Friday, 7 April 2023

साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

 *साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

---------------------------------------------------

*सायंकाळचे ५.३० वाजले होते. नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम आटोपून घरी जायला निघालो. येताना एकदम लक्षात आले की "ड्रायक्लिंनींगला टाकलेले कपडे घ्यायचेत" . मग सागरला गाडी प्रोफेसर चौकाकडे घ्यायला लावली. चौकात आलो तर तिथे जैन बांधवांची महावीर जयंतीच्या मिरवणूकीची तयारी सुरू होती. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. "गजराज" च्या दुकानात जाणे देखील अवघड झाले होते. सागरने गाडी तशीच पुढे घेतली आणि श्री क्षीरसागर महाराज दत्त मंदिरापाशी गाडी लावून तो चालत चालत गजराज मधून कपडे आणायला गेला. गर्दी जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. मी गाडीत बसून कधी थोडा मोबाईल पाहत होतो तर कधी आजूबाजूचे निरिक्षण करत होतो. तेवढ्यात समोरच मला "सायकलीवर भाजलेले शेंगदाणे विकणारे" एक बाबा दिसले. मला शेंगदाणे खायची इच्छा झाली. मी गाडीतून खाली उतरलो आणि बाबाच्या जवळ गेलो*. 


*आणि म्हटलं, "बाबा एक शेंगदाण्याची पुडी द्या, किती पैसे ?*


 *ते म्हणाले, "वीस रुपये".*

 *मी वीस रुपये दिले आणि शेंगदाणे चावायला सुरुवात केली. सागर येईपर्यंत त्यांच्याशी तिथेच गप्पा मारत उभा राहिलो.*


 *मी म्हटलं," बाबा तुमचं वय काय ?".बाबा म्हणाले,"८० वर्षे ".*


*बाबांचा रापलेला चेहरा त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या खुणा दर्शवीत होता*.


*मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते खिशातील दहावीस रुपयांच्या नोटा व्यवस्थित लावत होते. त्यातलीच एक नोट खाली पडली होती. मी ती नोट उचलून त्यांना दिली.*


*बाबा म्हणाले,"गिरहाईक आलं की नोटांचा गोंधळ होतो. म्हणून वेळ मिळाला की मी नोटा अशा लावुन ठेवतो, साहेब.*


 *मग माझा पुढचा प्रश्न*


.*"किती पैसे मिळतात रोज?"* 


*ते म्हणाले, "पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही साहेब .पण माझा चार पाच तासाचा वेळ चांगला जातो आणि पाच-पन्नास रुपयांची रोजची कमाई देखील होते. त्यामुळे घरी जाताना माझ्या किरकोळ खर्चाची सोय माझ्या हाताने मी करतो. कधी नातवंडांसाठी खाऊ तर कधी म्हातारीसाठी काही बाही घेऊन जातो. त्यासाठी कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. बोलता बोलता ते सांगू लागले, "साहेब, परवाचच उदाहरण. पलीकडच्या गल्लीत शेंगदाणे विकण्यासाठी मी उभा होता. एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि "शेंगदाणे द्या म्हणाली". तीने मला देण्यासाठी पैसे काढले. तेवढ्यात घरातून बाहेर आलेलं तिचं पोरगं तिच्यावर वसकलं ." कशाला फालतू पैसे घालवतेस. घरात शेंगदाणे नाहीत काय? "*


.*ती बाई नाराज झाली आणि तिने शेंगदाणे घेतले नाहीत.मात्र तिच्या चेहऱ्यावर "नातवाला शेंगदाणे देऊ दिले नाही, याच दु:ख दिसत होतं. काही वेळाने मुलगा गेला. आजीने स्वतःच्या हातात ठेवलेले पैसे मला दिले आणि नातवासाठी शेंगदाणे घेतले.*


*साहेब ,या वयात स्वाभिमानाने जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत.पण थोडे का होईना आपले हक्काचे असावे लागतात*. 


 *आता माझंच बघा. दोन मुल आहेत, सुना आहेत, माझी बायको आहे घरी. मी दररोज साडेचार पाच वाजता शेंगदाणे विकायला बाहेर पडतो. आणि रात्री साडेआठला घरी जातो. घरी गेलो की जेवण करतो आणि लगेच शांत झोपतो. सकाळी मात्र निवांत उठतो. मला शुगर नाही, बीपी नाही. कुठलाच त्रास नाही. काही दिवसांपूर्वी पोरांनी गुडघ्याचे ऑपरेशन करून दिलं. तेवढ्या गुडघ्याच्या गोळ्या चालू आहेत. पूर्वी सायकल चालवत शेंगदाणे विकत असे. आता गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे सायकल चालवता येत नाही. म्हणून सायकल हातात धरतो आणि पायी चालत शेंगदाणे विकतो.*


*बाबा माझ्याशी भरभरून बोलत होते. बहुधा अनेक दिवसांनी कुणीतरी त्यांच्याशी अशा व्यक्तिगत गप्पा मारत होते* 


 *बाबा सांगत होते, "साहेब, रोज पाच सहा किलोमीटर मी चालतो. आणि त्यामुळेच माझी तब्येत ठणठणीत राहते. मला किती नफा मिळतो, याच्यापेक्षा या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही आणि स्वाभिमानाने जगता येतं, याच्यातच मला खरा आनंद आहे.*


 *प्रसंग छोटासाच*......

 *मात्र या छोट्या प्रसंगाने विचाराला चालना दिली. परत परत एकच वाक्य आठवत होते*,


*"या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये, साहेब "*

मदत वेळेवरच द्या टायटॅनिक होवू देवू नका.

 ✒️टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .

९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.

त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.

 १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

  ६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.


थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.

एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे

दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे

तीन - कुठलाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देनारे.

💞

दिलखुलास' कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा)

दशरथ तांभाळे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्याचे कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 7 आणि शनिवार दि. 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेती क्षेत्राचा विकास करता यावा यासाठी शासनामार्फत राज्यात ‘आत्मा’ यंत्रणेची स्थापना करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न कसे वाढवावे, वातावरणातील बदलांचा अभ्यास करून कोणते तंत्रज्ञान वापरुन कोणते पीक कधी घ्यावे, शेतकरी गटाचे बळकटीकरण आणि कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती, कृषी संचालक (आत्मा) श्री. तांभाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी घेतली आहे.


००००

महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे 1 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस.

 महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी

पाच वर्ष मुदतीचे 1 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस.

            मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधीत खर्चासाठी पाच वर्षे मुदतीचे एकूण 1 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या रोखे विक्रीतून मिळालेल्या रकमेचा वापर विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


            या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                    


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 11 एप्रिल, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 11 एप्रिल, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी करण्यात येईल.         


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल.


            रोख्यांचा कालावधी 12 एप्रिल, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 12 एप्रिल, 2028 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 12 ऑक्टोबर व 12 एप्रिल रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 6 एप्रिल, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्या

त आली आहे.


००००


जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!


राज्यात आरोग्य विभागामार्फत आजपासून 'सुंदर माझा दवाखाना' उपक्रम.

            मुंबई, दि.7 : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम सुरू होत असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.


            आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीने सामोरे जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबईमध्ये देखील सुमारे १६० हून अधिक आपला दवाखाना सुरू झाले आहेत.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश आणला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. शिवाय या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


            दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 'समान आरोग्य सेवा' हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत ७ ते १४ एप्रिल दरम्यान “सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार आहे. त्या माध्यमातून सामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले

 आहे.


०००००


राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअवयवदान जनजागृती अभियान

 राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअवयवदान जनजागृती अभियान

-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ


            मुंबई, दि. 6 : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            “अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी अवयव दानाचे प्रमाण देखील सुधारले होते. परंतु नंतरच्या काळात कोरोनामुळे अवयव दानाची चळवळ मागे पडली. उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती देण्यात येईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील,” असे मंत्री श्री. महाजन म्हणाले.


           मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जाते. पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण व यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे सात अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात. परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळीमधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण अवयव दानाची चळवळ पुनश्च पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू करीत आहोत.


            अवयव दान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तत्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


            या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.


००००

विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्यापोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

 विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्यापोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान


 


            मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.  


            निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.


-0-0-0-

Featured post

Lakshvedhi