री डवले, आयुक्त श्री दिवेगावकर यांनी चर्चा केली. तसेच शासनाने या अनुषंगाने सूचित केलेले दर हे प्रती चौरस फुट ३५ ते ७५ पैसे पर्यंत आकारण्याची तरतूद केलेली आहे. पोल्ट्री व्यवसायासाठी लागणारे फीड्स व खाद्य यासाठी सुसंबद्ध पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.  कुक्कुटपालनातील अडचणींवर मात करून शेतकऱ्यांनी व्यावहारिक दृष्टीने सक्षम होणे गरजेचे आहे. पोल्ट्री शेडवर सोलर पॅनल उभारून वीज निर्मिती केली जावी. यासह शासन विविध उपाययोजना करीत आहे, यासाठी पशुसंवर्धन आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर 25 हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने
  सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर

25 हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

 

मुंबई, दि. 02 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये यांचे सहकार्य या शिबिरांच्या आयोजनासाठी मिळणार आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा जोतिबा फुले जन – आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.

सामाजिक आरोग्य शिबिरांचे आज प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन करण्यात आले. तसेच जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील शिबिरांचे आयोजनही करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरीकांचे स्क्रिनींग करणे, रक्तांच्या तपासण्या, ई.सी.जी तपासण्या, आयुष्मान भारत (आभा कार्ड)  योजनेचे कार्ड वाटप, आवश्यक औषधांचे वाटप, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचाराकरिता समन्वय करण्यात येणार आहे.  तसेच शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे.

  तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारासाठी  शासनाच्या धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी समन्वय करण्यात येईल. शिबिरांमध्ये सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत.  ही शिबिरे सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत आयोजित होतील. एका सामुदायिक आरोग्य शिबीरात 100 ते 250  नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 25 हजार शिबिरे व 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

निदान झालेल्या रुग्णांवर  आवश्यकतेनुसार धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, विविध शासकीय योजना यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे. शिबिराचे स्थान दलित वस्ती, आदिवासी पाडे, भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्याजवळील शाळा, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

0000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई, दि. 2 : शासनाच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख 10 हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

      मंत्री श्री. लोढा म्हणाले की, भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी 8 हजार 170 आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच 2 लाख 21 हजार 244 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार युवा रुजू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi