*विमानाचे दरवाजे बंद केल्यावर कोणाही प्रवाश्यासाठी परत का उघडत नाहीत? - काय आहेत कारणे?*
उड्डाणास तयार असलेल्या विमानाचे दरवाजे एकदा लावले की एखादा प्रवासी बाहेर राहिला आहे त्याला घेण्यासाठी उघडत नाहीत. अशी गैरसोय का करतात, फक्त दार उघडून एक प्रवासी तर आत घ्यायचाय त्यात काय एवढे असे आपल्याला वाटत राहते.
गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या राज्यपालांनाही ते उशिरा आले म्हणून त्यांना न घेता विमान गेले.
काय आहेत दार पुन्हा न उघडण्याची कारणे? त्यासाठी विमान उड्डाणा आधीची प्रोसिजर समजावून घेणे रंजक ठरेल.
विमान केवळ हवेच्या दाबावर उड्डाण घेते, तरंगत राहते आणि परत जमिनीवर उतरते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच विमानात किती वजन आहे, ते कसे विभागले गेले आहे, विमानाचा गुरुत्वमध्य ठराविक मर्यादेच्या आत आहे ना हे मुद्दे सर्वात महत्त्वाचे असतात.
त्यासाठी प्रोसिजर असे असते,
१. पायलट आणि को-पायलट कॉकपिटमध्ये आले की फ्लाईट डीसपॅचर त्यांना इंधनाचे वजन, इंजिन मधील ऑइलचे वजन, सामानाचे वजन आणि प्रवाशांचे वजन (हे सरासरीवर अंदाजे काढले जाते) याची माहिती देतात.
२. पायलट ही माहिती त्याच्या कॉम्पुटरला फीड करतो. या माहितीवर कॉम्प्युटर विमानाचा टेकऑफ वेग किती असावा, हवेची लिफ्ट किती लागेल, उतरताना याच गोष्टी कशा लागतील यासह सर्व प्रवासातील वेगाचे तपशील तयार करतो.
३. सर्व सामान आणि प्रवासी विमानात आल्यावर वजनाची सर्व माहिती देणारे प्रिंट पायलटकडे दिले जातात. या पेपरना 'लोड अँड ट्रिम शीट' म्हणतात. यात विमानातील स्टाफ आणि प्रवाशी यांची संख्या तर असतेच शिवाय पुरुष किती, स्त्रिया किती, लहान मुले किती असा तपशील आणि सामान ठेवण्याच्या कोणत्या भागात किती वजन आहे हे असते. गुरुत्वमध्य मर्यादेच्या आत आहे हेही नमूद केलेले असते.
४. यानंतर विमानाचे दार बंद करण्यात येते. मुख्य दार बंद करून घेतल्यावर आतील कर्मचारी विमानाची सर्व दारे 'आर्मड पोझीशन' वर आणतो, याचा अर्थ त्या स्थितीत जर कोणतेही दार उघडले तर ते विमानापासून खाली घसरगुंडी सारखे उघडते. आपत्तीकाळात विमान उतरले, अपघात झाला तर त्यासाठी ही तयारी असते.
५. केबिन स्टाफ सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले आहेत का, सीट पाठी सरळ आहेत ना हे तपासून सर्व ठीक असल्यास तसे पायलटला कळवतो.
६. पायलट ट्रॅफिक कंट्रोल, ATS, कडे उड्डाणास तयार आहे आणि किती प्रवासी आहेत ते कळवतो.
६. ATS अन्य विमानाच्या हालचाली, त्यांना उड्डाणास दिलेल्या परवानग्या, धावपट्टीवरील परिस्थिती हे सर्व तपासून विमान जागेवरून हलवण्याची परवानगी देतात आणि धावपट्टीवरील रांगेत कितवा नंबर आहे त्याची कल्पना देतात.
या स्टेजपर्यंत जर एखादा प्रवासी घेण्यासाठी दार उघडले तर केलेली सम्पूर्ण प्रक्रिया रद्द करून पहिल्यापासून सगळ्या स्टेजेस परत कराव्या लागतात. विमान सुटण्यास मोठा उशीर होऊ शकतो.
७. ATS ची परवानगी आल्यावर विमान हलवण्याची प्रक्रिया चालू होते. त्यासाठी चाकाचे ब्रेक काढताच स्वयंचलित पद्धतीने ती वेळ विमान यंत्रणेत नोंदली जाते आणि ती वेळ विमान सुटल्याची वेळ समजली जाते.
-------------------------
संकलन आणि लेखन -
प्रमोद (पी. आर.) कुलकर्णी, पुणे.
०१.०८.२०२३
(Source TOI Dt. 31.07.2023)