Sunday, 5 March 2023

राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार

 राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार

- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. 3 : शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. श्वानांचे संगोपन करण्यासाठी राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


                 मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्राणी प्रेमी किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दत्तक योजनेच्या माध्यमातून श्वान दत्तक दिले जाईल. याबाबत विहीत धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठित करण्यात येईल. समितीत या विषयाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग करून घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

पालखी, भाव स्पर्शी

 पालखी 

"ह्या वर्षी तरी पालखीक नेतयस ना.....?? थरथरत्या आवाजात भिकू पेडणेकरानी दशरथला विचारले . तसा तो वैतागला."ओ तात्यानु पडून रवा हो ..?? या वयात खय पालखी ….पालखी करताव. ..हयसूर वेळ कोणाक हा ...?? तुमचो नातू दोन वर्षांनी घरी इलोय . त्याच्याबरोबर राहू की चार दिवस... गेलो की पुन्हा दोन वर्षा येऊचो नाय…." 

भिकू तात्यांच्या डोळ्यात पाणी आले . "तसा नाय रे झिला .... पण बरीच वर्षे झाली पालखी खांद्यावर घेऊन . आता लय वाटता रे जाण्यापूर्वी बघूची." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले ते कळलेच नाही.

भिकू पेडणेकर वय वर्षे 85 .. सध्या सर्व काही बिछान्यावर . बाहेर पडले तर व्हीलचेयरवरच . मुलगा दशरथ पेडणेकर सध्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर...पण आता निवृत्तीच्या वाटेवर . तर नातू निशिकांत पेडणेकर इंजिनियर ...सध्या परदेशात वास्तव्य . आला तरी केवळ दहा दिवसासाठी भारतात येतो.


भिकू तात्या कोकणातून मुंबईत कामासाठी आले आणि पक्के चाकरमानी बनले .पण सणासुदीला कोकणात जाणे काही थांबले नाही . दरवर्षी होळीला जायचे.... पालखी नाचावयाची….. कुटुंबासाठी नवस बोलायचं आणि तो फेडण्यासाठी पुन्हा पालखीला हजर राहायचे. दशरथ लहानपणी त्यांच्याबरोबर जायचा पण लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला आणि त्यानंतर गावाचे तोंड पाहिले नाही.


 पुढे पत्नी गेल्या नंतर त्यांनीही गावी जाणे सोडले . गेल्या चार वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत . दरवर्षी होळी आली की केविलवाण्या चेहऱ्याने दशरथला पालखीला नेण्यासाठी विनवतात. पण कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुकाटपणे डोळे पुसत ते शांतपणे बसले .इतक्यात निशी आत आला .."काय झाले पपा..?? आजोबा का असे बसलेत ...?? 

"अरे काही नाही रे ...?? गावी जाऊ म्हणतात पालखीला .. बरीच वर्षे गेलो नाही म्हणतात. आता घेऊन चल ... पण आता जमेल का ह्यांना प्रवास .. ती धावपळ ... त्यात कोकणातले रस्ते खराब ..."

 निशीने नुसतीच हम्म...!! करीत मान डोलावली . "पालखीबद्दल बरेच काही ऐकलं आहे मी .. त्यांची इच्छा असेल तर चार दिवस जाऊया पपा ... "तो सहज स्वरात म्हणाला.

"अरे काय ....?? सोपे वाटते का तुला गावी जाणे . तिथे प्रवास बारा तासाचा ...पाण्याचा प्रॉब्लेम.टॉयलेटचा प्रॉब्लेम.." दशरथ चिडून बोलले.

"तरीही माणसे राहतात ना तिथे ...?? पपा जगात इथल्यापेक्षाही भयानक परिस्थितीत लोक राहतात . मलाही काम करताना मनासारखे काही मिळत नाही . चला यावर्षी जाऊच सगळे चार दिवस .. मी गाडीची सोय करतो "असे बोलून वळला पण नजरेच्या कोपऱ्यातून आजोबांच्या डोळ्यातील चमक त्याला सुखावून गेलीच.


नातवाच्या तोंडातून सर्व ऐकताना भिकू तात्याचे मन प्रसन्न होत होते . अंगात नवचैतन्य आले .दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले . आपल्या मुलाचे आणि नातवाचे मन पालटू नये म्हणून भिकूतात्या स्वतःला फिट दाखविण्याचा प्रयत्न करीत होता . दशरथलाही वडिलांचे हे रूप नवीनच होते . जसजसे गाव जवळ येऊ लागले तसतसे भिकुतात्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला .एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने तो सारा गाव नजरेत साठवून घेत होता . मध्येच नातवाला जुन्या आठवणी सांगत होता . निशीही कौतुकाने सगळे ऐकत होता.

 घरी पोचताच एखाद्या राजाप्रमाणे त्याचे स्वागत झाले . चुलतभावाने तर डोळ्यात पाणी आणून मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते . रात्री दशरथ आणि निशी होळी पेटवायला गेले तेव्हा सर्वजण त्यांची मायेने विचारपूस करीत होते.

निशीने वडिलांना विचारलेही ..की ओळख नसताना देखील ही माणसे कशी आपलेपणाने बोलतात ….??दशरथ हसून म्हणाला "अरे ...हीच तर खरी कोकणाची ओळख आहे . परक्याशी देखील आपलेपणाने वागतात . आज ती आपल्याला भिकूची पोर म्हणजेच आपली माणसे म्हणून ओळखतात.

दुसऱ्या दिवशी पालखी येणार म्हणून रात्रभर भिकू झोपलाच नाही . सकाळी लवकर उठून ठेवणीतले कपडे घालून तो पालखीची वाट पाहत बसला . चुलत भावाला जवळ बोलावून त्याने कानात काही सांगितले तसे त्याने हसत मान डोलावली . मग दशरथ जवळ येऊन म्हणाला "तात्या बोलतत पालखी तुझ्या खांद्यावरून घरात घेऊन ये ."काही न बोलता दशरथने मान डोलावली . पालखी घराजवळ आली आणि दशरथने ती एक बाजूने खांद्यावर घेतली त्याच क्षणी त्याला भरून आले . एक वेगळीच सुखाची अनुभूती त्याच्या शरीरातून वाहू लागली.त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . प्रत्यक्ष देवाला घेऊन आपल्या घरी चाललोय ही भावनाच त्याचा उर भरून येण्यास पुरेशी होती . दाटल्या डोळ्यांनी त्याने अंगणात प्रवेश केला . समोर व्हीलचेयरवर वडील बसले होते . त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला कळले आपण आयुष्यात कोणते सुख कमाविले आहे . वडील आश्चर्याने मागे का पाहताय..?? म्हणून त्याने मागे नजर वळवली आणि आश्चर्याचा अजून एक धक्का त्याला मिळाला .दुसऱ्या बाजूने निशी पालखी घेऊन उभा होता . अतीव आनंदाने सर्वांनी पालखीची पूजा केली आणि निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले . प्रवासात दशरथ थट्टेत भिकूतात्याला म्हणाला .."ओ तात्यानु.. देवाकडे काय मागीतलाव ...?? 

"अरे ..त्या देवाकडे काय सारखासारखा मागूचा .. आपला काय ता आपल्या नशिबात .. उगाच देवावर लोड कित्याक ..? काय मागूचा हवा म्हणून खांद्यावरून घेवून येताव की काय ..?? सर्व हसले.

 दुसऱ्या दिवशी सर्व मुबंईला माघारी निघाले .रात्री घरी येऊन सर्व झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी भिकूतात्या उठलाच नाही . मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते . बातमी कळविण्यासाठी दशरथने गावी फोन केला .फोनवर रडत रडत म्हणाला "पालखीला जायची त्यांची अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने गेले..

 पलीकडून चुलते म्हणाले "शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.त्यांनी तुला खांद्यावर घेतलेले बघायचे आहे मला . काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.


© श्री. किरण कृष्णा बोरकर

ये जिवन हैं


















 

दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार

 दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार


महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करतानाच सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही


            मुंबई, दि. 3 : “महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची” ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.


            राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.


            विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘जागृक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० लाख प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


            मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


०००००

कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना

 कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 3 : जागेची टंचाई असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे सांगितले.


            विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा,कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच अंगणवाडी दत्तक योजनेतंर्गत महिला व बाल विकास विभागाने भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या इतर सामाजिक संस्था यांच्यासोबत सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्ष-या केल्या. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात पंधरा लक्ष वृक्ष लागवडीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित उपस्थित होते.


            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कंटेनर अंगणवाडी प्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेंतर्गत सुविधांयुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत असून बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे.यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातील पंधरा लक्ष वृक्ष लागवडीचा करार हा पर्यावरण विकासाच्यादृष्टीने महत्वाचा ठरणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाचे पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य असून या कराराच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मुंबईत वृक्ष लागवड करण्यात येईल,ही स्वागतार्ह बाब आहे.


            यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली असून अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            राज्यातील अंगणवाडी केंदांच्या बळकटीकरणाकरिता सीएसआर, सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रण साहित्य वाटप, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य तपासणी करिता सहाय्य इत्यादी बाबींचा अंगणवाडी दत्तक योजनेत समावेश आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्र विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी माहे ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतलेल्या आहेत. भव्यता फाऊंडेशन यांनी यापूर्वी ५ अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली असून आज एकूण ४० अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली आहेत. यामध्ये नाशिक-५, पालघर -५, गडचिरोली-९, चंद्रपूर-१, धुळे-१, नंदूरबार- १, औरंगाबाद- १५, रायगड-२, रत्नागिरी-१ यांचा समावेश आहे.


कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना


            मुंबई मधील अंगणवाडी केंद्र प्रामुख्याने झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाश्यांच्या घरात भाडयाने चालविण्यात येतात. घरांचे क्षेत्रफळ छोटे असल्याने कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना माहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेली आहे.


            कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आलेल्या आहेत. पहिला कंटेनर बालविकास प्रकल्प, वरळी, कांदीवली येथील अंगणवाडी क्र.१०५ पांडे कंपाऊंड, जानुपाडा, कांदिवली- पूर्व या ठिकाणी आस्थापित करण्यात येऊन त्याचे ऑनलाईन उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभ हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.


००००

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार

 मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार

- मंत्री संजय राठोड

            मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रातील मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या समाजाच्या विविध मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य सुनिल कांबळे यांनी मातंग समाजाच्या मागण्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री. राठोड उत्तर देत होते.


            मंत्री श्री.राठोड म्हणाले, अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ व्हावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत केला होता. या आयोगाने शासनास अहवाल सादर केला. या आयोगाच्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी तत्त्वतः मान्य केल्या आहेत. 


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, संजय कुटे, राजेश टोपे, सदस्या वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.


0000

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

 इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण.

            मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.


            या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


            संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.


0000

Featured post

Lakshvedhi