Saturday, 5 November 2022

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ घोषित

 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ घोषित

आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर.

            मुंबई, दि. ४ : सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

            भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल. 

            मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            या कालावधीत दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकतील, असे जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी सांगितले.

            यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत आणि यानंतर दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.

            या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास त्या सुद्धा कळवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.

0000



राज्य सेवा (पूर्व) परीक्षा - २०२२ चा निकाल जाहीर ;

 राज्य सेवा (पूर्व) परीक्षा - २०२२ चा निकाल जाहीर ;

मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

            मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर - राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे.


            पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.


            या पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात आले आहे. तसेच लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


            मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील असेही लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


 

लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरती

 लोकसेवा आयोगाकडून सरळ सेवा भरतीकरीता

१ व २ डिसेंबर २०२२ रोजी चाळणी परीक्षा.

            मुंबई, दि.४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आहे.


            परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे.


            या परीक्षेची माहिती उदा. शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी२५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज

 युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी२५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. ४ :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दि. २५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.


             ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.


0000



जरा इचारानो



मदत केंद्र...तक्रार,सूचना,अभिप्राय मंच.

 

गौ mata


 

जिंदगी



 

Featured post

Lakshvedhi