Tuesday, 4 April 2023

भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातदळण-वळणाच्या सुविधा कराव्यात

 भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातदळण-वळणाच्या सुविधा कराव्यात


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


            मुंबई, दि. 3 : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील शहापूर, डहाणू, पालघरमधील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. मोबाईल नेटवर्क नसल्याने स्थानिकांना मदतीसाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


            शहापूर परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर उद्भवलेल्या समस्यांबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच हॅम रेडिओ, वॉकी-टॉकी सारखी यंत्रणा उपलब्‍ध करून द्यावी, एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार तयारी करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


०००



 



कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे'दिलखुलास' कार्यक्रमात मार्गदर्शन

 कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे'दिलखुलास' कार्यक्रमात मार्गदर्शन


 


            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषी संशोधन क्षेत्रात योगदान देणारे डॉ. सुनील कराड यांनी केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 5 आणि गुरुवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.


            अन्न सुरक्षेचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘मिलेट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी संशोधक डॉ. कराड यांनी मिलेटविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.



वन आरक्षित जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठीएक खिडकी पद्धत आणणार

 वन आरक्षित जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठीएक खिडकी पद्धत आणणार


— वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय


 


            मुंबई, दि. 3 : खासगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडविणे, वन आरक्षित जमीन याबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी एक खिडकी पद्धत वन विभागामार्फत आणण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खासगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत कायद्यात करावी लागणारी सुधारणा याबाबतची आढावा बैठक आज वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार किसन कथोरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध विचारात घेऊन या विषयामध्ये सुलभता येण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य शासनाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. यासाठीच एक खिडकी पद्धत तयार करण्यात येईल.


            महाराष्ट्र खासगी वने (संपादन) अधिनियम, १९७५ च्या तरतुदींच्या अनुषंगाने कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आणि याबाबत राज्यात करावयाची कार्यवाही याचा पूर्ण अभ्यास करण्यात येईल. यानंतर या विषयाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करुन याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            या बैठकीमध्ये महाराष्ट्र खासगी वने (संपादन) अधिनियमाचे कलम २२ (अ), कलम ६, मा.सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश, शासनाची परिपत्रके व शासन निर्णयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.


००००



 



 

वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचेजिओ टॅगिंग आवश्यक

 वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचेजिओ टॅगिंग आवश्यक


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


• चांदोली अभयारण्याचा विकास गतीने करणार


• दत्तटेकडी परिसरही विकसित करणार


 


            मुंबई, दि. 3 : वन विभागामार्फत आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक कामांबाबत जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी फेसबुक पेज सुरु करावे, अशी सूचना यावेळी केली.


            सांगली येथील चांदोली अभयारण्य आणि दत्त टेकडी विकसित करण्याबाबतची बैठक आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंहराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वन विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तेथील नागरिकांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कामाचे टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येईल.


            सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य येथे झोलंबी पठार आहे. कास पठार सारखे हे पठार आणखी विकसित कसे करता येईल, जेणेकरुन येथे अधिक पर्यटक येऊ शकतील याचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्यात येत्या काळात वाघाची जोडी सोडता येऊ शकेल का हे सुद्धा तपासून घ्यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            आगामी काळात येथे क्रोकोडाइल पार्क, सर्प उद्यान, बिबट सफारी, मत्स्यालय यासारखे प्रकल्प उभे करताना याबाबतचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्य परिसरास कुंपण कसे घालता येईल यासाठी निधीचे नियोजन करुन याबाबत विस्तृत नियोजन करावे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            इस्लामपूर येथील दत्त टेकडी विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. यासाठी येत्या दोन महिन्यांत याबाबतचा आराखडा तयार करुन स्थानिक लोकप्रतिनिधींना दाखवून सादर करावा. वन विभागामार्फत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दत्त टेकडी विकसित करण्याचे काम सुरु करावे. आगामी दत्तजयंतीपर्यंत हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुरुषांसाठी लायकोपीन आवश्यक, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी !!*

 *पुरुषांसाठी लायकोपीन आवश्यक, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी !!* 


लायकोपीन (Lycopene) फायटोन्यूट्रिएंट्स (PhytoNutrients) म्हणजे वनस्पतींद्वारे (Plant) तयार करण्यात येणारे अँटीऑक्सिडेंट आहे.


हे मानवी शरीरात नाही तर वनस्पतींमध्येच आढळते अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आहे. हे पोषक तत्व पुरुषांसाठी फार आवश्यक आहे. हे पोषकतत्व वनस्पतींद्वारे तयार केले जातात. त्यामुळे आहारामध्ये लायकोपीनच्या स्त्रोतांचा समावेश करणे फार गरजेचं आहे. लायकोपीन हे अँटिऑक्सिडेंट आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी (Free radicals) लढण्याचे काम करते. लायकोपीन लिपिड प्रोटीन आणि डीएनएचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून बचाव करते. यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यातही हे पोषक तत्वं खूप फायदेशीर आहे तसेच यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.


*लायकोपीनचे फायदे* 


*प्रजनन क्षमता सुधारते* 


बिघडलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि प्रदूषणामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. जगातील किमान 10 ते 15 टक्के लोकांना प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आढळतात. लायकोपीन हे पोषक तत्वं पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.


*कर्करोगाचा धोका कमी होतो* 


लायकोपीन पोषक तत्वं एक अँटिऑक्सिडेंट आहे. हे अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या डीएनए आणि पेशींच्या संरचनेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून कर्करोगाचा धोका कमी करतात.


*प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो* 


अलिकडे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही संशोधनानुसार, लायकोपीनच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. लायकोपीनची उच्च पातळी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकते.


*हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी* 


लायकोपीन एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यात मदत करते. लायकोपीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.


*हाडे कमकुवत होण्यापासून बचाव* 


कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के प्रमाणेच लायकोपीन अँडीऑक्सिडेंटदेखील हाडे मजबूत होण्यास मदत करते. लायकोपीन हाडांमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे हाडांची रचना कमकुवत होते, म्हणून पुरुषांनी लायकोपीनयुक्त अन्न सेवन केले पाहिजे.


*'या' पदार्थांमध्ये आढळते लायकोपीन :* 


◼️टोमॅटो हा लायकोपीनचा मुख्य स्त्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक कप ताज्या टोमॅटोमध्ये 3041 मायक्रोग्रॅम लायकोपीन असते. ताजे टोमॅटो लाइकोपीनचा चांगला स्रोत आहे.


◼️पपई हे असे फळ आहे ज्यामध्ये लायकोपीन देखील आढळते. एका कप पपईमध्ये सुमारे 18028 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते आणि यामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात.


◼️पेरू हा लायकोपीनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यासह ओमेगा-3 आणि फायबर देखील आढळतात. एका कप पेरूमध्ये 5204 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते.


◼️कलिंगडामध्ये लायकोपीन आढळते तसेच यामुळे जे शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते.


*संकलन-* 

डॉ. प्रमो द ढेरे 

Monday, 3 April 2023

खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*

 *खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*


आई वडील आजी आजोबा यांच्याकडून जसे आपल्याला पैसा,घर, दाग दागिने हे इस्टेट या स्वरूपात मिळतात त्याचप्रमाणे दमा, डोकेदुखी, Constipation पासून ते Obesity, BP, Diabetes, Thyroid ते टक्कल असा आनुवंशिक रोगांचा अमूल्य ठेवा सुद्धा मिळत असतो.


आमच्या कुटुंबात पिढ्यानुपिढ्या हे आजार आहेत असे सांगणारे खूप भेटतात परंतु हा आनुवंशिक रोगांचा शाप नष्ट करण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही.


हे प्रयत्न खूप च अवघड आहेत असच सर्वांना वाटते किंवा घरी सगळ्यांना आहे म्हणून मला सुद्धा हा आजार झालाय किंवा होईल अशीच धारणा असते सगळ्यांची.


परंतु योग्य lifestyle follow केली, चुकीच्या गोष्टी टाळल्या की आनुवंशिक आजार सहज दूर करता येतात पण एकवेळ आम्ही चार गोळ्या जास्त घेऊ पण पथ्य सांगू नका, खाण्यावर बंधन घालू नका असाच ट्रेण्ड दिसतो हल्ली.


रोग होऊ च नये म्हणून प्रयत्न करणे हे खूप कमी खर्चाचे आणि सोपे आहे. जीभेवर थोडासा संयम ठेवला की 50% लढाई जिंकली च म्हणून समजा. कारण महागडे उपचार घेऊन सुद्धा त्रास कमी होत नाहीत असे आजार खूप बळावले आहेत हल्ली नवनवीन tests आणि investigation ची भर पडत आहे. या सगळ्यापासून लांब रहायचे असेल तर आज पासून च Healthy lifestyle चा अवलंब करा.


वेळच्या वेळी जेवण, अती तिखट, खारट आंबट पदार्थ कमी खाणे, सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, चौरस आहार, नियमित व्यायाम, दोन्ही जेवणानंतर शत पावली, त्या त्या ऋतू मध्ये उपलब्ध असलेली फळे, भाज्या खाणे, Junk food न खाणेह्याच तर गोष्टी healthy lifestyle मध्ये येतात.


खरंच खूप अवघड आहे का हे follow करणं?

एकदा करून तर पहा. आपसूक तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या तब्येतीच्या तक्रारी कोणतेही औषध न घेता कमी करता येतात.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

सांधण’ ची अनोखी दरी आणि चिल्ड्रन फर्स्ट...

 सांधण’ ची अनोखी दरी आणि चिल्ड्रन फर्स्ट...


आज-काल रोजच कोणता ना कोणता दिवस साजरा केला जातो. असाच एक कालचा दिवस- ‘जिऑलॉजिस्ट डे’. एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा हा दिवस. एकूणच


जिऑलॉजिस्ट म्हणजे भूवैज्ञानिक आणि हा विषय शिकणाऱ्यांची संख्या मोजकी असल्यामुळे या दिवसाचा गाजावाजा होणार नाही. पण हा विषय महत्त्वाचा अशासाठी की यामुळेच पृथ्वीची अनेक रहस्ये उलगडता आली- तिच्या वयापासून ते तिच्या आतमध्ये दडलेली खनिजे, वैशिष्ट्यपूर्ण भूआकृती, ज्वालामुखी-भूकंपासारख्या घटना आणि बरेच काही...


यानिमित्ताने आपल्या परिसरातल्या एक भूवैशिष्ट्य आणि ते अनुभवण्याची संधी याविषयी! अहमदनगर जिल्ह्यात कळसुबाई, भंडारदरा यांच्या परिसरात पाहण्याजोग्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे सांधण दरी. खरे तर तिला घळ किंवा खिंड म्हणायला हवे. कारण चिंचोळा मार्ग आणि दोन्ही बाजूंनी उभ्या भिंती. एखाद्या लोण्याचा तुकडा सुरीने मधोमध कापावा, तशी! पण अर्थातच निसर्गाचे रूप असल्याने राकड आणि ओबडधोबड. तिची खोली सर्वसाधरणपणे २०० फूट आणि लांबी जवळजवळ दीड किलोमीटर.


ही घळ बरोबर मध्येच का कापली गेली, तीसुद्धा इतकी खोल? हा मनात येणारा पहिला प्रश्न. त्याचा उलगडा होतो हिच्या निर्मितीची गोष्ट ऐकल्यावर. त्यात पाण्याची भूमिका आहे, तशीच त्या खडकात दडलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण घटकाचीसुद्धा. हा घटक म्हणजे तिथे असलेली ‘डाईक’ म्हणजे विशिष्ट दगडाची उभी भिंत. तिला मराठीत ‘कारी’ असंही म्हणतात. या कारीचा खडक आजूबाजूच्या खडकापेक्षा जरासा वेगळा असतो. कडेच्या खडकापेक्षा जास्त टणक असतो, तर कधी मऊ असतो. सांधणच्या ‘डाईक’चा खडक आजूबाजूच्या खडकापेक्षा मऊ आहे. त्याला भेगासुद्धा आहेत. त्यामुळे तो लवकर झिजून जाणारा आहे. ही परिस्थिती मिळाल्यावर पाणी थोडीच गप्प बसणार? त्याने काम सुरू केलं आणि हा भाग कापत कापत पुढं जात राहिलं. परिणाम काय? तर साधणच्या घळीची निर्मिती.


तिथं आवर्जून जा आणि गेलात तर या खडकामधला फरक नक्की पाहा. ‘भवताल’ ने मुलांसाठी या गोष्टी पाहण्याची, अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यासाठीच येत्या मे महिन्यात ‘एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा’ याची रचना करण्यात आली आहे. १० वर्षांपेक्षा मोठे मुले-मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. मोठ्यांना यात सहभागी व्हायचे असेल तर लहान व्हावे लागेल किंवा थोडी वाट पाहावी लागेल... चिल्ड्रेन फर्स्ट!




माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:


https://bhavatal.com/Ecocamp/Bhandardara




संपर्कासाठी:


९५४५३५०८६२ / ९९२२०६३६२१/ ९९२२४१४८२२



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi