Wednesday, 5 October 2022

आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धे

 स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील 5 विद्यार्थ्यांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.

            मुंबई, दि. 4 : जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री श्री. लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक जयशीला तांबे, टीम लीडर परशुराम सुपल यावेळी उपस्थित होते.


सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


            सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोबोटिक, मोबाईल रिपेअर संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा यांच्या संकल्पनेतून तसेच इनोव्हेशन स्टोरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी रोबोट निर्माण करीत आहेत. जिनेव्हा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभली आहे. भांडुप येथील रामानंद आर्य डीएव्ही कॉलेज येथे शिकणारा प्रीतम संतोष थोपटे, बोरिवली येथील श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पारस अंकुश पावडे, माटुंगा येथील डीजी रुपरेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संजय साठे, सायन येथील गुरुनानक हायस्कूलचा विद्यार्थी सुमित रमेश यादव आणि वांद्रे येथील माऊंट कार्मेल चर्चची विद्यार्थिनी निखत नईम अहमद खान यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


   

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था

 ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण.

            मुंबई, दि. 4 : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

            मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव एन. नवीन सोना, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तुकाराम मुंढे आदी मंचावर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

            ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले. या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात आली. हे अभियान 31 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’ कार्यक्रम आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. आभा कार्डचा बहुविध उपयोग होणार आहे. आयुष्मान भारत हेल्थ कार्डमुळे आरोग्य क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. आजार झाल्यास उपचार घेण्याबरोबरच आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे देखील या कार्डमुळे शक्य होणार आहे.

            आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणखी गतिमान होण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.

            केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व्यापक आणि बळकट करण्यासाठी आयुष्मान भारत प्रभावी भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. हेल्थ - वेलनेस सेंटर, टेली कन्सल्टेशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत हेल्थ कार्ड हे चार अतिशय महत्त्वाचे उपक्रम आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल होतील असे सांगितले.

            आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त आरोग्यसेवा तुकाराम मुंढे यांनी आभार मानले.

            सहसचिव दिलीप गावडे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, संजय सरवदे, डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. माले आदी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी तनुजा गावकर, उर्मिला बारामते, श्रावणी आंगणे, संजय खापरे, विशाल शिरसाट, आविश कणगी यांना आयुष्मान भारत हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले.

लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू

 लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास

 सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

- राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई, दि. ४ : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            श्री. विखे पाटील यांनी सोलापूर येथून आयुक्त पशुसंवर्धन यांचे समवेत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गठित राज्यस्तरीय कार्यदलाची (टास्क फोर्स) दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या जास्तीतजास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे होणारी मर्तुक कमी करण्यासाठी उपचार प्रोटोकॉल मध्ये सुधारणा करण्याचे आणि बाधित पशुरुग्णांचे सुक्ष्म अवलोकन करुन उपचार करण्याचे निर्देश श्री.विखे पाटील यांनी दिले.

            शासन अधिसूचना दि. 30.09.2022 अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिलेली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            राज्यामध्ये आज दि.4 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 179 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 52 हजार 955 बाधित पशुधनापैकी एकूण 27,403 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 108.29 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोलाजळगांवकोल्हापूरसांगलीवाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 77.39 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. 

0000

सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर

 सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार

१४ लाखांहून अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली

जास्तीत जास्त तक्रार अर्ज निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ४: सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

          आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दि. १० सप्टेंबर पर्यंतचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत आपले सरकार वेबपोर्टल, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र तसेच विभागांच्या वेबपोर्टलवर एकूण २३ लाख ७६ हजार ६३२ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी १४ लाख ८६ हजार ९५९ अर्ज निकाली काढण्यात आले.

          नागरिकांच्या सर्वच तक्रार अर्जांचा निपटारा करण्यासाठी या सेवा पंधरवड्यास मुदतवाढ देऊन तो दि. ५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. जास्तीत जास्त तक्रार अर्ज निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.



कोल्हापूर - मुंबई विमानसेव

 कोल्हापूर - मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

                                     

            नवी दिल्ली४ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले.

          येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. सिंधिया  यांच्या  हस्ते  विभागाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंहअपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर - मुंबई  विमानसेवेचे  दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे (डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल, असे श्री. सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

            या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिकधैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच पंढरपूर येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

               नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवड्यात मंगळवारगुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

                   श्री. सिंधिया म्हणाले कीदेशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे श्री. सिंधिया यांनी यावेळी सांगितले.  

                                      

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनां

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करावे

- ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले

 

            मुंबई,दि.४:  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव/अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे.

            भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

             या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याने   सन २०२२-२३ साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियमअटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर असून इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा. सन २०२२-२३ साठीच्या समान निधी योजनेनंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत.या योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.

             असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथसाधन सामग्रीफर्निचरइमारत बांधकाम  व विस्तार यासाठी अर्थसहाय्यराजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान 'ज्ञान कोपराविकसित करण्यासाठी अर्थसहाय्यमहोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्यराष्ट्रस्तरीय चर्चासत्रकार्यशाळाप्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्यबाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय 'बाल कोपरा स्थापनकरण्याकरिता अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

अर्ज कुठे व कसा करावा  :

            राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी इछुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवावेतअसे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

0000

लम्पी आजाराबाबत. सूचना

 लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करापालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

            सोलापूर, दि.4 (जिमाका): राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

            नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत श्री. विखे-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे, विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर आदी उपस्थित होते.

            श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करून मृत्यू नेमका होण्याचे कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सूचवावे. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.

            टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घ्याव्यात

            जिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास 15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घेता येतील. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रूग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रूग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रूग्णवाहिका वापरून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

            श्री. प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात एक कोटी 40 लाख जनावरे असून एक कोटी 15 लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या 52 हजार पशु बाधित असून 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशींची समावेश नसल्याने म्हैशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.

            टास्क फोर्सचे डॉ. बिकाणे यांनी सांगितले की, संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही. मृत्यू होणाऱ्यामध्ये वयस्क, आजारी जनावरे, गाभण असलेले, लहान वासरे यांचा समावेश आहे. यामुळे अशा जनावरांची पशुपालकांनी काळजी घ्यावी. अजून आठ ते 10 दिवस लम्पी आजाराचे रूग्ण निघतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पशुपालकांना अर्थसहाय्य

            लम्पी आजारामुळे जनावरे दगावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहा पशुपालक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मृत्यू पडलेल्या प्रत्येक संकरित गायीसाठी 30 हजार तर खिलार बैलासाठी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले.



Featured post

Lakshvedhi