Thursday, 2 March 2023

.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीयंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे

 .बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीयंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे


- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

      मुंबई, दि. 2 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयाने विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या.


            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करुन द्याव्यात. जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम विनाअडथळा पार पडतील, यादृष्टीने पोलिस प्रशासनाने काटेकोर व्यवस्था ठेवावी, तसेच जयंतीदिनी चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर आधारित ‘भीमपहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी संबंधितांना सूचित केले.


            सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाणारे समाजभूषण पुरस्कार प्रलंबित असून त्यांचे वितरण करण्यात यावे, तसेच या पुरस्कारांसाठी प्राप्त अर्जदारांसोबतच उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाने स्वतः पुढाकार घेऊन पुरस्कार द्यावा, असे सूचित केले. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला. 


      महाड येथे २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देखील संबंधित यंत्रणांनी चोख तयारी ठेवावी. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन महाड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सभांचे नियोजन करण्याची खबरदारी घ्यावी. वाहतूकीची कोंडी न होता नागरिाकंना विनासायास त्या ठिकाणी येता जाता येईल, यादृष्टीने वाहतूक पोलीस प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना श्री.आठवले यांनी संबंधितांना दिल्या. पोलीस प्रशासन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची, सोयी सुविधांची सविस्तर माहिती यावेळी संबंधितांनी दिली.   


      मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, यांच्यासह गृह विभाग, महानगरपालिका तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणाप्रमुख तसेच माजी मंत्री अविनाश महातेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, यांच्यासह इतर संबंधित बैठकीला उपस्थित होते.

कधी असेही जगून बघा…

 ✍️✍️✍️✍️

📀 कधी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगताना

हा एक हिशोब करुन तर बघा!

“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?

हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी

समोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी

न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात

कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!

स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण

कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते

कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!

काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?

आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?

एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते

त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?

कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!

चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?

आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..


आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते

त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!

तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो

कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..

😊 शुभ संध्या

जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार

 जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार


- कामगार मंत्री सुरेश खाडे


            मुंबई, दि. 2 - कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून जळगाव येथील एमआयडीसीमधील रेमंड लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.


            मंत्री श्री. खाडे म्हणाले, रेमंड लिमिटेड एमआयडीसी जळगाव या आस्थापनेत व्यवस्थापनाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत ६ डिसेंबर २०२२ रोजी पगार वाढीचा करार केला. या कराराविरुद्ध १० कामगारांनी मान्यताप्राप्त संघटनेने केलेल्या कराराविरुद्ध घोषणा देऊन कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना काम करण्यास मज्जाव केला. या कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


            या संदर्भात कामगार आयुक्त आणि संबंधित कामगार संघटनांची येत्या आठ दिवसांत एकत्रित बैठक घेऊन आणि कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल. तसेच कामगार हितासाठी जे प्रयत्न करणे आवश्यक असेल ते निश्चित करण्यात येतील, असे मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.


            यासंदर्भात झालेल्या चर्चेत मंत्री गिरीष महाजन, सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहीर, शशिकांत शिंदे, अनिल परब, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.


00000

हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीलाप्रतिबंधासाठी विशेष भरारी पथक

 हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीलाप्रतिबंधासाठी विशेष भरारी पथक


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 2 : हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळात विशेष भरारी पथक नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.


            विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक अनुषंगाने लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी ते बोलत होते.


            मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीला आळा घालण्यासाठी विभागामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. अधिवेशनानंतर या विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीविरुद्ध बंधपत्र घेतले जाते, परंतु तिसऱ्यांदा जर या बंधपत्राचे संबंधित व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित करण्यात येईल. तसेच गृह विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            हिंगोली जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 375 गुन्हे नोंदविण्यात येऊन 349 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश अधीक्षक यांना देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विभाग स्तरावर भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, भाई जगताप, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

 शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

20 मार्चपर्यंत नामांकन प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

नांदेड,- विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यात लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक ज्ञानविश्व ला सहा वर्ष पूर्ण होत असून सातव्या वर्षात पदार्पण होत आहे. शिक्षण या विषयाला समर्पित असलेल्या या साप्ताहिकाच्या सहा वर्षांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त प्राथमिक/माध्यमिक शाळातील शिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच महाविद्यालयांचे ग्रंथपाल यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासोबतच एका वरिष्ठ शिक्षकाला द.तु.मस्के शिक्षक जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील ज्ञानाला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये वितरीत होणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत.

पुरस्काराचे स्वरूपः सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे आहे.

नामांकनासाठीचे निकष व नियमः

* नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय 45 वर्षे असावे. (दि. 1 मार्च 2023 पर्यंत)जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे.

(उपक्रमशील मुख्याध्यापक, प्राचार्य व जीवनगौरव पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)

* किमान 3 वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* नामांकन पाठवण्याचा अंतिम दिनांक सोमवार, 20 मार्च 2023

* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

प्रस्ताव/नामांकन पाठवण्याचे स्वरूपः

आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी. शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणीवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन. उपक्रमासंबंधीची छायाचित्रे. वपूरर्पींळीर्हींरऽसारळश्र.लेा या मेल आयडीवर पीडीएफ स्वरुपात पाठवावी.

संपर्क: 9604466601, 8830425121.

इमेल केल्यानंतर संपर्क क्रमांकावर मेसेज करावा असे आवाहन ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के यांनी केले आहे.



कब्बडी कबड्डी


 

अवैध उत्खननाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार

 अवैध उत्खननाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. २ : अवैध उत्खननाबाबत राज्य शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असून या संदर्भात १३ मार्च रोजी बैठक घेण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.


        नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत सह्याद्री पर्वत रांगामध्ये डोंगरावरील अवैध उत्खनन रोखण्याकरिता शासन कोणत्या उपाययोजना करत आहे, असा प्रश्न सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना महसूल मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.


            महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी अवैध उत्खनन केलेल्या जमीन मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर सध्या हे प्रकरण अपर आयुक्त नाशिक यांच्याकडे दाखल आहे. या प्रकरणाबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा, असे संबंधित यंत्रणेला आदेशित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अवैध उत्खननाबाबत तत्काळ कारवाई केली जावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार कुडाळ येथे सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत माहिती घेऊन तिथे अवैध उत्खनन सुरू असेल, तर तत्काळ ते बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिथे इको सेन्सिटिव्ह झोन आहेत तिथेही उत्खनन होऊ नये यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


            यावेळी सदस्य सर्वश्री राम शिंदे, भाई जगताप, अनिल परब, एकनाथ खडसे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


००००



Featured post

Lakshvedhi