Friday, 1 September 2023

कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज

 कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज


- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

            मुंबई, दि. १ : निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरुपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.


            ‘शून्य अपघात’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अग्निशमन क्षेत्रात सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व संशोधन या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना आणि अग्निशमन क्षेत्रात काम करणाऱ्या जवानांना किंग्ज एक्सलन्स पुरस्कार वितरण आणि परिषदेचे आयोजन किंग्स एक्पो मीडिया यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री डॉ. खाडे बोलत होते.


            व्यासपीठावर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, एमआयडीसी, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष वरीक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक देवीदास गोरे, कार्यक्रमाचे संयोजक आणि किंग्ज एक्स्पो मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता, भारत पेट्रोलियमचे अग्नि आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख अरुणकुमार दास उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते ‘किंग्ज एक्सलन्स पुरस्कार’ २१ जणांना, ‘सेफ इंडिया हिरो प्लस पुरस्कार’ ५९ जणांना, ‘सेफ टेक कार्पोरेट पुरस्कार’ ३ जणांना, ‘सेफ्टी प्रुफ पुरस्कार’ ३८ जणांना प्रदान करण्यात आले.


            कामगारांचा जीव वाचावा, यासाठी अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि अनेकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारे अग्निशमन सैनिक या दोघांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे अतिशय कौतुकास्पद काम या पुरस्काराच्या निमित्ताने होत असल्याचे सांगत मंत्री श्री. खाडे यांनी समाधान व्यक्त केले. उद्योजकांनी कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.


             कोणत्याही क्षेत्रात आपण कामगारांचे कौशल्य वापरून वास्तू, वस्तू किंवा यंत्र तयार करतो. त्यामुळे कामगारांचे महत्व अनण्य साधारण आहे. आपला कामगार कसा काम करतो, त्याच्या हातात कोणती सुरक्षा साधने आहेत, तो सुरक्षितपणे काम करतो की नाही याची खात्री पर्यवेक्षकाने करणे आवश्यक आहे. मालक, व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाने कामगारांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवावे. असेही मंत्री श्री.खाडे म्हणाले.


            शासनसुद्धा कामगार मंत्रालयातून कामगारांना सुरक्षित साधनांची संच देण्यात येतो. आतापर्यंत ४० लाख नोंदणीकृत बांधकाम व संघटित कामगारांना अशा संचाचे वितरण शासनाने केले आहे. त्यात हातमोजे, सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, सुरक्षा पट्टा, बूट, बॅटरी इत्यादी सुरक्षा साहित्य प्रत्येक कामगाराला मोफत देण्यात आल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.   

महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण

 महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण












            मुंबई, दि. 1 : माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.


            ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते.


            या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.


            यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली 75 टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. ‘महेंद्रगिरी’ या प्रोजेक्ट 17 ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा योग्य दाखला आहे. भारताच्या नौदल सामर्थ्याच्या महत्त्वावर भर देत उपराष्ट्रपती श्री.धनखड म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज आहे.


             विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे व्यापाराच्या आकारमानात वाढ असा अर्थ आहे. भारताच्या व्यापारापैकी 90 टक्के मालाची वाहतूक सागरी मार्गाने होते. ही बाब विचारात घेता आपला विकास आणि आपली प्रगती यामध्ये महासागरांचे महत्त्व अधोरेखित होते. वाढत्या क्षमतेबरोबरच जबाबदारीत देखील वाढ होते. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत एक संपूर्ण सुरक्षा पुरवठादार म्हणून उदयाला येत आहे. आज आपण एक सुरक्षित आणि त्याबरोबरच महासागरावरील शांततापूर्ण, नियम आधारित सागरी व्यवहार सुनिश्चित करणारे महत्त्वाचा जागतिक देश आहोत. हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील जास्त व्यापक सुरक्षा यांच्यासमोर विविध प्रकारची आव्हाने आहेत. भारतीय नौदल भारताच्या सागरी हितसंबंधाचे रक्षण, संवर्धन आणि त्यांना चालना देण्याचे काम अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने करत आहे. याबद्दल मी या दलाचे अभिनंदन करतो. या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी ‘धरोहर’ या माझगाव डॉक्स लि. येथील हेरिटेज संग्रहालयालाही भेट दिली.


युद्धनोकेची वैशिष्ट्ये


            ‘महेंद्रगिरी’ हे नाव ओडिशा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे, प्रकल्प 17A फ्रिगेट्स श्रेणीतील ही सातवी युद्धनौका आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) ची फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती असून, यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. ‘महेंद्रगिरी’ युद्धनौका ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि ती, भविष्यातील स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने पुढे जाताना, स्वतःच्या समृद्ध नौदल वारशाचा अभिमान बाळगण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.


            ही युद्धनौका एकात्मिक बांधकाम पद्धतीचा वापर करून बनवण्यात आली असून, यामध्ये समांतर आउटफिटिंगसह हल ब्लॉक्सचा समावेश आहे. या जहाजाचे बांधकाम वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये केले गेले आहे, आणि त्यानंतर माझगाव डॉक्स लि.येथे स्लीपवेवर त्याचे एकत्रीकरण आणि उभारणी करण्यात आली आहे. ‘महेंद्रगिरी’ च्या बांधणीची पायाभरणी 28 जून 2022 रोजी करण्यात आली होती, आणि ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्यक्ष कामगिरीसाठी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अंदाजे 3450 टन वजनाचे हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल.


मेसर्स माझगाव डॉक्स लि. चे योगदान


            प्रकल्प 17 ए कार्यक्रमांतर्गत, मेसर्स माझगाव डॉक्स लि. ची एकूण चार जहाजे आणि मेसर्स जीआरएसई ची तीन जहाजे बांधकामाधीन आहेत. प्रकल्प-17ए जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरो, अर्थात युद्धनौका रचना संस्थेने केली आहे. ही संस्था सर्व युद्धनौकांचे डिझाइन बनवणारी अग्रणी संस्था आहे. माझगाव डॉक्स लि आणि जीआरएसईद्वारे 2019-2023 दरम्यान या प्रकल्पातील पहिली सहा जहाजे पुरवण्यात आली आहेत. प्रकल्प-17ए हा भारतात उत्पादने घेण्याच्यादृष्टीने विकास करून आणि आर्थिक परिप्रेक्षामधील कामगार/उद्योजक/एमएसएमईंना पाठबळ देऊन देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देत आहे . अंदाजे 210 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) या प्रकल्पामध्ये गुंतवणूक असून, अंदाजे 1000 उपकंत्राटी कर्मचारी या प्रकल्पासाठी माझगाव डॉक्स लि. च्या परिसरामध्ये कार्यरत करण्यात आले आहेत.


            सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 13 संस्था (PSUs) जटिल उपकरणे आणि प्रणालींचा पुरवठा करून, या प्रकल्पात योगदान देत आहेत. सरकारच्या "आत्मनिर्भर भारत" च्या धोरणाला अनुसरुन प्रकल्प-17A अंतर्गत 75 टक्क्यांपेक्षा जास्त साहित्याच्या पुरवठ्याची जबाबदारी एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आली आहेत. महेंद्रगिरीचे आजचे जलावतरण हा आपल्या देशाने स्वावलंबी नौदलाच्या उभारणीमध्ये केलेल्या अतुलनीय प्रगतीचा द्योतक ठरेल.


०००००

शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार

 शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार

- कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

            मुंबईदि. १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या 'मेरी माटीमेरा देशया अभियानांतर्गत कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मातीला नमन करून पूजन केले. जीवातजीव असेपर्यंत आपण मातीशी एकनिष्ठ राहणार असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

            ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगलअपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह उपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांनी मातीला वंदन करून पूजन केले.

            यावेळी मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले कीमेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत देशभर मातीच्या पूजनाचा आणि मातीला वंदन करण्याचा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मातीशी जोडले पाहिजे. मातीशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मतदारसंघात मेरी माटीमेरा देश कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत. मात्र व्यस्त कामामुळे गावाकडे मातीचे पूजन करणे शक्य झाले नसल्याने, आज मुंबईत मातीला वंदन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी

 मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचेही निर्देश


          मुंबई, दि. १ : ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांना दिले.


          ‘मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्री. चहल यांना सांगितले आहे.


          माझगाव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच या परिसरातीलच नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्लीबोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरित पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.


          माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्रकिनारे यांची स्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे आयुक्त डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबई दौऱ्यावर

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबई दौऱ्यावर

            मुंबई, दि. १ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.   


            उपराष्ट्रपती श्री. धनखड आज सपत्नीक एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार ॲड.आशिष शेलार, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह लष्कर, नौदल, वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार

 गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रो गोविंदाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून अभिषेक बच्चन यांच्या नावाची घोषणा


          मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


          वरळी येथील एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.


          राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


          उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


          क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. या स्पर्धेसाठी एमआयडीसी आणि दहीहंडी समन्वय समितीचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.


          या स्पर्धेचे थीम 'घेवून टाक' ही आहे. तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.


0000


राजू धोत्रे/विसंअ/

परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखलअभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा

 परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखलअभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा      

            लंडन / मुंबई दि. ३१ :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत.


            आजपासून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. लंडन येथील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांची शिष्टमंडळाने अभ्यास भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळातील विधिमंडळ सदस्य, विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी यांनी ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग, प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षणासंदर्भातील कायदे, ग्रीन एनर्जी, पवनचक्की प्रकल्प, उद्योग, महिला सबलीकरण, महिला अत्याचारालाप्रतिबंध होण्यासाठीचे कायदे इत्यादीबाबत सादरीकरणाव्दारे विस्ताराने माहिती दिली.


                   विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी अनुक्रमे उद्योगवाढीसंदर्भातील ब्रिटनमधील ध्येयधोरणे, महिलाहक्क आणि संरक्षणासंदर्भातील कायदे, उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील सदस्यांनी भाग घेतला. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी आणि मान्यवरांचा उभयतांच्या हस्ते शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


                   अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ उद्या शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, मुख्यालय, लंडन येथे (Commonwealth Parliamentary Association) महासचिवांची (Secretary General) अभ्यासभेट घेणार आहे. शनिवार, २ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लंडनमधील महाराष्ट्र मंडळाबरोबर भेट आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३ रोजी अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळ मुंबईत परत येईल.


***

Featured post

Lakshvedhi