Saturday, 4 March 2023

बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी माविमचे ‘टिसर’ सोबत सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल

 बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी माविमचे ‘टिसर’ सोबत सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल 


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


             मुंबई, दि. 3 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण विविध वस्तूंची निर्मिती करण्यात येते. आज सुरू होणाऱ्या विक्री केंद्राच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. माविम ने ‘टिसर’ सोबत केलेली भागीदारी या विक्री केद्रांसाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.


             अंधेरी पश्चिम, सावली वसतीगृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला उत्पादन विक्री केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधानसचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक इंदुराणी जाखर, ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस, टिसर् संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस म्हणाल्या, मुंबईत अंधेरी सारख्या ठिकाणी महिला बचत गटाच्या मालाला विक्रीसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र उभारल्याबद्दल तसेच जागतिक महिला दिनाच्या अगोदर उद्घाटन केल्याबद्दल खूप आनंद होत आहे. आज रोजी महिलांना बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की महिला कर्ज परतफेड वेळेत आणि पूर्ण करतील. बॅंकाकडून मिळालेल्या ६३००/- कोटी कर्जाची परतफेड ९९ टक्के होत आहे असेही त्या म्हणाल्या.


         यावेळी महाराष्ट्रातील काही निवडक कारागिर महिला चंद्रपूर मधील बांबू काम, कारपेट युनिट, गोंदियातील लाख युनिट, ठाण्यातील वारली आर्ट व मुंबईतील टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणा-या महिलां, भंडारा जिल्ह्यातील काथ्या काम करणा-या कारागीर महिलांचा सत्कार करण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. महाव्यवस्थापक कुसम बाळसराफ यांनी आभार मानले.                                          


*****

मनरेगा’ हे विकासाचे इंजिन

 मनरेगा’ हे विकासाचे इंजिन


                                      - राज्यपाल रमेश बैस


मनरेगा’ ही ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी योजना

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 03 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने ते विकासाचे इंजिन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होईल. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित 'झेप अभिमानाची स्वाभिमानाची जगण्याची' कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार ॲड. आशिष जयस्वाल, आमदार महेंद्र दळवी, रोहयो आणि इतर बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, ‘मनरेगा’ आयुक्त शांतनू गोयल व्यासपीठावर उपस्थित होते.


            यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले, मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी आवश्यक कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात काम करता येते. राज्यात सध्या 27 हजाराहून अधिक कामे सुरु आहेत. ग्रामीण भागाला समृद्ध करणारी ही योजना आहे. समाजातील तळागाळातील वर्गाला सर्वसमावेशक बनविण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याची ताकद या योजनेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पन्नास टक्के महिलांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे कामही या योजनेच्या माध्यमातून होत आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याचे काम राज्य शासन करेल, असे राज्यपाल म्हणाले. तसेच, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे योजनेच्या अंमलबजावणी मधील पारदर्शकता वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            ‘मनरेगा’च्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे सुरु आहेत. किमान 200 प्रकारची कामे या योजनेच्या माध्यमातून करता येतात. त्यामुळे ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी ही योजना असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.


            ते म्हणाले की, समन्वयातून सुविधा संपन्न कुटुंब आणि ग्राम समृद्धी योजना अतिशय महत्वाची आहे. रस्ते, विहिरी, पाणंद अशा २३० योजना या मनरेगा अंतर्गत आहेत. या सर्व ग्रामसमृध्दीच्या योजना आहेत. या कामांना गती देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आशीर्वाद या कामाच्या माध्यमातून मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.


            केंद्र सरकारचा आपल्याला पाठिंबा मिळाल्याने अतिशय कमी वेळात जनतेच्या हिताचे महत्वाकांक्षी धोरणात्मक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. त्यातून ५ लाख २१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी ३८ हजार कोटी रुपये खर्च करतोय. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली. जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, त्याला अधिक प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत मनरेगाच्या माध्यमातून काम देणारे हात तयार करण्याचे काम आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.


            राज्य शासनाने निर्णय घेतल्यावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. ‘मनरेगा’ची अंमलबजावणी करताना ते काम चांगले होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही एकच रथाची दोन चाके असल्याचे त्यांनी नमूद केले. गावातील माणूस सुखी, समृध्द झाला, तर राज्य विकासाकडे जाईल. त्यामुळे प्रत्येक गावात ही योजना न्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या.


            यावेळी मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण केला. रोजगार हमी योजना ही राज्याने देशाला दिली. राज्यासाठी ही योजना संजीवनी ठरली आहे. ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी यांना मागणीप्रमाणे काम देणारी ही योजना आहे. या योजनेस गती देण्याचा प्रयत्न आपण केला. जिल्हा पातळीवर छाननी समिती रद्द केल्या. लेबर बजेट नव्याने मांडले. बदलामुळे लाभार्थी योजनेकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


            यावेळी राज्यपाल श्री. बैस, मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ, रोजगार हमी योजना विभागाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन, यशोगाथा पुस्तक आणि व्हिडिओ सीरिजचे अनावरण, मनरेगा गीताचे लोकार्पण, फलोत्पादनाची ऑनलाईन मागणी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे लोकार्पण, महात्मा गांधी नरेगा मदत केंद्र, माहिती आणि निवारण टोल फ्री क्रमांक १८००२३३२००५ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनरेगा योजनेतील कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.


17 विभागांचे अभिसरणातून सर्वांगीण ग्राम समृद्धी संकल्पना


            रोहयोसह इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय, कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, वने, पाणीपुरवठा व स्वच्छता, वित्त, नियोजन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन अशा १७ विभागांनी एकत्र येऊन विविध योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब व सर्वांगीण ग्राम समृद्धी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले. ‘मनरेगा’अंतर्गत समृद्धी बजेट आपण मांडले. पाणी, माती आणि माणसाची काळजी घेऊन विविध कामे हाती घेतली. सगळ्यांच्या सहकार्यातून विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. आभार मनरेगा आयुक्त शांतनू गोयल यांनी मानले.

            यावेळी ‘मनरेगा’च्या माध्यमातून विकासात्मक काम करणाऱ्या यशकथांच्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.                   

000

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

 इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरणl.

            मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.


            या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


            संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Friday, 3 March 2023

शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा !

 शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा !

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन


लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घातली पत्राद्वारे साद 

साडेतीनशे वर्षानिमित्त शासनाकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


मुंबई, ता. ३: पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेवून जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात या वर्षी हा सोहळा 350 वर्षात पदार्पण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात येणारा शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापनकाळ राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. 

यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भावनिक आवाहन करणारे एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.

या पत्रात ना. मुनगंटीवार यांनी आर्त साद घालताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम,महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा,महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.

बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली.हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा,दिव्यत्वाचा,अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय.सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली,सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला,अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली.या क्षणाने महाराज छत्रपती झाले,शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला,महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.

सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.

       या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे ,त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे,त्यातून निर्माण होणार्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल आणि त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल असा विश्वास वाटतो. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.

        

नवनवीन कल्पनांना साकार करून समाजाला गतिशील राखण्यात आपण सतत कार्यरत राहिला आहात. शिवराज्यभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सूचना कळविल्यास त्या बहुमोल ठरतील असेही ना. मुनगंटीवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

min.culture@maharashtra.gov.in यावर सूचना पाठविल्यास शासनातर्फे त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल असेही आवाहन त्यांनी केले आहे.


कालाडूंगर किंवा काला डोंगर आणि दत्तात्रेय मंदिर”

 *“कालाडूंगर किंवा काला डोंगर आणि दत्तात्रेय मंदिर”*


कालाडूंगर म्हणजेच काळा डोंगर ही कच्छ-गुजरात मधील सर्वोच्च म्हणजेच समुद्र सपाटीपासून १४०० फुट उंच टेकडी आहे. 


विशेष म्हणजे ह्या टेकडीवरून जगप्रसिद्ध कच्छच्या रणाचे अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळतं, अगदी १८० अंशापर्यंत देखावा असलेल्या ह्या रणाच्या टोकाशी भारत-पाक सीमादेखील दिसते. 


या ठिकाणी ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूपातील दत्ताचं अतिशय मनमोहक, शांत आणि छोटंसं देऊळ आहे, जे समाधीस्थान म्हणून देखील प्रचलित आहे. 


भुज पासून ९० किलोमीटर अंतरावर कालाडूंगर वसलेला आहे, परंतु इथे पोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक नाही. आपल्याला वाहतुकीची व्यवस्था स्वतःच करावी लागते. 


ह्या परिसरात एकच निवासस्थान आहे आणि ते देखील अगदी माफक व्यवस्था असलेलं! त्यामुळे आगाऊ आरक्षण वगैरे इथे चालत नाही, ‘जो हाजीर तो वजीर’ अश्या प्रकारेच इथे राहण्याची व्यवस्था होते. 


आता ह्या मंदिराचा आणि टेकडीचा थोडा अद्भुत इतिहास जाणून घेऊया. 

येथील स्थानिक लोकांच्या मतानुसार फार पूर्वी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ताचे तब्बल १२ वर्षे येथे वास्तव्य होते. दरम्यानच्या काळात त्यांनी तिथे एक कुटी-सदृश आश्रम बांधला आणि त्यांच्या शिष्यांसोबत ते तिथे राहू लागले. 


दत्तात्रेय स्वतः दरोरोज अगदी नित्यनेमाने प्रसाद बनवायचे आणि हा प्रसाद देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर भक्तगणांत वाटला जायचा. 


ह्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात कोल्हे होते, आजही आहेत. 

अशी आख्यायिका आहे की एक दिवस दत्तात्रेय ध्यानधारणा करून आपल्या कुटीत परतत असताना काही कोल्ह्यांनी त्यांची वाट अडवली, 

पण हल्ला केला नाही कारण दत्तात्रेयांच्या डोळ्यांतील अद्भुत तेज त्यांना दिसले. 


पशूंना देव आणि मानव ह्यातील फरक ओळखण्याचं सामर्थ्य परमेश्वरानेच दिलेलं असतं असं म्हणतात. 


मग दत्तात्रेयांनी आपल्या जवळील प्रसाद म्हणजेच भात आणि गुळात शिजवलेलं गोडं वरण असं ह्या कोल्ह्यांसमोर ठेवलं आणि आश्चर्य म्हणजे कोल्ह्यांनी प्रसाद स्वाहा करून पळ काढला. 


परंतु एक दिवस वेळेत शिधा न आल्याने दत्तात्रेयांकडे प्रसाद नव्हता म्हणून त्यांनी आपले हात प्रसाद म्हणून त्या कोल्ह्यांना देऊ केले. परंतु दैवी सामर्थ्य अंगी असलेल्या ह्या त्रेमूर्तींना कोल्ह्यांनी काहीही केले नाही. त्या दिवसापासून रोज कोल्ह्यांना नैवेद्य अर्पण करण्याच्या प्रथेस प्रारंभ झाला व दत्तात्रेयांनी आपल्या शिष्य वर्गाला देखील हा नियम घालून दिला.  


नवल म्हणजे आज ४०० वर्षानंतरही गावकर्यांनी ही प्रथा सुरु ठेवली आहे. ह्या कोल्ह्यांना रोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता हा गोड भाताचा नैवेद्य वाटला जातो. 


विशेष म्हणजे आजपर्यंत एकही माणसाला इजा न करता अगदी योग्य वेळेला हे कोल्हे टेकडीवर जमा होतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेतात. आता तर कोल्ह्यांसोबत, मैना, पोपट, आणि इतर पक्षीही ह्या भोजनाचा आस्वाद घ्यायला इथे येतात. 


अश्या ह्या निसर्गरम्य आणि पावन वातावरणात मनःशांतीसाठी कित्येक भक्तजन कालाडूंगर किंवा काला डोंगरच्या वाटेने निघतात. 


पशु आणि मानव ह्यांचे अतिशय निर्मळ नातं येथे पहावयास मिळते व मन थक्क होऊन जाते.


तर मित्रांनो गुजरातची सहल जेव्हा कराल, तेव्हा त्या सहलीत


कालाडूंगर पाहायला विसरू नका ! 🙏🙏

गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार

 गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती

देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार

                      - क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

            मुंबई दि 3:राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सन 2018 मध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा आढावा घेण्यासाठी शासनामार्फत समिती नेमण्यात आली असून या समितीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल. या अहवालाचा अभ्यास करुन सुधारित क्रीडा धोरणानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.


            अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या गट अ ते गट ड मधील पदांवर थेट नियुक्तीसाठी क्रीडा अर्हताही निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदांवरील क्रीडा प्राविण्य अर्हता निश्चित करण्यात आली असून या निकषाधारे आतापर्यंत 67 खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे.


            याशिवाय गुणवत्ताधारक खेळाडूंच्या सेवा घेऊन गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री.महाजन यांनी स्पष्ट केले.


000

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांतील कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

 संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांतील

कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

                                                  - मंत्री संजय राठोड                                                  

            मुंबई दि 3: संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.


             विधानसभा सदस्य ऋतुराज पाटील, डॉ. राहुल पाटील, हसन मुश्रीफ, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील निराधार, अपंग आदींच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने केलेल्या योजना याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, विशेष सहाय्य योजनेकरिता असलेले निकष, अटी व अर्थसहाय्याची रक्कम याकरिता सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 हजार 558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च 2023 या महिन्यांचे लाभार्थींना अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वरुन 60 करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविणे, तसेच अनुदान वितरित करण्याबाबतचे निकष बदलणे, अर्थसहाय्यात वाढ करणे याबाबी अभ्यासण्यासाठी एक समिती तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.


०००


Featured post

Lakshvedhi