Wednesday, 1 February 2023

बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू

 बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. १ : बचतगटांच्या माध्यमातून महिला उत्कृष्ट काम करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आजपासून राज्यात सुरू होणाऱ्या जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम (जी. टी. एम्.) उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदतच होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


           राजभवन येथे आज महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राबवित असलेल्या नव तेजस्विनी 'जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझमच्या अंमलबजावणी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका, जी टी एम च्या भारत प्रमुख मीरा मिश्रा, आयफॅडचे रोम, इटली व भारतातील प्रतिनिधी तसेच बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी व वॉशिंग्टन विद्यापीठातील, सनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


           राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणारा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्टपणे राबवेल. आगामी सहा वर्षात या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते. त्यामुळे बँका देखील त्यांना कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. महिलांच्या विकासासाठी जागतिक स्तरावरून होत असलेले सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. शासनाकडून देखील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. कोणत्याही योजनेचा लाभार्थी असेल त्याला अनुदान देताना थेट ग्राहकांच्या खात्यात दिले जाते.


             महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. साहजिकच महिलांचे विकासात योगदान वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही देशाची प्रगती आहे. आज बचत गट काम करताना व्यापक स्वरूपात काम करू शकतात. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष म्हणून जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात पौष्टिक तृणधान्यांना आरोग्य विषयक महत्व व आहारातील वापर वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन महिला बचत गटाने देखील पौष्टिक तृणधान्य या संस्कृतीला पुढे नेणे गरजेचे आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.


आयफेडचे ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान : नदिया बेल्टचिका


            ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका म्हणाल्या की,इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे ग्राम विकासामध्ये खूप मोठे योगदान आहे. 'जी. टी. एम्.' साठी निवड करण्यात आलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जी. टी. एम. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात आगामी सहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल.


जी. टी. एम. या उपक्रमासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य


- प्रधान सचिव आय. ए. कुंदन


              महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन म्हणाल्या की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने जी. टी. एम. या उपक्रमासाठी सहा वर्षासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. जी. टी. एम. च्या उपक्रमाची अंमलबजावणी वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने लीड राज्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर ‘माविम’ने केलेल्या कामांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. माविम ने आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन सक्षमीकरण करणे, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महिला बाल विकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही त्या म्हणाल्या.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी केले.


00

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प

 विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 1 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


            अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.


            विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावीत आणि अंत्योदयाचे पंतप्रधानांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.


            देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचा देखील उचित विचार या अर्थसंकल्पात केला आहे.


            एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना, आणि जग मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


०००

लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन.

 लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी

अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्रातील लोककला टिकून राहाव्यात, त्यांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि पारंपरिक लोककलांचे संवर्धन करण्यासाठी लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही समिती कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे, त्यांची पात्रता तपासून अनुदान मंजूर करण्याचे काम करणार आहे.


            पुनर्गठन केलेल्या समितीत तमाशासाठी मंगला बनसोडे आणि अतांबर शिरढोणकर, दशावतारसाठी देवेंद्र नाईक आणि तुषार नाईक मोचेमाडकर, खडीगंमतसाठी शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि शाहीर वसंता कुंभारे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे आणि धनंजय खुडे, लावणीसाठी रेश्मा मुसळे आणि छाया खुटेगांवकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे समितीचे अध्यक्ष असतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल.

नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना.

 नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना.

            मुंबई, दि. 1 : नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजने अंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून 23 अशासकीय सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. 


            या समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपावित, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रो. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरुप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गिते हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.


            नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या संचालकांना नाटकांचे परीक्षण करण्याचे अधिकार नसतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल. नाट्य परीक्षण समितीमधील सदस्य अनुदानासाठी अर्ज केलेल्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ, संगीत किंवा अन्य बाबींशी संबंधित असल्यास त्या सदस्यास संबंधित नाटकाचे परीक्षण करता येणार नाही. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी 23 सदस्यांपैकी किमान 11 सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक राहील.


            ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार आहे.

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळेमहाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण

 उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळेमहाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


              ठाणे, दि. 1 :- देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ‘मैत्री’ अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन लोकांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. सँडोज कंपनीने कोवीड काळात मोठे सहकार्य केले. या काळात रोगप्रतिकारक औषधांची गरज व महत्त्व कळून आले. सँडोज कंपनीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषध निर्मिती व संशोधनाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारत आहोत. तेथे गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. सँडोज कंपनीने तेथे गुंतवणूक करून योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.


            आमचे सरकार हे लोकांचे, उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याने उद्योगांनी मोठ्या प्रमाणात येथे यावे व गुंतवणूक करावी. जनेरिक औषध निर्मितीमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सँडोज कंपनीने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रकल्पात अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, यातून राज्याची उद्योग क्षमता दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सुमारे 1 लाख 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली असून ही राज्यासाठी मोठी उपलब्धी आहे. भविष्यातही उद्योगांना लागणारे सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            आज भूमिपूजन झालेल्या प्लँटसाठी कंपनी सुमारे 250 कोटींची गुंतवणूक करणार असून येथे जेनेरिक औषध निर्मिती होणार आहे. यामध्ये सुमारे 500 ते 600 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. वर्षभरात हा प्लँट सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युनिट प्रमुख श्री. भंडारे यांनी स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रिचर्ड सुनोर यांच्यात नव्या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली.


            यावेळी कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर, ग्रुप प्रमुख श्री कार्लो, संशोधन विभागाच्या प्रमुख श्रीमती क्लेअर, युनिट प्रमुख सुधीर भंडारे, माजी आमदार विजय चौघुले, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी उपस्थित होते.


00000


 

महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करण्यात येणार

 महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करण्यात येणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील.

            मुंबई, दि. 1 : कोविडमुळे राज्यभरात महसूल दिन साजरा करता आला नाही. महसूल विभागाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे अभियान राज्यभर राबविण्यासाठी यंदापासून महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करण्यात साजरा करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.


            महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, महसूल दिवस राज्यस्तरीय साजरा करीत असताना विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांबरोबरच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.


            महसूल खाते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला विभाग असल्याने या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदभरती, पदोन्नती, भत्ते, ग्रेड पे याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत गतीने निर्णय घेण्यात येत आहेत. महसूल सहायक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील पदोन्नतीची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येईल. तर अव्वल कारकुन संवर्गाच्या त्रुटींबाबतही मार्ग काढण्यात येईल असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.


          महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या, पदभरती, याबाबत मागण्या यावेळी मांडल्या. यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितलं 

पर्यटन विकास महामंडळाच्या निवासातमिळणार तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ

 पर्यटन विकास महामंडळाच्या निवासातमिळणार तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. १ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष" म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.


तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ मिळणार


           पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसह, लसणाची चटणी आणि तृणधान्यापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये मिळू शकणार आहेत. पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ या निवासामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत.


                पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील,देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पौष्टिक तृणधान्यांची माहिती होईल आणि याचा आहारात वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


              महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यात व राज्याबाहेरील ठिकाणीही या उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे. एमटीडीसीमार्फत महाराष्ट्र 'मिलेट मिशन' अंतर्गत तृणधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचे प्रात्यक्षिक व विक्री करणाऱ्या दालनाचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तृणधान्य पदार्थ महोत्सव, दिल्ली हाट येथे पौष्टिक तृणधान्यांची पदार्थ विक्री, पर्यटक निवास औरंगाबाद येथे हुरडा महोत्सव, भंडारदरा, ग्रे पार्क नाशिक येथे नाचणी महोत्सव, एमटीडीसी उपाहरगृह महाबळेश्वर, अजिंठा फूट हील, लोणार, बोधलकसा, ग्रेप पार्क, तारकर्ली आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासस्थानी या महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.


                या ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.


महामंडळाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद


            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई यांनी पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावला होता.या स्टॉलमध्ये या विद्यार्थ्यांनी तृणधान्यापासून बनविलेल्या चिपोतले राजमा मिश्र मिलेट टाकोज,काळा वाटाणा सांबर आणि मिलेट्स वडे, बाजरी नाचणी कुरमुरे भेळ पुरी, वरी तांदूळ आणि साबुदाणे वडे,ज्वारी बदाम पिस्ता कुकीज,नाचणी चोको चिप्स, कुकीज, आले – ओवा – बाजरी – खाऱ्या कुकीज या पदार्थांचा समावेश होता. गेले दोन दिवस लागलेल्या या स्टॉलमध्ये मंत्रालयातील अधिकारी,कर्मचारी व अभ्यागत यांनी या पदार्थांची चव चाखली.

Featured post

Lakshvedhi