Thursday, 1 December 2022

.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी

 जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी19 कोटी रूपये मंजूर.

            मुंबई, दि. 30 :- जे.जे. आणि जीटी रूग्णालयांसाठी 19 कोटी रूपयांची आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजुरी दिली आहे.


            पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी जे.जे., कामा तसेच जीटी रूग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती. जे.जे. रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशीन व एमआरआय मशीन जुनी झाल्याने तातडीने नवीन मशीन खरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.


            याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन यंत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या होत्या. ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता देऊन एकूण 19 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी जेजे रूग्णालयातील ॲन्जिओग्राफी उपकरणासाठी पाच कोटी 70 लक्ष रूपये तर जीटी रूग्णालयातील स्कॅनर व एमआरआय उपकरणासाठी 13 कोटी 56 लक्ष रूपये खर्च होणार आहेत.

माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्यामाध्यमातून मुंबई अधिक सुंदर बनवू.

 माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्यामाध्यमातून मुंबई अधिक सुंदर बनवू.

- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा.

            मुंबई, दि. 1 : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून मुंबई अधिक सुंदर करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.


             मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे व एच ईस्ट वॉर्ड येथे ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान शुभारंभप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.


               ते पुढे म्हणाले की, आज पासून एक महिनाभर आपण हे अभियान राबवत आहोत. स्वच्छता ही सवय आहे, ती फक्त एक किंवा दोन दिवसांकरिता नाही तर रोजच आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रोगराई होऊ नये, यासाठी आपला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.


            पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, पंधरा वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करू या. प्रत्येकाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवारी श्रमदान करा आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.


        यावेळी सर्वांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली. एच ईस्ट वॉर्ड येथे आमदार पराग अळवणी, वांद्रे येथे मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे व अन्य शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.


000

लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार

 लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार

- पालकमंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 1 : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जी-नॉर्थ कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. हा उपक्रम 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती पूर्ण करीत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाचे सर्व विभाग याकामी सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे तसेच महानगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.


सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर


            मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत. हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.


            आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले. तर उपायुक्त श्री.बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती जाधव यांनी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, याबाबत आश्वस्त केले. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी.

 महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी.

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर.

            मुंबई, दि. 1 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबर या दिवशी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले.


            मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ,जी,आय., विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजीपार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत तसेच सायन कोळीवाडा, किंग्जसर्कल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व अनुज्ञप्त्या तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ई- विभाग, मुंबई शहर याच्या कार्यक्षेत्रातील फक्त वरळी भागातील सर्व अनुज्ञप्त्या या मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात याव्यात. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री इ. करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.


००

रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी

 रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी अधिक गतीने करावी

- संदिपान भुमरे.

            मुंबई दि. 30 : राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.


            रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी ग्रामसेवक संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय बनसोड, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के.पी.मोते,परिमल सिंह यांच्यासह रोहयो आणि फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामसेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सोपविण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीने करावीत. इतर राज्यात ज्याप्रमाणे उपलब्ध निधी पूर्ण खर्च होईल अशा पद्धतीने कामे करतात त्याप्रमाणे आपल्या राज्यातील कामे करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आणि सर्व कामगारांच्या हजेरीपत्रकावरील प्रतिस्वाक्षरी करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


            राज्यात अधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी खाजगी आधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात यावा. फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षितता, शेतकऱ्यांना होणारा फायदा - तोटा आदी अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुमरे यांनी दिले.


००००




मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ पुस्तकांचे रविवारी

 मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ पुस्तकांचे रविवारीराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन


महाराष्ट्रातील 25 ‘नेक्स्टजेन’ उद्यमींचा सहभाग, 

दत्ता जोशी यांचे 40 वे पुस्तक


महाराष्ट्रातील ‘नेक्स्टजेन’ उद्योजकांच्या वाटचालीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि स्वप्नांचा वेध घेणार्‍या ‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ या मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या 2 पुस्तकांचे प्रकाशन रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी मुंबईत राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होत आहे.


मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक श्री. दत्ता जोशी यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून 25 निवडक उद्योजक घराण्यांचा वेध या पुस्तकांतून घेतला आहे. उल्लेखनीय बाब ही आहे, की श्री. दत्ता जोशी यांचे हे 40 वे पुस्तक आहे. ‘द कॅटालिस्ट’ या प्रकाशन संस्थेद्वारे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत.


‘मालकाचा मुलगा’ ते ‘मालक’ या प्रवासात जनरेशन गॅप, कम्युनिकेशन गॅप, इंट्रापर्सनल रिलेशनशिप्समधील वेगवेगळे पैलू समाविष्ट असतात. या प्रत्येक आघाडीवर ही पिढी कशा पद्धतीने समन्वय साधते या पैलूवरही यात प्रकाश टाकलेला आहे. फॅमिली बिझनेसमधील ताणतणाव, वर्क कल्चरमधील बदल, ऑटोमेशनचे आव्हान, कामगारांतील बदलती वृत्ती या बरोबरच आर्थिक नियोजन आणि मूल्ये यांवरही यात चर्चा केली आहे.


महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून दुसर्‍या वा तिसर्‍या पिढीतील उद्योजकतेचा वेध घेतानाच या पुस्तकात महाराष्ट्राबाहेर सूरत येथे कार्यरत असलेल्या आगळ्या उद्योगाचीही पुढच्या पिढीची गाथा उलगडली गेली आहे.


मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकांत अथांग व अभेद्य जैन (जैन इरिगेशन, जळगाव), अमित घैसास (यशप्रभा ग्रुप, पुणे), निखिल व अभिजित राऊत (अभिजित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, नायगाव, वसई), परीक्षित प्रभुदेसाई (पितांबरी उद्योगसमूह, ठाणे), मिहीर वैद्य ( श्री गणेश प्रेस अँड कोट्स, औरंगाबाद), स्वराली सावे (एनिकार फार्मास्युटिकल्स, बोईसर), कौस्तुभ फडतरे (कवित्सु रोबोट्रॉनिक्स, सातारा), अंकित काळे (काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, औरंगाबाद), कुशल ठक्कर (महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, लातूर), रवी जैन (रवी मसाले, औरंगाबाद), अनुप व अतुल कोगटा (दाल परिवार, जळगाव), अनिकेत व निमिष पाटील (वेगा केमिकल्स, जळगाव), श्रुती अहिरे (आनंद अ‍ॅग्रो, नाशिक), अनुराग मोराणकर (एलमेक इंजिनियर्स, धुळे), अभिजित गव्हाणे (मेधावी सिमेंट प्रॉडक्ट्स, नांदेड), चेतन व दीपक पाटील (कृष्णा पेक्टिन्स, जळगाव), मल्हार मुतालिक (पॉझिटीव्ह मिटरिंग पंप्स, नाशिक), सिद्धार्थ कुलकर्णी (हरमन चहावाला, सांगली), क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे (वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स, मुंबई), आदित्य कुलकर्णी (निर्मिती ग्रुप, नाशिक), केतकी कोकीळ (संजय ग्रुप, औरंगाबाद), मयांक व वेदांती शर्मा (मयांक अ‍ॅक्वाकल्चर, सूरत), पियुष देसले (पियुष लाईफस्पेसेस, धुळे), सुमीत धूत व कपिल राठी (तुलसी पेन्ट्स प्रा. लि., नांदेड) आणि सौरभ व गौरव भोगले आणि मिहिर सौंदलगेकर (एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद) या नेक्स्टजेन उद्यमींचा समावेश आहे.


उल्लेखनीय बाब ही आहे की हे सर्व 25 उद्योग परस्परांपासून भिन्न असून या निमित्ताने 25 वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा गाभा समजून घेण्याची संधी या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे. सप्तरंगी छपाई असलेले २३२ पृष्ठांचे क्राऊन आकाराचे प्रत्येकी 500 रुपये मूल्याचे हे पुस्तक ‘फ्लिपकार्ट’वर खरेदीसाठी वाचकांना सवलतीत उपलब्ध आहे.


dattajoshis@gmail.com



अदभुत संजीवनी बुटी

 


Featured post

Lakshvedhi