Friday, 9 December 2022

शासन निर्णय सहकार विभाग




 

भायखळा येथे शनिवारी रोजगार मेळावा5 हजार 590 जागांवर नोकरीची संधी

 भायखळा येथे शनिवारी रोजगार मेळावा5 हजार 590 जागांवर नोकरीची संधी


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. ८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत शनिवार १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ५ हजार ५९० इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.  


            मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटिव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यात बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचआर, ॲप्रेंटिसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटिसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ज्ञामार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करियरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


००००




मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

 मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

- नरेंद्र अण्णासाहेब पाटील

            मुंबई, दि.12 :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

          अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी व या योजनांमधून मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर आज त्यांच्या मुख्य कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर एस. के. रॉय, झोनल मॅनेजर एस. बी. सहानी, मुंबई साऊथ झोनचे डेप्यूटी झोनल मॅनेजर बिरेन चॅटर्जी, लीड डिस्ट्रीक्ट मॅनेजर निलेश वैती उपस्थित होते.

           अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचे तरुण हे उद्योजक झाले पाहिजे, याकरिता प्रयत्न करीत आहोत, बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्जावरचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले जाते. बँक ऑफ इंडियाच्यावतीने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे तरुण लाभार्थी कर्जाची मागणी करु शकतात, या कर्जाला क्रेडिट गॅरेंटी दिली जाणार आहे. क्रेडीट गॅरेंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. राज्यात जास्तीत जास्त मराठा समाजातील तरुण हा उद्योजक झाला पाहिजे याकरिता राज्य शासन व महामंडळ प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असेही अध्यक्ष श्री.पाटील म्हणाले.


          अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, महामंडळाच्या योजनांबाबत बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील एकूण 34 तालुक्यात लागू असेल, या सामंजस्य कराराबाबतचे अधिकृत परिपत्रक बँक ऑफ इंडिया लवकरच प्रसिद्ध करणार आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या संकेतस्थळावर देखील हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व्यवसायाकरिता लागणाऱ्या कर्जासंबंधी येणाऱ्या अडचणींवर मात करुन बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहचविण्याकरिता हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ इंडिया हे कार्य महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांकरिता करणार असल्याची माहिती अध्यक्ष श्री. पाटील यांनी दिली.

०००




मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम

 मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम

जलदगतीने पूर्ण करावे


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण


            मुंबई, दि. 8 :- मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावीत. महामार्गावरील अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.


            मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री श्री. चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. 1, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.2, आदी रस्त्यांची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणाचे कामाचा आढावा घेतला. ही सर्व कामे तंत्रज्ञानाचा वापर करुन जलदगतीने पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


            या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात मंत्री श्री.चव्हाण यांनी सूचना दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.


            परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तो तत्काळ संबंधितांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.


००००

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडलअधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार


 

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडलअधिकारी 

पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

 

            मुंबईदि. 8 : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

            गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबाराविविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

            पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुली मंडळे आहेत. नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुली मंडळे आहेत.

0000


शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्य

 पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मंत्रालयात अभिवादन.

शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्य

                                -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 8 : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी देखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यातील सैनिकी शाळांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.


             भारताचे पहिले सीडीएस (कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस) बिपीन रावत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.


             तीन्ही सैन्यदलाचे पहिले प्रमुख असलेल्या बिपीन रावत यांच्या कार्याला उजाळा देऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा भारताला अभिमान असल्याचे सांगितले. मुंबई शहर आणि शासनाच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. निवृत्ती यादव या महाराष्ट्रातील पुत्राने उत्तराखंड मधील बिपीन रावत यांचे सैणा हे गाव दत्तक घेऊन तेथे पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, याबद्दल त्यांचे श्री.केसरकर यांनी कौतुक केले. या कार्याच्या एक वर्षपूर्तीनिमित्त ‘किरणपूंज’ या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी सर जेजे महानगर रक्तपेढी, मुंबईच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला. त्यास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिसाद देऊन रक्तदान केले.


            यावेळी रावत यांचे बंधु देवेंद्र सिंह रावत, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष फ्लेचर पटेल, डॉ.हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजन निवृत्ती यादव, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भारत वानखेडे तसेच माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय आदी यावेळी उपस्थित होते.


0000

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

 हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक


‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

            मुंबई, दि. 8 : - हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.


            अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही कंपनी विद्युत वाहनांबरोबरच हायड्रोजन वाहन निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रात हायड्रोजन प्रकल्प आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे निर्मिती केंद्र सुरु करण्यासाठी ट्रिटॉन कंपनीने पुढाकार घेतला असून त्यासाठी श्री. पटेल यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


            इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायड्रोजन वर चालणारी वाहने ही वापरण्यास किफायतशीर, सुरक्षित असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा देखील स्वस्त आहेत. इंग्लंड , जर्मनी, चीन, अमेरिका आदी देशांमध्ये हायड्रोजन वाहनांचा वापर होत असून महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बसेस भाडेत्त्वावर घेऊन हायड्रोजनवर चालविता येणे शक्य आहे, त्यासाठी कंपनीने सविस्तर प्रस्ताव दिल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            राज्यात हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प ट्रिटॉन कंपनीने सुरु केल्यास हायड्रोजन निर्मिती प्रकल्प आणि या प्रकल्पांसाठी लागणारे इतर उद्योगदेखील महाराष्ट्रात सुरु होतील, परिणामी गुंतवणूक वाढेल आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ट्रिटॉन कंपनी जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून या महामार्गाचा मोठा लाभ उद्योग-व्यवसायांना होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


०००००










Featured post

Lakshvedhi