आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रिया आकृतीबंधानुसार
- मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई, दि. ०२ : आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रियेत आकृतीबंधाची पूर्णपणे अंमलबजावणी केली जात असून भरती प्रक्रिया आकृतीबंधानुसारच होत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य शिरीषकुमार नाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विनोद निकोले, सुनील भुसारा, राजेश पाटील, डॉ. देवराव होळी, रोहित पवार यांनीही सहभाग घेतला.
मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून त्यानुसार १४,३५९ इतकी नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच ६,०८८ पदांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे भरण्यात आले आहेत. तसेच गट-‘अ’, गट-‘ब’, व गट-‘क’ (लिपिक वर्गीय पदे) मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे.
विभागातील गट-‘अ’, गट-‘ब’ पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यात आलेली आहे. तर गट-‘क’ मधील पदोन्नतीची पदे भरण्याबाबतची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक नर्स याप्रमाणे एकूण ४९९ नर्स बाह्यस्रोताद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून नर्स पदे बाह्यस्त्रोतांद्वारे उपलब्ध करुन घेण्यासाठी जेम पोर्टलवर (GeM Portal) निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. रोजंदारी पद्धतीने कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेले रोजंदारी कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.