Wednesday, 31 May 2023

शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाचा मान्यता

 शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाचा मान्यता


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरीत करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.


            महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.


            आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांचा भर असणार आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सदर जागेचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


०००००

महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद

 महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.


            अनु. जाती/जमाती/विजा - भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, सविता शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा - भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी 'माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात' याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.


            संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


०००००

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद'

 मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद'

      


            मुंबई दि. 30 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या गुरूवार आणि शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


केव्हा आणि कुठे होईल संवाद


            गुरूवार दि 1 जून रोजी महानगरपालिकेच्या 'ए आणि बी वॉर्ड' मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी हॉल, 141, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच शुक्रवार दि. 2 जून रोजी 'जी उत्तर वॉर्ड' मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी उत्तर विभाग कार्यालय, मुंबई येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत तर ‘जी दक्षिण वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, जी दक्षिण विभाग कार्यालय, मुंबई येथे सायंकाळी 5 ते 7 वेळेत पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


            या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.


00000

मुंबईत ठिकठिकाणी सुरू करणार ‘हिरकणी कक्ष’

 मुंबईत ठिकठिकाणी सुरू करणार ‘हिरकणी कक्ष’


- दीपक केसरकर


               मुंबई, दि. 30 - रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाही. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


               बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून त्यांना वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत 17 हिरकणी कक्ष स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत पहिल्या हिरकणी कक्षाचा शुभारंभ मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुपेकर, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार आदी उपस्थित होते.


               मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबईतील विविध बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील. हे सर्व कक्ष वातानुकूलित केले जातील. या कक्षांमध्ये महिला आणि बालकांना विश्रांती घेता येईल. प्रत्येक जिल्ह्याला अशी सुविधा असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


               बस चालक तसेच वाहकांसाठी सुद्धा मागणीनुसार अद्ययावत विश्रांती कक्ष बनविण्यात येथील अथवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कामा हॉस्पिटल येथे मुंबईत येणाऱ्या निराश्रीत महिलांसाठी कक्ष उभारण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कामगारांसाठी देखील सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगून कामगार केंद्र अत्याधुनिक करून तेथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, जीम, नेमबाजी सुविधा, ॲस्ट्राटर्फ तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने येथील सोयी-सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


00000

किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा

 किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


‘मावळा’चे काम फत्ते...!आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू..!


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभियंते, कामगारांचे अभिनंदन..!


 


               मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


               मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.


               मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस या दोहोंनीही मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केले. हे काम आव्हानात्मक होते. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व एका महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढले.


               मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटरचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


               या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


               उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल.


मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाविषयी...


• बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.


• प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायूविजन प्रणालीची व्यवस्था.


• दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.


• प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.


• पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.


• या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.


• ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास


• या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट


• हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध


• प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. १२ हजार ७२१/-कोटी (बांधकाम खर्च रु. ८४२९/- कोटी).


• रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)


00000



तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा

 तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा 

तुरटीचे काहीच फायदे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुरटीचे अनेक फायदे होतात. पाहूया काय आहेत तुरटी चे फायदे


https://chat.whatsapp.com/JiMgPUBZHHo4naAcpzoMBB



निरोगी दात -

तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.  


शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका-

जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते. 


माऊथवॉश म्हणून उपयोग - 

माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.


मांसपेशींसाठी -

तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता..


ताप, खोकला आणि दमा-

शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. 


युरिनरी इन्फेक्शन-

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते. 


केसांसाठी -

केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा. 


जखम भरण्यासाठी 

शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल. 


पिंपल्सना ठेवते दूर - 

तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.


सुरकुत्या आणि एजिंग -

तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.  


त्चचा उजळवण्यासाठी -

तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते. 


फाटलेल्या पायांसाठी -


पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही. 


तुरटीचा वापर कसा करावा 

तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे. जाणून घेऊया तुरटीचा वापर कसा करावा 


जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो

पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी

त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी

दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी 

चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते

खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात

मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो

शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते

चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा




Tuesday, 30 May 2023

सकाळी दात न घासता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या...*

 *सकाळी दात न घासता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या...* 


उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी दररोज जवळपास 4 ते 5 लिटर पाणी प्यायला हवं. याचं कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. आपल्या घरातील वडीलधारी माणसांकडून किंवा आजी-आजोबाकडून तुम्ही ऐकलं असेल की, सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यापूर्वी सर्वप्रथम भरपूर पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण हे कितपत खरं आहे? असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. 


 *सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी पिल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे मिळू शकतात...*


 *1. पचनसंस्थेचं कार्य राहतं चांगलं* 

               तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याआधी भरपूर पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते आणि तोंडात बॅक्टेरियाही जमा राहत नाहीत. 



 *2. प्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत* 

                दररोर सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी सर्दी, ताप यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं.


 *3. केस चमकदार राहतात* 

                     दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि केस चमकदार होतात. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपिणे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावं लागणार आहे. 



 *4. उच्च रक्कदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत* 

                 जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.


 *5. रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित* 

                    सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याधी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

 

कुठलीही गोस्ट प्रमाणातच चांगली असते त्या मुळे कुठल्याही गोष्टीचे अतीप्रमाण करू नये तसेच आपल्यासाठी योग्य गोष्टी शरीर आपल्याला स्वतः सांगत असते कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तो प्रयोग किंवा ती सवय ताबोडतोब थांबवावा...


*Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Bhorkar* 



 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Featured post

Lakshvedhi