Thursday, 31 August 2023

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्थासुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता

 मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्थासुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता


          मुंबई, दि. ३० : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरु करता येणार आहेत. 


          महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


          महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात राज्यात उच्च शिक्षणाच्या सुविधांचे सर्वसमावेशक आणि समन्यायी वाटप करण्यासाठी महाविद्यालये आणि परिसंस्थांची स्थाने निश्चित करण्याची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. विद्यापीठाने दर पाच वर्षांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेस महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची मान्यता घेण्यात येते. त्यानुसार सम्यक योजनेशी अनुरुप २०२४-२५ च्या वार्षिक योजना प्रस्ताव आणि सन २०२४ ते २९ या पंचवार्षिक योजनेच्या बृहत्‌ आराखड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


          २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक स्थळबिंदू आराखड्यामध्ये १५३७ नवीन प्रस्तावित ठिकाणे होती, त्यापैकी १४९९ ठिकाणे पात्र ठरली असून या आराखड्याला आज मान्यता देण्यात आली. २०१९ ते २०२४ या पंचवार्षिक बृहत आराखड्यामध्ये १०५९ स्थळबिंदूंचा समावेश होता. विद्यापीठांकडून ३१९३ नवीन प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आले होते, त्यातील २८१९ स्थळ बिंदूंना ‘माहेड’ ने मान्यता दिली होती. गेल्या पाच वर्षात ५९३ नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आल्या आहेत.


          बैठकीत राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी माहिती दिली. शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.


          देशात महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘नॅक’ मानांकन मिळाले आहेत, मात्र, ‘कायम विनाअनुदानित’ महाविद्यालयांनी देखील ‘नॅक’ मानांकन मिळविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे नोंदणीची कार्यवाही करण्याविषयी चर्चा करण्यात आली. जे महाविद्यालये ‘नॅक’ मानांकनाची कार्यवाही करणार नाहीत त्या महाविद्यालयांविरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.


०००००



 

मळगंगा अंध - अपंग सेवा संस्थेच्यामहाविद्यालयास अनुदान देण्यास शासन सकारात्मक

 मळगंगा अंध - अपंग सेवा संस्थेच्यामहाविद्यालयास अनुदान देण्यास शासन सकारात्मक


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


     मुंबई, दि.३० : मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हीजन कला वाणिज्य महाविद्यालय हे देशातील पहिले निवासी अंध - अपंग महाविद्यालय आहे. महाविद्यालयास अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


          मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्यू व्हीजन कला वाणिज्य महाविद्यालयास अनुदान मिळण्याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष जाई उत्तम खामकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


          मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय 'मळगंगा अंध-अपंग सेवा संस्था' मार्फत चालविले जाते. दिव्यांगांना उच्च शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयास अनुदान मिळण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येईल. या महाविद्यालयास अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच दिव्यांग बांधवांच्या उच्च शिक्षणातील अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत धोरण तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल,असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


****

नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठीशासन सहकार्य करेल

 नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठीशासन सहकार्य करेल


- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील


 


          मुंबई, दि. ३० : जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात बँकेचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी हितासाठी बँकेच्या अडचणींवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाचे सहकार्य असेल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी सांगितले.


          मंत्रालयात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘नाबार्ड’चे जनरल मॅनेजर रश्मी दरक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.


          सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कामासाठी बँकेचे सहकार्य मोठे राहिले आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. बँकेच्या अडचणींवर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा सुधारित आराखडा महिन्याभरात शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिले.


           वाढती थकबाकी, एनपीएत तोटा यामुळे सध्या नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे. बँकेच्या या अडचणी दूर करण्यासाठी ‘नाबार्ड’ने सुद्धा काय उपाययोजना करणे शक्य होईल, याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहनही सहकारमंत्री श्री.वळसे पाटील यांनी यावेळी केले.

Wednesday, 30 August 2023

मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण

 मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण

- मंत्री संजय बनसोडे

          मुंबईदि. ३० : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

          मंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, दहिहंडी उत्सवप्रो. गोविंदा लीगमधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊनगोविंदांचा मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.

          यासाठी शासन निर्णय १८ ऑगस्ट२०२३ नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या ५०,००० गोविदांव्यतिरिक्त अतिरिक्त आणखी २५,००० गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.१८ लाख ७५ हजार  इतका निधी अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास  मान्यता देण्यात आली असल्याचे  सांगितले.

0000

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यामाजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

 विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यामाजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

            मुंबई, दि. ३० : दहावी, बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी.


          आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल, अशा स्वरुपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबबात अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार

 महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार


- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा


          मुंबई, दि. ३० : महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. लोढा यांनी आज लोअर परळ येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना निमंत्रित केले होते. या प्रसंगी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केले.


           मुंबई उपनगरात मालाड येथील मालवणी परिसरात पालकमंत्री श्री. लोढा गेली ३ वर्षे रक्षाबंधनाचा सण साजरा करतात, तसेच स्थानिक महिलांच्या समस्या जाणून घेतात. त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात. भगिनींच्या संरक्षणासाठी मी सदैव त्यांच्या पाठिशी उभा राहीन व त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.


***

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार

 आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार

- मंत्री संजय बनसोडे

          मुंबई, दि. ३० : अदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


          मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे हे उपस्थित होते.


          मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक असेल ती मदत त्यांना सराव आणि स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.


          राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीयस्तरावरील विविध क्रीडा संकुलांची बांधकामे सुरू असून ती दर्जेदार करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. तसेच ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत. खेळाडूंना सरावासाठी देण्यात येणारा निधी कमी पडणार नाही आणि वेळेत मिळेल यासाठी लक्ष द्यावे.


          विभागाकडे निधी विषयी मंजुरीसाठी प्रस्ताव असतील, तर ते तत्काळ सादर करावेत. नवीन योजना आणण्यासाठी खेळाडूंची बाजू समजावून घेण्याकरिता अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. यावेळी त्यांनी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभागात अधिकाधिक नवीन योजना राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकर प्रस्ताव सादर करावेत. राज्याला क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी कसलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे सांगून विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या.


            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कुलगुरूंची नेमणूक करण्यात आली आहे. सुरूवातीला साधनसामुग्री असलेल्या ठिकाणी विद्यापीठ सुरू करावे. इमारतीसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणी स्वतंत्र्यरित्या सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi