*!! एक नंबर शिवणार !!* *कथा - ३१*
रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.
मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, "साहेब, नमस्कार. मी राजाराम."
"सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही." मी म्हणालो.
"अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं." त्याने स्पष्टीकरण दिलं.
बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,
"या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो."
"साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे." राजाराम म्हणाला.
"बरं, बस राजाराम. मी आलोच" असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.
"साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्हीपण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडेपण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो." राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.
त्याचं म्हणणं खरं होतं, मीदेखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाहीतर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.
"आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूम मध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो." मी म्हणालो.
"दुपारनंतर?" तो चाचरत पुढे म्हणाला, "साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?
अंबरनाथला राहतो? अरे बापरे ! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, "बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का?"
"हो साहेब" तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं "हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये."
राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.
तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती.
ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, "साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडावेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का?"
राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं.
आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.
"एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन." तो म्हणाला.
वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा नाश्ता करुन पुन्हा तासा दीडतासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खुश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.
आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. "साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते." तो म्हणाला.
मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाहीतर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी राहूदे म्हंटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही.
पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.
ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.
मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बुट टाकला.
"सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा." तो म्हणाला.
"दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय." मी म्हणालो.
"साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको." त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?
"राजाराम?" मी सरळ हाकच मारली.
हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, "साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना?"
मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं.
एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बुट वगैरे शिवतो.
मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,
"साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं. तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, परत होता तिथे सोडून येतो म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय.
साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठूंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो." एका दमात राजारामने सगळं कथन केलं.
"अरे पण आहे कुठे तो, मला तर दिसत नाही." सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.
"या, दाखवतो," असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.
तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,
"राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे."
"साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको." राजारामने स्पष्टीकरण दिलं.
राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अश्या विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत.
राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,
"साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार. आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे."
राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं, आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.
- राजेंद्र परांजपे, २५ फेब्रुवारी २०२३.