Saturday, 2 September 2023

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाही

 राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाईफुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाही

मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, दि. २ - सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.


            समाजाची निःस्वार्थ भावनेने, निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत.


            सन २०२२-२३ च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात ३७, माध्यमिक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाइड साठी दोन असे एकूण १०८ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे.


000



 

आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाणअवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू

 आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाणअवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या

दिशेने भारताची वाटचाल सुरू


- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २:- चंद्रयान-३ च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे भारताचे पहिले सूर्ययान आज सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारतानं आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, चंद्रयान आणि आता सूर्ययानाच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आपल्या देशाला अवकाश संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख, वलय, विश्वास मिळवून दिला आहे. यापुढे देखील अनेक अवकाश मोहिमा राबवून देशाच्या, जगाच्या संशोधन क्षेत्राच्या विकासात मोठी भर घालण्यात आपण यशस्वी होऊ

         भारताच्या या गौरवशाली वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंता, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त भारतीयांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले आहे.


000

वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीमुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा

 वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीमुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील



             मुंबई, दि. १ : ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे नवीन अभ्यास केंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते


            या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यास केंद्र तयार करता येतील का याबाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे जी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल.


             तसेच उच्च शिक्षणामध्ये व्यवसायिक उपयोजित व कौशल्याधिष्टीत शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.


            बैठकीत शैक्षणिक सुविधा, जिल्हा केंद्र समन्वयक, जिल्हा केंद्रप्रमुख मानधन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे, आरोग्यमित्र, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली

पनवेल-चिपळूण थेट रेल्वे सेवा ; तिकीट फक्त ५0 रूपये...

 पनवेल-चिपळूण थेट रेल्वे सेवा ; तिकीट फक्त ५0 रूपये...


कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

गाडी ४ सप्टेंबर ते ३0 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे. या गाडीचे आरक्षण होणार नसून प्रवाशांना करंट बुकिंग करावे लागणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकाच्या खिडकीवर तिकिटे उपलब्ध होतील.

ही गाडी सकाळी ११ वा. १0 मि. सुटेल.

रोहा,

कोलाड,

इंदापूर,

माणगाव,

गोरेगाव रोड,

वीर,

सपे वामने,

करंजाडी,

विनहेरे,

दिवानखावटी,

खेड,

अंजनी,

चिपळूण आदी ठिकाणांहून प्रवास करीत त्याच दिवशी संध्याकाळी चिपळूणला ४ वा. पोहचेल.

चिपळूणहून ही गाडी सायं. ५.३0 वा. पनवेलकडे याच मार्गाने रात्री १0.३0 वाजता पोहोचेल.

या रेल्वे प्रवासाचे तिकीट फक्त ५0 रूपये आहे...

📌 *Received In Other Group*

*Copy Paste*

Friday, 1 September 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात निर्णय, योजनेची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात निर्णय, योजनेची माहिती


            मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.

विमानतळाच्या आजुबाजूला मुक्त उड्डाणक्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी

 विमानतळाच्या आजुबाजूला मुक्त उड्डाणक्षेत्रात

 फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी


 


        मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जीत करणारी वस्तू, पतंग आदींना बृह्न्मुंबई क्षेत्रात 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.


          कोणत्याही विमानाच्या लॅंडींग, टेक ऑफ आणि आवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशाप्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.


      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.


०००००

पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईटएअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर 16 सप्टेंबरपर्यंत बंदी

 पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईटएअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर 16 सप्टेंबरपर्यंत बंदी


 


            मुंबई, दि. 1 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणक्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2023 पर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.


            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे बंदीचे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.


००००


निलेश तायडे

/विसंअ


 


Featured post

Lakshvedhi