Wednesday, 7 December 2022

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना,

 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना,


आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. हिंदी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावरील नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.

Tuesday, 6 December 2022

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत

 शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी.

            मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. 


            शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद असून अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतूद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.


            या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) प्रवेश नाकारण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.


            विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी/ मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरूद्ध/ मुख्याध्यापकाविरूद्ध नियमानुसार/ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


            कोविडच्या प्रादूर्भावानंतर काही कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) (Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित शाळेत या दाखल्याअभावी प्रवेश देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना सुलभरितीने प्रवेश मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.


00000



भवताल

 


बोलणाऱ्या लाल दगडाची गोष्ट !

 बोलणाऱ्या लाल दगडाची गोष्ट !

वर वर पाहिलं तर कऱ्हा नदीचं पात्र कोरडं ठणठणीत पडलेलं दिसतं. पण काळजीपूर्वक शोध घेतला, तर याच पात्रात जे काही सापडतं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तिथं सापडणाऱ्या लाल दगडाची अशीच तऱ्हा! त्याची भाषा समजून घेतली तर तो व्यवस्थित बोलतो आणि स्वत:ची गोष्ट सांगू लागतो.


कऱ्हा नदी ज्या भागातून वाहते, तो अतिशय कोरड्या हवामानाचा प्रदेश. तिथं जेमतेमच पाऊस पडतो, तरीसुद्धा या पात्रात हा लाल दगड सापडतो. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जन्मच मुळी जास्त पावसाच्या प्रदेशात होतो. तरीसुद्धा हा लाल दगड इथं कसा? त्याचा संबंध प्राचीन काळात घडलेल्या हवामानबदलाशी आहे. तो नेमका कसा? हे समजून घेणं खूपच रोमांचक आहे.


या बोलणाऱ्या दगडाची गोष्ट ऐकण्यासाठी आणि तो प्रत्यक्ष पाहण्यासाठी ‘भवताल’ प्रस्तुत,


वंडर्स ऑफ जिऑलॉजी !


- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर


 


माहिती व नावनोंदणीसाठी:


https://bhavatal.com/EcoTours/Geology


 


संपर्कासाठी :


९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


 


विशेष आकर्षण:


· ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख


· लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश


· सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध


· आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव


· इतिहास घडवणाऱ्या दगडी भिंतीची (डाईक) ओळख


· प्राचीन हवामानबदलाची कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध


· ठिबकणाऱ्या पाण्याने घडवलेल्या लवणस्तंभांची गोष्ट


· नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा


· प्राचीन हिमयुगाच्या नदीपात्रातील पुराव्यांची हाताळणी


· आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी...


 


(महाराष्ट्र एक्सप्लोर करणारा ‘भवताल’चा उपक्रम...)



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


सूचना

 ज्यांचे रुपी बँक मध्ये deposits असतील त्यांनी बँकेत जाऊन फॉर्म भरून द्यावेत. 

Liquidation process चालू आहे. १४ डिसेम्बर च्या आत हे फॉर्म देणे अपेक्षित आहे. रुपी बँक खातेदारांसाठी ही शेवटची संधी आहे.


(👆🏼आपल्याच बॅंकेतील एका सदस्याचा मेसेज)

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज

 अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी

मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज


योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ६ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांनी केले आहे. महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            या योजनाअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.       


            शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशातील शिक्षणाकरीता २० लाख रुपयांपर्यंत तर परदेशातील शिक्षणाकरिता ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडीट लाईन १ अंतर्गत शहरी भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी व ग्रामीण भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९८ हजार पेक्षा कमी आहे त्याला फक्त ३ टक्के वार्षिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येते. तसेच क्रेडीट लाईन २ अंतर्गत ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के तर महिला लाभार्थीकरिता ५ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.


            बेरोजगार उमेदवारांना व्यवसाय सुरु करण्यासाठीही २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी क्रेडीट लाईन १ मधील लाभार्थींना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच क्रेडीट लाईन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पात्र पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे १० टक्के वार्षिक व्याजदर तर महिला लाभार्थीकरिता ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे.


            अल्पसंख्याक महिला बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविली जाते. याअंतर्गत क्रेडीट लाईन १ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तर क्रेडीट लाईन २ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह पुरुषांसाठी १२ टक्के तर महिलांसाठी १० टक्के वार्षिक व्याजदर आहे.


००००


लोकराज्य'चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित.

 लोकराज्य'चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित.

            मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 'लोकराज्य'चा विशेषांक प्रकाशित केला आहे.


            महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या या विशेषांकात विविध मान्यवरांनी आपल्या लेखांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक दत्ता भगत यांनी संविधान लेखकाचा उदय, डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ. आंबेडरकरांचा राष्ट्रवाद, विवेक सौताडेकर यांनी चरित्र आणि विचारधन, डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता, प्रा. कुमुद पावडे यांनी स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी, डॉ. किशोर जोगदंड यांनी डॉ. आंबेडकर एक इतिहासकार याविषयी लेखन केले आहे. शिवाय या अंकामध्ये डॉ. आंबेडकर यांचे पाली भाषेविषयी असलेले प्रेम अतुल भोसेकर यांनी मांडले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी लढा देवून कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे प्रा. डॉ. प्रवीण बनसोड यांनी ‘डॉ.बाबासाहेब आणि कामगार चळवळ’ या लेखातून मांडले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान योद्धे आणि संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी बौद्धिक परिश्रमातून भारतीय संविधान घडविले. यातूनच भारताच्या आधुनिक राष्ट्राची पायाभरणी झाल्याचे प्रा. अनंत राऊत यांनी ‘संविधाननिष्ठ राष्ट्रवाद’ या आपल्या लेखातून मांडले आहे.


            याशिवाय लोकराज्यमध्ये जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया, दिव्यांगांच्या शासकीय योजना, जलपर्यटन यासह राज्य शासनाने लोकोपयोगी घेतलेले निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे.


            हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


००००



Featured post

Lakshvedhi