Monday, 2 October 2023

तुळस

 *तुळस*

              “ मी वेडी नाहीय्ये हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेलीय. विनाकारण डांबून ठेवलेय या वेड्यांच्या इस्पितळात. मला गोळ्या इंजेक्शनं याची काहीच गरज नाहीये. उगाचच माझे हाल करताहेत सगळे. नर्स, वॉर्डबॉय, इथले डॉक्टरही. सांगून सांगून थकले मी. परोपरीने मी विनवण्या केल्या, हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी. म्हातारी झाले म्हणून काय झाले? मी हिंडू फिरू शकते. चांगलं बोलते तशी वागतेही. काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलंय? सुरूवातीस सगळे सांगतील तसं केलं तरीही छळ मांडला गेलाच माझा. ” मी फाईलवरनं हात फिरवत होतो. ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात ओघ होता. रडकथाच पण ती रडत नव्हती. हतबलता डोळ्यांतून पाझरत असलेली. व्हेरी डेंजरस, व्हायोलंट, पझेसिव्ह, फाईलमधले शेरे व तिचं म्हणणं मेळ खात नव्हते. काउन्सेलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूणएक पेशंटसच्या फाईली बघून झाल्या होत्या. नेहेमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमधे दखल न देता प्रत्येक केसमधे काऊन्सेलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार ठरवण्याची मुभा मात्र होती. तसं पाहिलं तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते. तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलिकडे गेलेल्या असतात. मग अशा केसेसना वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं. मनोविकारतज्ञ व्हायचं हे एमबीबीएस झाल्यावर नक्की केलेलं. मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व. प्रत्येक रूग्णाची कथा व्यथा निराळीच. मनोविकारांचे एकेक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी, विकृत, दळभद्री, अनुचित, नैराश्याने ग्रसलेली, क्वचित शिसारी आणणारी,शेंडाबुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते. हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप,विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं. साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात. अंधुकशी आशा कुठेतरी असते की संपेल हे नर्कातलं जगणं. अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल. अशीच ही केस, फाईलवर नाव ठळकपणे लिहीलेलं होतं तरीही विचारून घेतलं, “ नाव काय आपलं? ” बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही. शून्यमनस्कपणे खिडकीतून बाहेर बघत राहिल्या. खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरीपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहेरा भाजून निघत असलेला. तरीही मघा ज्या अजीजीनं म्हणणं मांडत होत्या, त्या आता थिजल्यासारख्या. मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही. भरभरून बोलणं व मधूनच एकदम गप्प होऊन जाणं हे मनाने आजारी असलेल्यांमधे तसं नेहेमीचंच. अशावेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच. तीही बोलेना, मीही बोललो नाही. इतर रूग्णांनाही भेटायचं होतं. मी हलकेच उठलो. खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला, “ मी वृंदा गोखले….” तरीही मी उद्या येतो म्हणत खोली सोडलीच. 

       गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एकेक विलक्षण कथा ऐकावयास, पाहावयास मिळतात. त्यातही काही तर चटका लावणाऱ्याच. त्यापैकीच ही एक असावी. अगदी घरी जाईपर्यंत व घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांचा पीडेने करपलेला चेहेराच सारखा समोर येत असलेला. फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं. अडीच तीन वर्षांपूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या. कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता. त्यावेळचे डॉक्टरही बदलून गेलेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येतात. त्यावेळेस सतत रडणं, किंचाळणं, कधीकधी दार खिडक्या आपटणं. हातात असेल ते फेकून मारणं व मग जोर ओसरला की उदासवाणे होऊन बसून राहणं काही खाता न पिता दिवसच्या दिवस. त्यातही ‘ मी वेडी नाही. ’ हा हेका कायम. सीनिअर सिस्टर व सीनिअर वॉर्डबॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रूजु झालो होतो त्यादिवशीच सांगितलं होतं. दीड महिना झाला रूजु होऊन. या दिवसांत मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या. त्यात ही गोखलेंची. पडलेल्या चेहेऱ्याने वावरणाऱ्या. 

          दुसऱ्या दिवशी गोखले काकू जणू वाटच पहात असल्यासारख्या. अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी भेटायचं हे ठरवलं होतं. जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा. नेहेमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहेऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला. इस्पितळात वावरताना रोज नजरानजर व्हायची. डॉक्टर रूग्ण एवढीच ओळख एकमेकांची. गोळ्या औषधं घेतली का नाही असे जुजबी बोलणं. कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून. आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाटेवर बसवून घेतलं. “ मी वृंदा गोखले, बोलू का? ” मी मानेने होकार भरताच त्या भडभडून बोलायला लागल्या. “ तीन वर्षं झाली त्या गोष्टीला. म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला!! सगळं लख्ख आठवतंय. का नाही आठवणार? सगळं घडलंच होतं विपरीत. कधीही विसरता न येण्याजोगं. साठ वर्षांचा सहवास सोडून हे गेले. दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले. सोन्यासारखी दोन मुलं ती परदेशात युएसला. मुलगी कॅनेडात. तिघांचाही सुखी संसार. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले. सर्व मुलामुलींनी आपल्या बरोबर रहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा. मुलं हुशार निघाली. मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत. ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळवजा राहती जागा तशीच ठेऊन कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी. अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून, मग सुना आणल्या. मुलं, मुलगी, सुना सगळे हुशारच. सगळे कमवते. काहीच ददात नाही. ” गोखले काकूंनी आवंढा गिळला. मधेच थबकल्यासारख्या, काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ. मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला. 

          “ ह्यांच्या आजारपणातच दीड वर्षं गेलं. इथे मी एकटीच. सर्व सेवा केली. पैसा अडका काही कमी पडू दिलं नाही. मुलांना, मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला, बाबांना भेटायचंय. कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात. मी माझ्यापरीने कुठेही कमी पडले नाही. शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील, बरे होतील. आणखी काही दिवस असतील सोबत. पूर्वीही सुखासमाधानाने जगलो होतो. परत तसेच जगू!! मी तर साठ वर्षे अधिराज्यच गाजवलं होतं आयुष्यात. किती दागिने घातले होते, किती पैठण्या नेसल्या होत्या, किती मिरवून घेतलं होतं, मोजदादच नाही. वाटलं होतं असतील सोबत काही दिवस. होतील बरे, पण तसं व्हायचं नव्हतं. ”

     बराच वेळ पुन्हा त्या गप्पच. मग एकदम कडवटपणे म्हणाल्या, “ ते गेल्यावर सगळे आले. क्रियाकर्म पार पाडण्याचीही वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी. शनवारातली बखळवजा जागा, कोथरूडमधले दोन फ्लॅट्स, शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला. मुंबईतील कोणीतरी मोठी असामी होती त्याच्याबरोबर, बॅंकेतील लॉकरमधील कॅश व दागिनेही आपापसात वाटून घेतले. सहा महिन्यापासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्यांची म्हणे!! नंतर कळलं मला ते! मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं. तसं सर्टिफिकेट ही मिळवलं कायदेशीर व मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून. एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून. तरीही मुलगी विचारत होती, तुला माहेराहून मिळालेली मोत्यांची नथ यात दिसत नाही ती!! मग मात्र मी वेडच पांघरलं. आतून तर कोसळूनच पडली. जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं. दहा दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. पंधराव्या दिवशी सगळे पांगलेसुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात तशी मी भिरकावली गेली इथे. ” कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी. 

        माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली. मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो. एके ठिकाणी थांबलो. त्या पानावर लिहीलं होतं, सुनेच्या कपाळावर साणसी फेकून मारून भोक पाडलं होतं. मी नेमकं त्यावर बोट ठेऊन गोखले काकूं समोर धरलं तर त्या शांतपणे म्हणाल्या, “ सगळं खोटं आहे. मुलाला बोचकारल्याचं, भला मोठा आरसा फोडल्याचं, देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहीलं असेल!! ”

       मी म्हटलं, बरोबर आहे, पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही? त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या, “ इतकी वर्षं माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे!! ” यावर काय बोलावं सुचेचना!! त्यांच्या शब्दाशब्दांतून अगतिकता पाझरत होती. मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी, अधिराज्य गाजवणारीला पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल. किती भोगलं असेल वृंदाकाकूंनी. त्यापेक्षा वेड लागलेलं परवडलं!! 

         गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे? अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबड गीते, मोठ्या मुलांसाठी गोष्टी, व्रतवैकल्ये करणाऱ्यांसाठी कहाण्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी कथा, मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल. गोखलेकाकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आतापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं. “ मला झोपेच्या गोळ्या नकोत रे!! मी तासनतास झोपून राहते. सारखी मरगळ मुरते मग अंगात!! मला जगायचंय अजून! मला माणसांत रहायचंय.” त्यांच्या काकूळतीने मलाही गलबलून यायचं. त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं. हळुहळू त्यांच्या गोळ्यांचा डोस टेपर करत आणला.

           बरेच दिवस गेले. गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती. त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं. इस्पितळातून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखानी फोटो स्टुडिओ होता तेथे गेलो व त्यांचा एक विडीओ बनवला व युट्युब वर अपलोड केला. अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं. मग रोज एक विडीओ द्यायला लागलो. त्यांची बडबड गीते, गाणी,लोकरीचे विणकाम, रांगोळ्या, हातावरची मेहेंदी, आजीबाईचा बटवा, गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी, व अनुभवाचे बहुमोल दोन बोलही, त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं. चॅनलचं नाव ठेवलं, *तुळस*. आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. आपापली मते, आपापल्या समस्या, आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले. सुरूवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रूळावल्या. काही दिवसात तर मित्राने *तुळस* पेड चेनल करून टाकलं. काकूंकडे तेवढीच गंगाजळी. चॅनल पेड केलं तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या. ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात. 

        मी आपला बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो. थोड्याश्या पाण्यानेही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी. तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो!! 


*© डॉ. जयंत गुजराती* नासिक

१८/९/२०२२

मो.९८२२८५८९७५

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

शाळा सुटली पाटी फुटली!

 शाळा सुटली पाटी फुटली!

  काही दिवसांपूर्वी माझ्या बालवयातील हे गाणे एका ग्रुपवर ऐकले आणि दगडी पाटीची आठवण मनात घर करून राहिली. मध्यंतरी लास्या,माझी नात वय वर्षे पावणेदोन हिच्यासाठी तिच्या आजोबांनी एक पाटी आणली पण दगडी पाटी मात्र मिळाली नाही. पत्र्याची मिळाली जी काही दिवसांतच खराब झाली. नातीनेही समजून शीss(खराब) झाली म्हणून बाजूला टाकून दिली.तिच्या बोबड्या बोलानी पाटी पेशील (पेन्सिल) हा हट्ट धरल्याने दुसरी पाटी आणणे क्रमप्राप्तच होते. पण आता मात्र दगडीच पाटी हवी असा म्हातारा हट्ट मी धरला.आणि यजमानांची पंचाईत झाली. सुदैवाने पेणला आमच्या गावी फेरी झाली आणि ह्यांना मी सांगितले की पेणला नक्की पाटी मिळेल व ती मिळाली ही! 

 पाटी हातात घेताच मी १-४च्या इयत्तेत फिरुन आले.

दगडी पाटी शी किती आठवणी निगडीत होत्या. दसऱ्याच्या दिवशी केले जाणारे पाटी पूजन त्यासाठी कोळश्याने पाटी घासून काळीकुळकुळीत करणे त्यासाठी दिवसांचा अर्धा वेळ वापरणे, (वाया घालवणे असे मी म्हणणार नाही), दगडी पाटीवरचा न केलेला अभ्यास पुसला बाई असे केविलवाणा चेहरा करून सांगणे.कारण बरेचदा माझा अभ्यास खेळण्याच्या नादात झालेलाच नसे शाळेतून घरी आल्यावर बाजूला टाकलेले  दप्तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हातात येई. ज्या दिवशी अभ्यास झाला असेल त्या दिवशी दिमाखात पाटी ची कडी हातात धरून शाळेत जात असे व वर्गात बाई आल्याबरोबर बाई अभ्यास तपासता ना असा आगाऊपणा ही चौथीत असताना मी बरेच वेळा केला होता. अर्थात त्या बाई होत्या माझी चापलुसी  त्यांच्या लक्षात यायची व त्या गालातल्या गालात हसत माझी पाटी सोडून बाकी सर्वांच्या पाट्या पहात असत.

   पाटीवरचा अभ्यास पुसू नये म्हणून दप्तरात दोन पुठ्ठे असायचे त्यांच्यामध्ये पाटी ठेवली की ती पुसत नसे. दप्तर तपासल्यावर माझी थाप बाईंच्या लक्षात यायची आणि हातावर एक  हलकीशी पट्टी मारून माझी शिक्षा पूर्ण होत असे. विशेषतः पाढे लिहायचा अभ्यास असला की तो हमखास पुसला जाई. त्यावेळी भरपूर अभ्यास करण्यासाठी डबल पाटी सुध्दा मिळायची. मी भरपूर अभ्यास करावा म्हणून आई ने ती पाटीसुध्दा माझ्यासाठी आणली होती.पण अभ्यास करायचाच नाही, पाढे लिहायचे नाही असा पण जिने केला होता तिला डबल पाटी काय उपयोगाची! पण ती सर्वांकडे नसे त्यामुळे ती पाटी अप्रूपाची होती.

   पाटी फुटणे हे एक कार्यक्रम असायचा.वर्षातून किमान ४-५ पाट्या तरी मला लागत असत. 

पाटी फुटली की किमान महिनाभर तरी ती आईपासून लपून राहायची कधी आई अभ्यासाला घेऊन बसली की तिच्या लक्षात येत असे मग तिचा एक धपाटा पाठीवर पडायचा आणि रडारडीत  अभ्यास पुन्हा बाजूला! 

 पाटीवरची पेन्सिल हा पण मजेचा विषय, रोज एक रुळ( पेन्सिल )लागायचा. साधा रुळ व चांदी लावलेला रुळ असे दोन प्रकार तेव्हा उपलब्ध होते. अभ्यासाला बसण्यापूर्वी त्याला घासून टोक काढणे ,पाटी पुसण्यासाठी स्पंज भिजवणे किती कामे करावी लागत.

  आज हे सर्व दगडी पाटी पाहिल्यावर आठवले. आजच्या शाळेत पाटी हा प्रकारच नाही. शिशुवर्गापासूनच वही पेन्सिल!

पाटीची ही मजा त्यांना मिळत नाही. अर्थात त्यांचे मस्तीचे फंडे वेगळे  आहेत.

  लास्याला तिच्या आजोबां बरोबर पाटीवर रेघोट्या मारताना पाहून आनंद झाला. तीही खूप आवडीने पाटी घेऊन बसते. तिची तिची रेघोट्या मारून हे फिशु (फिश) चंदामामा, फूल  पान ,पाटीवर हात ठेवून हाताचा छाप काढण्याची हुबेहूब नक्कल करणे व स्वतःचा जीव रमवणे हे चालू असते. आम्ही तिला सांगतो पाटी हळू ठेव ,फुटेल ,हेच वाक्य आमच्या हातात पाटी असल्यावर आम्हांला ऐकवते .

 निरागसता ती हीच!

असो पाटीपुराण खूप झाले.

शाळा सुटली ,पाटी ही सुटली,पण

नातीच्या योगे पुन्हा हाती आली!

*अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले….?*

 *अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले….?*

अमेरिकेचे अवास्तव कौतुक करणाऱ्यांनी हा 👇👇लेख जरूर वाचावा...

      1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.

       स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल.

पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.

*घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली ...!*

घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही... ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे... !

         घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !

           स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले...?

     1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.

अमेरिकेत 15% स्त्रीया  एकट्या राहतात.

12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.

19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.


केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.

   अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या  बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे... 


41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत  कौमार्य असे काही उरले  नाही...

परिणामी, अमेरिकेत  सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,


   67 टक्के द्वितीय विवाह आणि 

74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.

*फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.*

 स्वयंपाकघर नसेल तर....

 युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.

         *आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.*

बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो ...

*घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!*

अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.

म्हणूनच *पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………*

*आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो... स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो...*

*अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.*

भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे...

आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात... जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल...

       *आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.*

     *म्हणूनच घरी स्वयंपाक करा,*

     *आणि.....*

           *आनंदाने जगा….!*

                   🙏🙏

जय गणेश

 


विवाहित मुलींनो तुम्ही सुध्दा अनुकंपा नोकरीसाठी पात्र आहात ,

 विवाहित मुलींनो तुम्ही सुध्दा अनुकंपा नोकरीसाठी पात्र आहात ,                                                                  मुंबई उच्च न्याालयाच्या नागपुर खंडपीठाने विवाहित मुलीला अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणे घटनाबाह्य ......

कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मंजूरी

 कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मंजूरी


                        - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई 1 :सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


साताऱ्यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे. दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे चार तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

स्वच्छता ही सेवा' अभियानात नागरी भागात

 'स्वच्छता ही सेवाअभियानात नागरी भागात

१६ लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

·       'एक तासस्वच्छतेतून राज्यात १९४२ टन कचऱ्याची विल्हेवाट 


मुंबईदि. १ - 'स्वच्छता ही सेवाअभियानाअंतर्गत आज राज्यात 'एक तारीखएक तासस्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील  सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छ्ता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली. 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 या पंधरवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज एक तास विशेष मोहीम राबविण्यात आली. यात राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनोज सौनिकबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज आदींनी गिरगाव चौपाटी येथेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी शिवडी किल्ला येथेउपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी बारामती येथे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्यखासदारआमदारस्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध ठिकाणी या अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली.  



या अभियानात मान्यवरांसोबत विविध सामाजिक संस्थाइंडियन मेडीकल असोशिएशनक्रेडाईइंडियन ऑईलभारत पेट्रोलियमआरबीआयएसबीआयआयसीआयसीआयबॅंक ऑफ इंडिया या बॅंकाइंडियन टुरिझमलायन्स क्लबरोटरी क्लबमाउली फाउंडेशनशिवदुर्ग  ट्रेकर्स फाउंडेशनबचत गटांचे सदस्य आदींनीही उत्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता केली.



'स्वच्छता हीच सेवाअभियानाअंतर्गत नागरीकांच्या सहभागाने जास्त कचरा असलेले क्षेत्ररेल्वे लाईनबस स्थानकेराष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारील जागानदीघाटजलस्त्रोतझोपडपट्ट्यापुलाखालच्या जागाबाजारपेठागल्ल्याधार्मिक स्थळेसार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसरपर्यटन स्थळेटोलनाकेप्राणी संग्रहालयगो-शाळाडोंगरसमुद्र किनारेबंदरेआरोग्य संस्थाचा परिसरअंगणवाडीशाळामहाविद्यालय परिसरइत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.



जनतेच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वच्छता करणे व स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणेहा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून सर्व नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दिली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य (झाडूकचरा पेट्याथैल्या इत्यादी) सबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा प्रक्रिया केंद्रावर योग्य ती विल्हेवाट लावण्यात  आली.

000

Featured post

Lakshvedhi