Friday, 4 November 2022

स्मरणात





 

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वंकष, परिपूर्ण असावा.

 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वंकष, परिपूर्ण असावा.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पंढरपूर, दि. 3 (उ. मा. का.) : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही आज येथे दिली.


            पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, राम सातपुते, शहाजीबापू पाटील, सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.


            भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करून प्रस्ताव तयार करावा. भूसंपादन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिकांचे पुनर्वसन करताना ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना तिथेच प्राधान्याने जागा देऊ. रहिवाशांना बहुमजली इमारतीत घरे आणि मोकळा प्लॉट किंवा भरीव नुकसान भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी चर्चा करून पंढरपूरचा चांगला विकास करण्यासाठी सुवर्णमध्य साधावा, असे ते म्हणाले.


            रस्ते, रिंग रोड, पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात निधीची मागणी करून कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी अप्रतिम आराखडा करू या. आहे त्यापेक्षा अधिकच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात. चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावेत. मंदिर व परिसराचा विकास करताना बाधित होणाऱ्या ऐतिहासिक, पुरातन मूळ वास्तुंचे अभियांत्रिकीतील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जतन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.


            पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पंढरपुरात येणाऱ्या भाविक व स्थानिक नागरिकांना आवश्यक व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नवीन समाविष्ट कामांना गती द्यावी. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आदि बाबींचा विचार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.


            प्रास्ताविकात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील सादर केला. आराखडा सर्वसमावेशक करण्यासाठी वाराणसी कॉरिडॉर विकास योजनेच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात आल्याचे सांगितले. प्रारूप तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यापूर्वी सर्व संबंधितांसोबत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्याचे सांगितले. हरकती व सूचनांचाही विचार करण्यात आला. आराखडा तयार करताना त्रुटी राहू नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, नागरिक, व्यापारी व वारकरी संप्रदाय पदाधिकाऱ्यांच्या आवश्यक सूचनांचा समावेश आराखड्यात करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केंद्र शासकीय योजनेमध्ये चंद्रभागा नदीचा समावेश केल्यास आर्थिक व तांत्रिक मदत मिळेल, असे ते म्हणाले.


            जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सादरीकरणात विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधांचा तपशील दिला. यामध्ये दर्शनरांग व पत्राशेड, प्रस्तावित स्कायवॉक, प्रस्तावित दर्शनमंडप, शहरातील पायाभूत विकास कामांसाठी आवश्यक निधी, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, चंद्रभागा नदीवरील घाट, विष्णुपद मंदिर परिसर, प्रस्तावित पालखीतळ आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.


            या मंजूर आराखड्यात पंढरपूर शहरातील व शहराकडे येणारे रस्ते, पूल, नदीकाठी घाट, 65 एकर क्षेत्र विकसित करणे, शौचालये, पाणीपुरवठा, पालखी तळ विकास, भूसंपादन आदि पायाभूत सुविधाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. आराखड्यांतर्गत मंजूर कामांपैकी 51 कामे पूर्ण झाली असून, 6 कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर असलेली 4 विकास कामे व 7 पालखी तळांचे भूसंपादनासाठी अतिरीक्त निधी आवश्यक असल्याने नवीन आराखड्यात प्रस्तावित केली आहेत. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात लघुचित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या.


०००००


 


 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तपूर्व तयारी

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तपूर्व तयारी काटेकोरपणे करा.

- मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. 3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जगातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रशासनाच्यावतीने या परिसरातील सर्व सोयी सुविधा काटेकोरपणे करा, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.   

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करावयाच्या सोयी - सुविधांबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री.लोढा बोलत होते. बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, चैत्य भूमीला जगभरातून तसेच देशातून लोक भेट देत असतात.या परिसरात सुविधा वाढवून या स्थळाला 'अ ' वर्ग दर्जाचे पर्यटन क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. या परिसरातील मुंबई महापालिका प्रशासनाने स्वच्छते बाबतीत कार्यवाही करावी. चैत्य भूमी येथे यंदा मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे,मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य पूर्वतयारी करावी. रेल्वेने येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी केल्या.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने करावयाच्या कामाबाबत विविध सूचना बैठकीत केल्या.

            प्रत्येक प्रशासकीय विभागांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांबाबत माहिती दिली.

**

विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम

 बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!





उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

                    पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 04 : “गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा”, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

            महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

            यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देशमुख, सुनील कांबळे, गोपीचंद पडळकर, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.


            “अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे”, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, “पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल”.


            नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आणि भाविक पंढरीत येतील तेव्हा त्यांना हा बदल दिसेल, असा विश्वास व्यक्त करून पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ या व भागवत धर्माची परंपरा, वारकरी प्रथा - परंपरा, भक्तीभाव पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे ते म्हणाले.


साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी


            शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला. श्री. साळुंखे समाज कल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षापासून वारी करत आहेत.


            यावेळी मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व लोकप्रतिनिधी व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


            मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या वेलफेअर फाऊंडेशनच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथेवर आधारित ॲनिमेटेड फिल्मचे तसेच मंदिर समिती दैनंदिनी व श्रींच्या पुरातन अलंकारांच्या अल्बमचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी बालवारकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज यांनी केले. तर आभार विनया कुलकर्णी यांनी मानले.


श्री संत नामदेव महाराज वाड्याला भेट आणि दर्शन


            श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज वाड्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने यावेळी त्यांचा पगडी व शाल देऊन तर सौ.अमृता फडणवीस यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.


00000



जिवन




 

सुगम संगीत

 


शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात

 शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात

महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप

            मुंबई, दि. ३ – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधने व सुविधा (Infrastructure facilities) व शासकीय प्रक्रिया (Governance Processes) या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या कामगिरीबद्दल राज्यातील शिक्षण प्रणालीतील सर्व संबंधितांचे अभिनंदन केले असून पुढील काळात आपले राज्य गुणांकनामध्ये आणखी सुधारणा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

            कार्यमान प्रतवारी निर्देशांक शालेय शिक्षणाची जिल्हा पातळीवरील कामगिरीचे मूल्यांकन करते. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकसमान प्रमाणात मोजण्यासाठी हा निर्देशांक मदत करतो. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DoSEL) आतापर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशांसाठी म्हणजे २०१७-१८ ते २०१९-२० या वर्षांसाठी ३ निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केले आहेत. निर्देशांक अंतर्गत दोन प्रमुख विभागांतर्गत ५ क्षेत्रे व ७० निदर्शक आहेत. या निर्देशांकाची रचना कार्यक्षम, समावेशक आणि न्याय्य शालेय शिक्षण प्रणाली निर्मिती करण्यासाठी करण्यात आलेली आहे. या निर्देशांक संरचनेत एकूण एक हजार गुणांतर्गत ७० निदर्शक समाविष्ट आहेत जे दोन श्रेणींमध्ये निष्पत्ती तसेच प्रशासन आणि व्यवस्थापन अंतर्गत गटबद्ध आहेत. या श्रेण्या अध्ययन निष्पत्ती, प्रवेश, पायाभूत सुविधा, समता आणि शासकीय प्रक्रिया या पाच क्षेत्रांमध्ये विभागल्या आहेत. मागील वर्षांमध्ये राज्य कार्यमान प्रतवारी निर्देशांकाच्या समान दृष्टिकोनाचा अवलंब करून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना श्रेणीबद्ध केले जाते.

            क्षेत्रनिहाय महाराष्ट्राच्या गुणांकनाची तुलना पुढीलप्रमाणे : अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता श्रेणीमध्ये २०१९-२० च्या १४४ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२० मध्ये कोणताही बदल नाही. शाळा प्रवेश व निष्पत्ती या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या ७६ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये बदल नाही. भौतिक संसाधने व सुविधा या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या १२६ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये १७ गुणांकनाची वाढ झाली असून ते १४३ झाले आहे. समता या श्रेणीमध्ये २२४ च्या तुलनेत एका गुणाची वाढ होऊन २०२०-२१ मध्ये २२५ गुण झाले आहेत. तर, शासकीय प्रक्रिया या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या २९९ गुणांच्या तुलनेत ४१ गुणांची वाढ होऊन २०२०-२१ या वर्षी ते ३४० झाले असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने एका अहवालात देण्यात आली आहे.

            पंजाब आणि केरळ राज्यांनी देखील ९२८ गुणांकन प्राप्त करून महाराष्ट्रासह संयुक्त प्रथम स्थान प्राप्त केले आहे.


०००००

Featured post

Lakshvedhi