Thursday, 3 August 2023

पित्तावर घरगुती उपाय*

 *पित्तावर घरगुती उपाय*




 जेव्हा पोटातून अ‍ॅसिड अन्ननलिकेकडे येऊ लागतं. तेव्हा याला अ‍ॅसिडीक रिफ्लक्स म्हटले जाते. याला सर्वसामान्य भाषेत आम्लपित्त म्हटले जाते. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात.


अ‍ॅसिड रिफ्लक्सची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होता. यावर काही घरगुती उपायांनीही उपचार केले जाऊ शकतात.

केळी 

केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.


तुळस 

तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.


दूध

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबते व अतिरीक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.


बडीशेप

बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.


लवंग

लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा, त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.


वेलची

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.


पुदिना

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करत. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे. ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.


आलं

आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावे.


आवळा

तुरट, आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’, अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस मिळतात.

प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनीघेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट

 बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनीघेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट


 


            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.


            या दुर्घटनेमध्ये शून्य ते 18 वर्षे वयोगटातील 22 बालके अनाथ झालेली आहेत. ही बालके व त्यांचे कुटुंबीय सद्य:स्थितीत चौक ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेमध्ये राहात आहेत. या बालकांमध्ये बहुतांश बालके ही आदिवासी विभाग अंतर्गत चिखले, माणगाव, डोलवली येथील निवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ही बालके आश्रमशाळेत शिक्षण घेत असली तरी त्यांना विशेष बाब म्हणून महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजना लागू करण्याबाबत आयोगामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जी बालके शिक्षण घेत नाहीत किंवा त्यांनी काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडलेले आहे, अशा शाळाबाह्य बालकांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाची सोय खासगी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने करण्यासाठी बाल हक्क आयोग प्रयत्नशील असणार आहे.


             आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत एम्पॉवर माईंडस् या विशेष उपक्रमांतर्गत या बालकांसाठी समुपदेशन तसेच इतर सामाजिक, मानसिक घटकांच्या अनुषंगाने प्रथमतः सहा महिन्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. सदर भेटी दरम्यान बालकांचे लसीकरण, त्यांना आवश्यक असणाऱ्या इतर बाबी याबाबतही माहिती घेण्यात आली.


            या भेटीच्या वेळी आयोगातील सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, अध्यक्ष तथा सदस्य महिला बालकल्याण समिती रायगड, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

 मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ


       मुंबई, दि. 3 : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.   


            या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  


             मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.


असे असेल नवीन आमदार निवास :


            या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.


0


 


 


 


 

रानकवी' ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले

 रानकवी' ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले


                                                   - राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 3 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  


000


Governor Bais condoles demise of 'Ran Kavi' N D Mahanor


     Mumbai, 3 : Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of Marathi poet and writer N. D. Mahanor. In a condolence message, the Governor wrote: 


     "The works of poet, lyricist and writer N. D. Mahanor reflected the life and aspirations of the common man. His writing and poetry was realistic and touched the core of the heart. Many of his lyrics are fresh in the memory of the people. In his demise the State has lost a respected poet and writer who enriched the world of Marathi literature."   


0000



 


वृत्त क्र. 2595


मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर


यांना श्रद्धांजली, मराठी मातीतला 'रानकवी' हरपला


 


            मुंबई, दि.3 :- “मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.


            “मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्याची अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


0000



 


वृत्त क्र. 2594


रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला


                                             - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 3 : “ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केल. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”


0000



 


वृत्त क्र. 2593


 


मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला


                                                        -उपमुख्यमंत्री अजित पवार


 


            मुंबई, दि. 3 :- "ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबीयांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यां

च्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.


००००


 


दिलखुलास' कार्यक्रमात संत रोहिदास

 दिलखुलास' कार्यक्रमात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे


व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची मुलाखत

            मुंबई, दि. 2 : चर्मकार समाजातील बांधवांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास होण्यासाठी शासनस्तरावर विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रम व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून केले आहे.


            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यामुळे चर्मकार समाजातील बांधवांचा सामाजिक स्तर आणि जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल, गटई स्टॉल, प्रशिक्षण योजना, मुदती कर्ज योजना आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला समृद्धी व किसान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांविषयी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गजभिये यांनी दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार दि. 3 आणि शुक्रवार दि. 4 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे

.


0000


उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना 6 महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार

 उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना 6 महिन्यांत

भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने 28 गावांमधील 4584 हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी 134 हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. 1043 प्रकल्पग्रस्तांना 102.92 हेक्टर जागेचे वाटप करण्यात असून साडेबारा टक्के योजनेतंर्गत 575 प्रकल्पग्रस्तांना 32.42 हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपाची कार्यवाही येत्या 6 महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


            उरण (नवी मुंबई) येथील सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असल्याबाबत विधान परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.   


            यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेतंर्गत द्यावयाचे भूखंड वाटप हे सदर जागा कांदळवनसाठी सीआरझेडमध्ये प्रस्तावित असल्याने किंवा काही ठिकाणी अतिक्रमणे असल्याने राहिले होते. त्यामुळे पर्याय म्हणून बोकडवीरा, चाणजे, पागोटे, नागाव, रानवड, नवघर या 7 गावांमध्ये सिडको संपादित करणारी 364 हेक्टर जागा, तसेच सिडकोच्या ताब्यात असलेली 26.51 हेक्टर जागा, या दोन्ही पर्यायांचा अवलंब करून येत्या 6 महिन्यांत प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे.


            मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, नवी मुंबईमध्ये 3343 प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात आला आहे. वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, वाढीव मोबदलादेखील लवकरात लवकर देण्याची कार्यवाही करण्यात येईल. देण्यात येणाऱ्या मोबदल्याची साडेबारा टक्क्यांची किंमत वाढते, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचा उल्लेख मावेजा म्हणून करण्यात येतो. मावेजा देण्याबाबतचा अहवाल सादर झाला असून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 


            याबाबत मंत्री श्री. सामंत म्हणाले, साडेबारा टक्के योजनेंतर्गत ठाणे शहरात 3257 लाभार्थ्यांना 171.96 हेक्टर जागा वाटपपैकी 166.07 हेक्टर जागा दिलेली आहे. पनवेलमध्ये 3695 लाभार्थी असून 563.1 हेक्टर जागा वाटपपैकी 553.16 हेक्टर जागेचे वाटप केले आहे.तसेच उरणमध्ये 1618 प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना 135 हेक्टर जागा वाटपपैकी 102 हेक्टर जागा दिलेली आहे. तर 32.42 हेक्टर जागा द्यावयाची आहे. नवीन भूसंपादन करण्यात येणाऱ्या नागाव, रानवड, नवघर, पागोटे, चाणजे, या गावांमधून 324.23 हेक्टर जमिन ही सिडको संपादित करणार. त्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांना समाविष्ट करण्यात येईल.


            सिडको प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींचे डिनोटीफिकेशन करण्याची बाब तपासून पाहीली जाईल. सिडको जी जमिन संपादित करते, त्या जागेचा मोबदला दिला जातो. तसेच कायमस्वरूपी बांधकामे असतील, तर त्याचाही मोबदला दिला जातो, असेही मंत्री उदय सामंत यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


               या चर्चेमध्ये विधान परिषद सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, अनिकेत तटकरे यांनीही सहभाग घेतला.


००००

लातूर जिल्ह्यातील प्रलंबित कुळ प्रकरणावरसुनावणी घेण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश

 लातूर जिल्ह्यातील प्रलंबित कुळ प्रकरणावरसुनावणी घेण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 2 : लातूर जिल्ह्यातील सुनावणी न झाल्यामुळे कुळ कायद्याबाबतची काही प्रकरणे प्रलंबित आहेत. या कुळ कायद्याच्या प्रकरणांवर तात्काळ सुनावणी घेऊन निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


                सदस्य अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील कुळ कायद्याच्या प्रलंबित प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, लातूर जिल्ह्यात सुनावणी न झाल्यामुळे प्रलंबित कुळ कायद्याच्या प्रकरणांवर लातूर जिल्ह्यातील तहसीलदारांना व विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना सुनावणी घेवून निकाली काढण्याचे निर्देश तात्काळ देण्यात येतील. या सुनावणीस झालेल्या विलंबाबाबत चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिवांना देण्यात येतील, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


***



 

Featured post

Lakshvedhi