Friday, 1 September 2023

राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा

 राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा


- मंत्री छगन भुजबळ


          मुंबई, दि. ३१ : राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अंत्योदय योजनेचा इष्टांक संपला, तर प्राधान्य कुटुंब योजनेतून दिव्यांग बांधवांना अन्न धान्य देण्यात यावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्न धान्यापासून दिव्यांग वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.


          मंत्रालयात आज आयोजित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.भुजबळ बोलत होते.


          अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून आवश्यकतेनुसार अर्थसहाय्य मिळण्यासाठी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


          मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, जनतेला रास्त भाव दुकानांमधून वेळेत शिधा उपलब्ध करुन देण्याची दक्षता विभागाने घ्यावी. शिवभोजन केंद्राच्या माध्मयातून गरजूंना सहाय्य होत असून सर्व शिवभोजन केंद्र सुरळीतरित्या सुरु असण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. जे शिवभोजन केंद्र मुदतीत सुरु झाले नाहीत, याबाबत कालमर्यादेत माहिती मागवून अद्याप सुरु झालेले नाहीत, अशी केंद्रे रद्द करावीत. शिवभोजन केंद्रांची देय असलेली देयके वेळेत द्यावीत. राज्यातील जनतेला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून अधिक तत्परतेने गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागाचे संगणकीकरण करून अधिक पारदर्शकता आणावी, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.


          वैधमापन विभागाचा आढावा घेऊन सर्व ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, पूरक साधनसामग्री, वाहन व्यवस्था ठेवण्याचे सूचीत केले. वाहन काट्यांप्रमाणे (वे ब्रीज) प्रमाणे पेट्रोल पंप तपासणीसाठी सुध्दा SOP (प्रमाणित संचालन कार्यप्रणाली) बनवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.


          बैठकीस सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरगाणा, कळवण तालुक्यातीलसिंचन योजनांना निधी देऊन गती देणार

 सुरगाणा, कळवण तालुक्यातीलसिंचन योजनांना निधी देऊन गती देणार


- उपमुख्यमंत्री अजित पवार


     मुंबई, दि. ३१ : नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


          उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार नितीन पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्यप्रणालीद्वारे), नाशिकचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ गीते आदी उपस्थित होते.


          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सुरगाणा हा आदिवासी दुर्गम तालुका आहे. केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या आकांक्षित (मागास) तालुका कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून तालुका, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढवावा लागेल. येथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल.


          जलसंधारण विभाग, आदिवासी विकास विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सुरगाणा, कळवण तालुक्यातील विविध लघु पाटबंधारे योजना तातडीने पूर्ण कराव्यात. काही सिंचन योजनांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे, तर बऱ्याच योजनांना पाणी वापर प्रमाणपत्र मिळाले आहे. या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.


          आदिवासी तालुक्यांतील अपर पुनद, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, वाघधोंड, उंबर विहीर, सालभोये, सिंगलचोंढ या लघु पाटबंधारे योजना तसेच विविध पाझर तलाव लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

सन आयलाय गो,शिवलकर नाका अलिबाग

 


Thursday, 31 August 2023

रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठीवॉर रुम’ तयार करावी

 रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठीवॉर रुम’ तयार करावी


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


 


          मुंबई, दि. ३१ : आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रुग्ण सेवेसाठी उपकेंद्र आता 'हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर'मध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रुग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी 'वॉर रूम' तयार करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.


            उपकेंद्रस्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कामाचे मूल्यमापन, उपस्थिती, रुग्ण सेवा आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे सादरीकरण आज मंत्रालयीन दालनात मंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसचिव विजय लहाने, ट्रान्स ग्लोबल जिओनॉटिक्स कंपनीचे श्रीनिवास आदी उपस्थित होते.


            ॲपच्या अनुषंगाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचना देत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना ॲप हाताळणी, भरावयाची माहिती याबाबत विभागनिहाय कार्यशाळा घेवून प्रशिक्षित करावे.


              राज्य कामगार विमा योजनेची मुंबईत अंधेरी, वरळी, मुलुंडसारख्या ठिकाणी रुग्णालये आहेत. मात्र, येथील खाटांच्या संख्येच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. केंद्र शासनाकडून मिळत असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. रुग्णांलयामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले. ही रुग्णालये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत चालविणे शक्य नसल्यास आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. राज्य कामगार विमा सोसायटीच्या बैठकीला संचालक डॉ. अलंकार खानविलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


0000

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतचीकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतचीकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


 


          मुंबई, दि. ३१ : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करून जनतेच्या सेवेत रूजू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.


          मंत्रालयीन दालनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सोयीसुविधा विकास शाखेच्या बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेताना बोलत होते. बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसचिव विजय लहाने, जनआरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंद्रे, पायाभूत सोयीसुविधा विकास शाखेचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.


          आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी 15 व्या वित्त आयोगाचा मंजूर निधी पूर्णपणे खर्च करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मंजूर कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्यानुसार (प्रोग्रॅम इम्प्ल‍िमेंटेशन प्लॅन) कामे पूर्ण करावीत. मंजूर कामांवरील पूर्ण खर्च करण्यात यावा. नवीन निर्माण करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये 'स्टाफ पॅटर्न' तयार करावा. मनुष्यबळ पुरवून रुग्णालय जनतेच्या सेवेत सुरू करावे.


          महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेची कार्ड ई केवायसी पूर्ण करून तयार करावे. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण करावे. योजनेच्या सूचीमध्ये आणखी रुग्णालये घ्यावयाची आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या, सध्या सूचीत असलेली रुग्णालयांची संख्या, रुग्णालयांमधील भौगोलिक अंतर आदी बाबी लक्षात घेवून सूचीमधील रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी. आरोग्य विमा कवच दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये करण्यात आले आहे. याबाबत तातडीने आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रोपोजल) करावी. त्यासाठी वेळापत्रक ठरवून घ्यावे. ही कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


***

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान

 देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान


- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


राज्य शासन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण


          शिर्डी, दि. ३१ (उमाका वृत्तसेवा) :- देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे. असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे काढले.


          प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे निमित्त साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.


          "तुम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार" अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे‌. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करत आहे. संघटित राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.


          भारतीय लोकशाही हे सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे‌. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यात कला व साहित्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते‌. समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.


अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे‌. अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. श्री साईबाबा चरणी चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले आहे‌. देशाचे एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. प्रधानमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जात आहे.


          सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकार क्षेत्राला दहा हजार कोटींची करमाफी देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सहकार चळवळ उभी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


          श्री. शोभणे म्हणाले की, मराठी संत साहित्यानंतर महात्मा जोतिराव फुले यांनी साहित्यांच्या माध्यमातून गरिबांच्या दुःखाला वाचा फोडली. आमदार श्री. बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त केले.


          यावेळी संरक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय लाभार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता भारत मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतींना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.


          प्रारंभी, महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या पुरस्कारामागील भूमिका विशद केली. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार डॉ. विखे पाटील यांनी आभार मानले.


या पुरस्कार्थींचा झाला सन्मान -


          यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सर्व पुरस्कार दिले जातात. यामध्ये २०२३ या वर्षासाठी साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार - सोलापूर येथील डॉ. निशिकांत ठकार, प्रबोधन पुरस्कार - पुणे येथील अशोक चौसाळकर यांना समाज प्रबोधन पत्रिकेसाठी देण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार - 'महानुभाव वाड्मय : चिकित्सक समालोचन खंड १ व २ ' या ग्रंथासाठी पुणे येथील डॉ. शैलेजा बापट यांना तसेच राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार - 'मूल्यत्रयीची कविता' या कविता संग्रहासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांना देण्यात आला. नाट्यसेवेबद्दल दिला‌ जाणारा राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार - जळगाव येथील शंभू पाटील यांना, तर कला क्षेत्रा कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार- पुणे येथील वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार - 'श्री ज्ञानेश्वर दर्शन भाग १ व २' या ग्रंथाच्या संपादनासाठी श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांना, तर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार - 'भंडारदरा धरण शतकपूर्ती ' या पुस्तकासाठी भंडारदरा येथील विकास पवार तर प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार - 'ते दिवस आठवून बघ' या कवितासंग्रहासाठी कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार्थीं ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ठकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले

आधी वंदू तुज मोरया

 


Featured post

Lakshvedhi